दर्जेदार कोंबडी म्हणजे सतत अंडी देणारी कोंबडी किफायतशीर असते. ज्या कोंबडय़ा सतत अंडी देत नाहीत, ज्यांचे वार्षकि अंडी उत्पादन कमी असते अशा कोंबडय़ांना तेवढेच खाद्य, पाणी आणि व्यवस्थापन लागते. अशा कमी प्रतीच्या कोंबडय़ा कळपातून ओळखून त्यांच्या अंडी उत्पादनासाठी प्रयत्न करावेत.
दर्जेदार कोंबडय़ांमध्ये तुरा लाल, तेलकट, गरम आणि सुरकुत्या नसलेला असतो. कमी प्रतीच्या कोंबडय़ांमध्ये तुरा फिकट लाल, बारीक, कोरडा व सुरकुतलेला असतो. दर्जेदार कोंबडय़ांत गुदद्वार मोठे, लांबट व लवचीक असते. त्यावर सुरकुत्या नसतात. कमी प्रतीच्या कोंबडय़ांत गुदद्वार बारीक, गोल, आकुंचित पावलेले व सुरकुत्यायुक्त असते. चांगली खाद्य पचन क्षमता असल्यामुळे दर्जेदार कोंबडीचे पोट फुगीर असते. त्याचा जास्त अंडी उत्पादनाशी संबंध असतो. कातडी मऊ, तजेल, सुरकुत्या नसलेली असते. कमी प्रतीच्या कोंबडीत छोटे पोट, कातडी जाड, सुरकुत्यायुक्त असते.
छातीच्या हाडाचे टोक व प्युबिक हाडाचे टोक यांतील अंतर चार बोटे सामावतील एवढे असल्यास दर्जेदार कोंबडी, तर फक्त दोन-तीन बोटे एवढे असल्यास कमी प्रतीची कोंबडी समजावी. दर्जेदार कोंबडीच्या कातडीचा रंग सुरुवातीस पिवळा, तर अंडय़ावर आल्यावर फिकट पिवळा असतो. अंडी उत्पादन वाढत गेल्यावर चोच, गुदद्वार, पाय यांच्यावरील कातडीचा रंग फिकट पिवळा किंवा पांढरा होतो. कमी प्रतीच्या कोंबडय़ांत पाय, चोच, गुदद्वार यांच्यावरील कातडीचा रंग गडद पिवळा असतो.
जुनी पिसे झडून नवीन पिसे येणे (मोिल्टग) हा काळ दर्जेदार कोंबडीमध्ये कमी असतो. याउलट कमी प्रतीच्या कोंबडींत मोिल्टग मंद व प्रदीर्घ काळ चालू असते. मोिल्टगच्या काळात कोंबडय़ा अंडी देत नाहीत.
कोंबडय़ांच्या वाढीच्या काळात कमी प्रतीच्या कोंबडय़ांना वेगळे करावे. त्यांना प्रथिनयुक्त खाद्य द्यावे. वाढीसाठी लागणारी औषधे दिल्यास कमी प्रतीच्या कोंबडय़ा पुन्हा अंडय़ावर येऊन सतत अंडी देतात. अंडी उत्पादन काळात त्या अंडी देत नसतील, त्यांना पायाचे आजार, कमी वाढ, आंधळेपणा, आनुवंशिक आजार असतील तर त्यांना कळपातून वेगळे काढावे. त्यामुळे एकंदरीत कळपाचे अंडी उत्पादन वाढते.
डॉ. माणिक धुमाळ (परभणी) मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
rlthatte@gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा