रेशीम किडय़ांच्या विविध जाती आहेत. खाद्यासाठी त्या वेगवेगळ्या वनस्पतींवर अवलंबून असतात. त्यांनी निर्माण केलेल्या रेशीमच्या धाग्यांमध्ये फरक आढळतो. त्यानुसार रेशीमचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. १. मलबेरी सिल्क २. नॉन मलबेरी सिल्क.
तुती म्हणजेच मलबेरी हे खाद्य म्हणून वापरून रेशीम किडे जे रेशीम तयार करतात, त्याला मलबेरी सिल्क म्हणतात. हे रेशीम उच्च दर्जाचे मानले जाते. जगामध्ये तयार होणाऱ्या रेशीमपकी ९० टक्के रेशीम हे मलबेरी सिल्क असते.
नॉन मलबेरी सिल्कला ‘वन्य सिल्क’ असेही म्हणतात. हे मुख्यत्वे चार प्रकारचे असते. ‘ट्रॉपिकल टसर’ हे रेशीम तयार करणारे रेशीम किडे असान आणि अर्जुन या वृक्षांच्या पानांवर जगतात. ‘ओक टसर’ हे रेशीम तयार करणारे रेशीम किडे ओक वृक्षाच्या पानांवर जगतात. ‘इरी सिल्क’ हे रेशीम तयार करणारे रेशीम किडे एरंडच्या पानांवर जगतात. तर ‘मुगा सिल्क’ हे रेशीम तयार करणारे किडे सॉर्न आणि सुएलु या सुगंधी वनस्पतींच्या पानांवर जगतात.
मलबेरी सिल्क खालोखाल मुगा सिल्कला मागणी असून त्याचे धागे सोनेरी रंगाचे असतात. रेशीम कोषांपासून ‘रॉ सिल्क’ तयार करताना म्हणजेच रीिलग करताना प्रथम कोष उकळत्या पाण्यात टाकले जातात. त्यामुळे आतील ‘प्यूपा’ या अवस्थेत असणारा रेशीम किडा मरतो. म्हणजेच असंख्य रेशीम किडय़ांची हत्या करून रेशीम तयार केले जाते. त्यामुळे अिहसावादी लोक हे रेशीम वापरत नाहीत. यातूनच ‘पीस सिल्क’ या संकल्पनेचा उदय झाला. हे रेशीम दक्षिण भारतातच तयार होते. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे रीलिंग यंत्र तयार केले आहे.
रेशीम कापडाचा पोत, चकाकी, देखणेपण यांमुळे त्यांस ‘वस्त्रांची राणी’ असे संबोधतात. रेशीम उत्पादनात जगात चीन पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत दुसऱ्या क्रमांकावर. भारत एकमेव देश आहे जिथे पाचही प्रकारची रेशीम शेती होते. रेशीम वस्त्रांची लोकप्रियता, विविध उद्योगांतील रेशीमची मागणी, सर्व प्रकारच्या रेशीम शेतीस अनुकूल वातावरण, रोजगारनिर्मिती क्षमता, कमी भांडवल गुंतवणूक लक्षात घेता भारतामध्ये अजूनही रेशीम शेती विस्तारास वाव आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा