आरडीएक्स हे काही कोणत्याही रसायनाचं नाव नाही. आरडीएक्स हे ‘रिसर्च डेव्हलपमेंट एक्सप्लोजिव्ह’चे किंवा ‘रॉयल डिमोलिशन एक्सप्लोजिव्ह’चे संक्षिप्त रूप आहे. अतिरेक्यांनी आरडीएक्स वापरून अनेकदा घातपाती स्फोट घडवून आणलेले आहेत, कारण हे एक खूप तीव्र शक्तीचे स्फोटक आहे. रासायनिक दृष्टीने याला नायट्रोसो-अमाइन, सायक्लोनाईट, हेक्झोजेन आणि सी-४ अशी नावे आहेत. मात्र शास्त्रशुद्ध रासायनिक नाव आहे- ‘सायक्लो-ट्रायमेथिलिन-ट्रायनायट्रामाइन’. याच्या उत्पादनासाठी नायट्रिक आम्ल आणि हे क्झामाइन ही रसायने लागतात. याचा उपयोग लष्करात एक महत्त्वपूर्ण स्फोटक म्हणून होतो. स्फोट झाल्यावर त्यातून नायट्रोजन आणि कार्बनची ऑक्साइड्स सेकंदाला ८०५० मीटर्स एवढय़ा वेगाने दूरवर प्रक्षेपित होतात. टीएनटी म्हणजे ‘ट्रायनायट्रो टोल्युइन’. हे एक मध्यम शक्तीचं स्फोटक आहे. त्याच्या दीडपट जास्त स्फोटक आरडीएक्स आहे.
आरडीएक्सचा शोध स्वित्र्झलडमध्ये १८९९ मध्ये जॉर्ज हेिनगने लावून त्याचे पेटंट घेतले. त्या वेळी ते एक औषध असल्याची नोंद केलेली होती. ते पांढरं आणि स्फटिकयुक्त दिसते. याची घनता प्रति घनसेंटिमीटर १.८२ ग्रॅम आहे (साधारणत: पाण्याच्या दुप्पट जड). १९१६ साली या रसायनाला ‘हेक्झोजेन’ नाव देण्यात आले. त्या वेळी त्याची नोंद ‘धूम्रविरहित प्रॉपेलंट’ अशी करण्यात आली. दुसऱ्या महायुद्धात एक स्फोटक म्हणून त्याचा उपयोग झाला. ते वापरताना त्याच्याबरोबर सायटोसोल, टीएनटी, एच-६, कॅल्शियम स्टिरिएट आणि मेण मिसळले जाते.
लष्करी डावपेचात पाण्याखालून अस्त्राचा मारा करण्यासाठी आरडीएक्स वापरतात. युद्धात याला ‘डब्ल्यू सॉल्ट’ किंवा ‘एसएच सॉल्ट’ अशा टोपण नावाने ओळखतात. दुसऱ्या महायुद्धात याचे अमेरिकेत उत्पादन प्रतिमाह १५००० टन व्हायचे आणि जर्मनीत ७००० टन. नियंत्रित पद्धतीने कमकुवत इमारती पाडायच्या असतील तर आरडीएक्स वापरता येते. ते नष्ट करायचे असेल तर जैवतंत्रज्ञान उपलब्ध आहे. ‘फॅनेरोचिटे क्रायसोस्पोरियम’ नामक बुरशी त्यासाठी वापरतात. काही वनस्पतींवर जेनेटिक इंजिनीअिरगचे प्रयोग करून त्यांच्यामार्फतही अशी घातक रसायने नष्ट करता येतात.
मनमोराचा पिसारा: जीवनातली अर्थपूर्णता शोधणं हे मानवी मनाचं उपजत कार्य
‘व्हिक्टर फ्रँक्स’ या विएन्नामधील एका ज्यू मनोविकारतज्ज्ञाला नाझी सरकारनं छळछावण्यांमध्ये डांबून ठेवल्यानंतर त्याची दोस्त राष्ट्रांच्या सैनिकांनी सुटका केली आणि त्यानंतर त्याने अमेरिकेत तिसेक पुस्तकं लिहिली. आपल्या अनुभवावर आधारलेली मानसोपचार पद्धती प्रस्थापित केली. त्याला ४० विद्यापीठांनी मानद डॉक्टरेट दिली. हजारो मानसोपचारतज्ज्ञांना त्यानं प्रशिक्षण दिलं. अमेरिकेतला अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय तज्ज्ञ म्हणून त्याचा सर्वत्र गौरव झाला. या सर्व यशस्वी कारकिर्दीची सुरुवात एका छोटय़ाशा पुस्तकानं झाली. जेमतेम १६० पानी पुस्तकानं अमेरिकेतल्या लाखो नागरिकांचं जीवन संपूर्ण बदललं. ऑशिवित्झसारख्या अनेक छोटय़ा-मोठय़ा छावण्या लाखो ज्युना माझी हिटलरने जीवघेणा छळ करून ठार मारलं. त्यापैकी काही वाचले आणि बरेचसे युरोप, इस्राएल आणि अमेरिकेत स्थायिक झाले. काही ज्युंना या नरकयातनेच्या जखमा कधीच बुजवता आल्या नाहीत तर व्हिक्टरसारख्या विलक्षण ज्यूने त्या बऱ्या करायला मदत केली प्रत्यक्ष छळछावणीत असताना!
आपल्यासारख्याच इतर ज्युना आशेचे किरण दाखवण्याचं लोकविलक्षण काम व्हिक्टरनं केलं. व्हिक्टरनं या सर्वाना धीर दिला आणि जोवर आपण प्रत्यक्ष मरत नाही तोवर जीवनावरची पकड अजिबात सोडू नका. आपला मृत्यू आपल्या हाती नाही आणि नसतोच. आपण जगावं कसं जगण्याला अर्थ कसा द्यावा? याचं संपूर्ण स्वातंत्र्य आपल्याला असतं, ते कोणीही कधीही हिरावून घेऊ शकत नाही, असा ठाम निर्धार त्यांनी स्वत: केला आणि इतरांना त्या दृष्टीने आधारही दिला, छावणीत मानसोपचार केले.
विक्टर फ्रँकलचं पुस्तक वाचल्याला खूप वेळ लागला कारण त्यांच्या प्रतिभेनं आणि धैर्यानं चकित होऊन फक्त स्वस्थ बसून राहावसं वाटायचं. छळछावण्यातले काही अनुभव वाचणं कठीण व्हायचं. इतका अमानुष व्यवहार माणूस माणसावर करू शकतो? अंगावर काटा यायचा आणि पुन्हा थांबावसं वाटायचं. इतकं करूनही पुढे वाचावं तर फ्रँकल यांच्या प्रांजळपणानं स्तिमित व्हायला व्हायचं! ते प्रत्यक्ष भयावह अनुभव घेतानाही मनाची स्थिरता आणि जीवनाच्या अर्थपूर्णतेविषयी इतका विश्वास कायम ठेवण्याचं सामथ्र्य व्हिक्टरमध्ये जिवंत होतं यावर आपला विश्वास बसत नाही.
फ्रँकलनं छळछावण्यातल्या आपल्यासारख्या कैद्यांनी आत्महत्या करण्यापासून परावृत्त केल्याच्या आठवणी सांगितल्या आहेत. त्या दाखवण्यात काही काळ आपण आपल्या प्रिय पत्नीच्या विरहानं व्याकुळ झालो होतो आणि अखेर ती जिवंत असेल की मृत, आठवणींच्या रूपानं ती मनात जागृत आहे याचा साक्षात्कार त्यांना झाला आणि त्यामधून त्यांना सदैव ऊर्जा मिळत राहिली.
फ्रँकलवर मनोविश्लेषणाचे संस्कार झाले होते; परंतु तिथं अडकले नाहीत. फ्रॉइडच्या सिद्धांताचे विश्लेषण त्यांनी करून त्यातलं मूळ तत्त्व हेरलं. फ्रॉइडप्रणीत सिद्धांतामध्ये मनातल्या नेणीव पातळीवरील ऊर्जा सदैव प्रेरित करते हे खरंय, पण त्यातून मानवाच्या मनातल्या सुखासीन वृत्तीचा (हिडॉनिझम) थांग लागतो. फ्रॉइडपश्चात मांडलेल्या सिद्धांतामधून मनामध्ये ‘पॉवर’ मिळवण्याची, स्वत:ला वरचढ ठरवून मनातला न्यूनगंड नष्ट करण्याची प्रेरणा सदैव जागृत असते असा दावा केला.
फ्रँकलच्या आयुष्यात या दोन सिद्धांतापलीकडचा एक आयाम सापडला. मानवी मन जन्मजात मुक्त असतं, त्याला निवडीचं स्वातंत्र्य असतं, आपल्या मनात कोणत्या विचारांना अढळ स्थान द्यायचं, कोणत्या कोत्या नकारात्मक वृत्तींना थारा द्यायचा नाही, हे ठरवण्याची ताकद आणि क्षमता असते. मानवी जीवनातली अर्थपूर्णता शोधणं हे मानवी मनाचं उपजत, देवजात कार्य असतं, असा सिद्धांत त्यांनी मांडला. ‘मॅन्स सर्च फॉर मिनिंग’ या पुस्तकातून त्यांनी ‘लोगो थेरपी’ म्हणून त्याची मांडणी केली आहे.
यू टय़ूबवर फ्रँकलच्या मनातल्या हजरजबाबी आणि नर्म विनोदाची जाणीव होते. अनेक वर्ष अमेरिकेत राहूनही त्यांच्या बोलण्यातला युरोपीअन अॅक्सेंट टिकून होता. छोटी-छोटी उदाहरणं देत आपला मुद्दा ते सहजपणे पटवून देतात.
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व ‘मेघदूता’वरून कालिदासाविषयी..
‘‘भूगोलविषयक दृष्टीनें हें जें अनुमान निघत आहे, तें कालिदासाचा ऐतिहासिक दृष्टय़ा कालनिर्णय करते वेळीं लक्षांत ठेवणें अत्यंत अवश्यक आहे. चुकलेल्या इतिहासदृष्टय़ा कालिदास भलत्याच एखाद्या शतकांत जाऊं लागला, आणि त्या कालच्या ऐतिहासिक दृष्टीनें त्याचा जर ह्य़ा स्थलांशीं संबंध येऊं शकला नाहीं, तर तो कालिदासाचा कालनिर्णय यथोचित होणार नाहीं.. कालिदासाला ऐतिहासिक दृष्टय़ा अशाच काळामध्यें ठेवणें भाग आहे कीं, ज्या काळाचा भूगोलविषयक दृष्टीनें या उपरिनिर्दिष्ट विदिशा-उज्जयिनीच्या स्थळांशीं संबंध येऊं शकेल.. ज्या विदिशेचें वर्णन कालिदासानें मेघदूतामध्यें केलेलें आहे, त्याच विदिशेचा उल्लेख कालिदासाच्या मालविकाग्निमित्रनामक नाटकामध्यें आलेला आहे. मालविकाग्निमित्रामध्यें विदिशा ही नदी आणि नगरी म्हणून दोन्ही रीतीनें वर्णिलेली आहे. ’’ कालिदासाचा नेमका काळ कोणता याविषयी संस्कृत भाषेचे अभ्यासक असलेल्या शि. म. परांजपे यांनी ‘मेघदूतावरून कालिदासाविषयीं’ हा लेख लिहिला आहे. त्यात ते पुढे म्हणतात –
‘‘.. अग्निमित्राच्या कारकीर्दीच्या जवळपासच्या काळामध्येंच कालिदास हा जन्माला आलेला असला पाहिजे. म्हणजे कालिदास हा ख्रिस्तीशकाच्या पूर्वीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या शतकामध्यें होऊन गेलेला असला पाहिजे. आणि दुसऱ्या शतकामध्यें अग्निमित्र हा राजा विदिशा येथें राज्य करीत होता.. यावरून साधारणपणें असा निष्कर्ष निघतो कीं, मालविकाग्निमित्र नाटकावरून ख्रिस्तीशकापूर्वीचें पहिलें किंवा दुसरें शतक हा जो कालिदासाचा समय म्हणून प्राप्त होतो, तो मेघदूतांतील भूगोलविषयक स्थलांच्या अनुमानाशीं विरोधी नाहीं. मेघदूतामधून सूचित होणारें कालिदासाचें स्थळ आणि मालविकाग्निमित्रावरून दिसून येणारी कालिदासाची वेळ हीं एकमेकांशीं विसंगत नसून तीं एकमेकांना अनुकूल आहेत, त्यांची एकमेकांशीं एकवाक्यता आहे, आणि तीं एकमेकांना पुष्टि देणारीं आहेत, एवढी गोष्ट मेघदूताच्या भूगोलविषयक आणि मालविकाग्निमित्राच्या इतिहासविषयक परीक्षणापासून निष्पन्न होते, यांत संशय नाहीं. छ’