वर्ष संपताना वाचकांनी ‘कुतूहल’ला दिलेल्या प्रतिसादावर एक दृष्टिक्षेप..
डॉ. आनंद कर्वे यांच्या लेखांना मिळालेल्या अनेक प्रतिसादांपकी मुंबईच्या दीपक पेंटर यांच्या ई-पत्राचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘गोबर गॅसमधून शुद्ध मिथेन वेगळा केल्यावर उरलेला कार्बन डायॉक्साईड पाण्यात मिसळून पिकांना दिला तर पिके जोमाने वाढतील का?’ या दीपक पेंटर यांच्या शंकेतून विचाराला चालना मिळाली. जयंत साठे यांनी आपला बंद पडलेला बायोगॅस प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा विचार मनात डोकावल्याचे कळवले. हाँगकाँगमधील रहिवासी हृषीकेश कुलकर्णी यांनी भारतात परतले असता, कोकणातील आपल्या जमिनीवर शेतीप्रकल्प राबवण्याचे ठरवले.
वसईचे एक शेतकरी माल्कम कोलासो यांच्या शेतात गेल्या काही वर्षांत पीक फारच कमी प्रमाणात येते. सोलापूरचे कृषी अधिकारी डॉ. जनार्दन कदम यांच्या जमिनीच्या सुपीकतेविषयक लेखामुळे शेतजमिनीचे माती परीक्षण करून घेण्याचे कोलासो यांनी ठरवले.
प्राचीन भारतीय शेतीपद्धतीविषयी सुधा गोवारीकर यांच्या ‘वाल्मीकी अय्यंगार्या’ या लेखाने ‘कुणप’चा अर्थ, कुणपची निर्मिती, कुणपचा जमिनीवर, पिकांवर परिणाम याबद्दल ज्ञात करून घेण्याची इच्छा अनेकांनी व्यक्त केली.
मुंबईतील बोरिवलीच्या सुजाता मुणगेकर यांच्या परिसरातील सरकारी धान्य कोठारामुळे घरातील धान्यात जास्त किडे सापडतात. बीएआरसीमधील शास्त्रज्ञ डॉ. सुधा राव यांचा लेख वाचून लेखिकेशी ई-पत्र व्यवहार केल्यावर त्यांना आपली समस्या सोडवण्याविषयी मार्गदर्शन मिळाले.
साताऱ्याचे यशस्वी प्रयोगशील शेतकरी ज्ञानेश्वर बोडके यांच्या पॉलीहाऊस शेतीविषयी प्रदीप म्हात्रे यांच्या लेखालाही अनेक प्रतिसाद मिळाले. सुनील मिराशी यांना फुलांची पॉलीहाऊस शेती करण्याची प्रेरणा मिळाली. जमिनीची खरेदी किंमत, पॉलीहाऊस शेतीचे प्रशिक्षण, त्याचा खर्च, कालावधी वगरे बारीकसारीक तपशील त्यांनी विचारले. निहाल बोभाटे या तरुण अभियंत्याने बोडके यांचा आदर्श ठेवून पॉलीहाऊस शेतीत पाऊल ठेवण्याचे ठरवले.
अनघा वक्टे यांचा ज्योती नंदर्षी या जळगावच्या यशस्वी महिला शेतकऱ्यावरील लेख दहिसरच्या श्रीमती कर्णिक यांच्या वाचनात आला. पुण्याजवळच्या आपल्या निम्म्या जमिनीत बाग फुलवण्याचा, तर उरलेल्या निम्म्या जमिनीत शेती पिकवण्याचा विचार असल्याचे त्यांनी कळवले. त्यासाठी कृषी संस्था, कृषी तज्ज्ञ, सल्लागार यांच्याविषयी माहिती विचारली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा