आपल्या शरीरात ‘रक्त’ नावाचं एक महत्त्वाचं रसायन सतत कार्यरत असतं. अनेक घटकांनी तयार झालेलं रक्त आपल्या शरीरात विविध प्रकारची कामं करतं. त्याच्या अनेक कार्यापकी आपल्या परिचयाचं कार्य म्हणजे शरीरातल्या प्रत्येक पेशीपर्यंत ऑक्सिजन वाहून नेणं.
नाकावाटे हवा आपल्या फुप्फुसात जाते. तिथे हवेतील ऑक्सिजन रक्तात मिसळतो. रक्तामध्ये ‘हिमोग्लोबीन’ नावाचं एक लोखंडाचं संयुग असतं. या संयुगाबद्दल ऑक्सिजनला खूप आकर्षण असतं. तेव्हा फुप्फुसात आलेल्या हवेतल्या ऑक्सिजनला हे रक्तातलं संयुग दिसताच तो हवेतून थेट रक्तात जातो आणि हिमोग्लोबिनला चिकटतो. आता ही ‘ऑक्सी-हिमोग्लोबीन’ची जोडगोळी शरीराच्या प्रवासाला निघते.
ऑक्सिजनचा स्वभावच मुळी जो जो जगण्याची धडपड करतो त्याला मदत करण्याचा! ‘ऑक्सी-हिमोग्लोबीन’ची जोडगोळी शरीरातल्या पेशींना भेट देत पुढे पुढे सरकू लागते. ज्या पेशींमध्ये ऊर्जानिर्मितीचं काम चालू आहे, त्या त्या पेशीमध्ये हिमोग्लोबीनचा हात सोडून ‘ऑक्सिजन’ मदतीला धावून जातो. ‘ऑक्सिजन’च्या मदतीने पेशी अन्नाचं ज्वलन करून ऊर्जा निर्माण करतात. ऊर्जा तयार होण्याच्या या प्रक्रियेत ऑक्सिजन खर्ची पडतो आणि कार्बन-डायऑक्साइड तयार होतो. आता कार्बन-डायऑक्साइड रक्ताचा आधार घेत पुन्हा फुप्फुसात येतो आणि हवेवाटे बाहेर सोडला जातो.
‘ऑक्सी-हिमोग्लोबीन’ची जोडी लालबुंद रंगाची असते. त्यामुळे ऑक्सिजन असलेलं, आपल्या शरीरातलं शुद्ध रक्त लाल रंगाचं असतं. पण एकदा का ऑक्सिजन हिमोग्लोबीनची साथ सोडून पेशीत मिसळला आणि त्याच्या जागी कार्बन-डायऑक्साइड आला की रक्त थोडं निळसर लाल रंगाचं होतं, ज्याला आपण अशुद्ध रक्त म्हणून ओळखतो. आपल्या त्वचेलगत आपल्याला काही निळ्या रंगाच्या रक्तवाहिन्या दिसतात, त्या अशाच अशुद्ध रक्तवाहिन्या असतात. पण या रक्तवाहिन्यांना धक्का लागून जर कधी रक्त शरीराबाहेर आलं, तर मात्र ते आपल्याला लालबुंदच दिसतं. कारण शरीराबाहेर आल्याबरोबर रक्ताचा हवेतल्या ऑक्सिजनशी संपर्क येतो आणि लगेच ‘ऑक्सी-हिमोग्लोबीन’ची लालबुंद जोडी तयार होते.
मनमोराचा पिसारा: उभा कल्पवृक्षातळी..
विविध मार्गानी मन:सामर्थ्यांची जाण राहावी. आपल्या मनात अखंड शक्ती असल्याची सतत जाणीव राहावी यासाठी संत आणि विचारवंतांनी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे ग्रंथ आणि मार्ग सुचविले. मन:शक्ती म्हणजे चित्त एकाग्र करून ऊर्जेचा प्रवाह मनात खेळविणे असा अर्थ होतो. या ऊर्जेच्या उपयोजनांमधून आत्मविकास आणि समाजाची उन्नती सहजसाध्य होते.
संतांच्या वाङ्मयात चित्ताच्या एकाग्रतेसाठी विशिष्ट दैवतांचे ध्यान अथवा नामस्मरणाचा मार्ग स्वीकारण्याचा आळवणी केलेली असते. यामधलं ते ‘दैवत’ अथवा ‘नाम’ हे केवळ नाममात्र असतात. त्याला देवत्व अथवा धार्मिकता चिकटविली जाते. विचारवंत मंडळी विशिष्ट सिद्धान्ताच्या तार्किकतेवर अव्यभिचारी निष्ठा ठेवून समाजकार्याला उद्युक्त करतात. समर्थ रामदासांमध्ये या दोघांचा अद्वितीय मिलाफ आढळतो.
समाजपरिवर्तनासाठी मन:सामथ्र्य अशा विचारांनी प्रेरित झालेल्या रामदास स्वामींनी सर्वसामान्य माणसाला नीतिमत्तेची चाड बाळगून समर्थपणे जगा असं आवाहन केलं. कधी फटकारत कधी आंजारून तर कधी वास्तवाची स्पष्ट जाणीव करून देणारे श्लोक लिहिले, त्यांना ‘मनाचे श्लोक’ म्हणतात. पैकी हा ६१ वा श्लोक..
उभा कल्पवृक्षातळी दु:ख वाहे।
तया अंतरी सर्वदा तेंचि आहे।।
जनी सज्जनी वाद हा वाढवावा।
पुढे मागुता शोक जीवीं धरावा।।
हे मना, कल्पवृक्षाच्या धनदाट वासंतिक पुष्पांनी डवरलेल्या, सुगंधित, शीतल छायेत बसला आहे. असे असूनही सूर्याच्या प्रखर तापाने उन्हाने पोळल्याचे, पीडित झाल्याचे दु:ख नि त्रास होत असल्याचे मानतो, त्याच्याविषयी काय म्हणावे?
शंका-कुशंका आणि वितंडवाद घालून तो प्रत्यक्षात काहीही करीत नाही, केवळ बडबड करीत राहतो, अशा व्यक्तीस काय म्हणावे?
आत्मसामथ्र्यरूपी कल्पवृक्षाच्या आश्वासक पाठबळाकडे न पाहता, एखादी व्यक्ती निष्कारण गतकाळातील दु:खाचा कोळसा उगाळीत बसते, तिची उज्ज्वल भवितव्याची स्वप्नं कशी पूर्ण होणार? तिचा भूतकाळ गांजलेला आणि वर्तमान आंधळा आणि भविष्यकाळ अंधारलेलाच राहणार यात शंका नाही.
आत्मविकास आणि समाजउन्नती यासाठी वादविवाद न घालता चित्त एकाग्र करून मनोबल वाढवावं, हा एकमेव मार्ग आहे.
मनोबल वाढविण्यासाठी आपल्या आत्मा (रामरूपी)रूपी सत्प्रवृत्तीचा ध्यास घेणे, आपल्या सद्गुणांवर ध्यान देणे या प्रक्रिया आता अजमावायला हव्या, असं स्वामी रामदास समर्थपणे इथे सांगतात.
हे निरूपण समजून घेतले तर मनाचे श्लोकामधील मर्म कळते. अन्यथा, पाठांतर न झाल्याने हातावर छडी अशा आठवणी दृढ होतात.
डॉ.राजेंद्र बर्वे
प्रबोधन पर्व: शिक्षणाशिवाय बहुजन समाजाचे खरे हित साधणार नाही!
‘‘खेडय़ापाडय़ांत शिक्षणाचा फैलाव करण्यास आताच्या जाणत्या देशभक्तांच्या उडय़ांवर उडय़ा का बरे पडू नयेत? त्यांना आता कोणत्या लोकाचाराची भीती वाटते? परजातीची स्त्री असली तरी तिच्याशी लग्न काय, पुनर्विवाहसुद्धा लावण्यास कित्येक वीर तयार आहेत! विधवांचे केस न काढता त्या तशाच सकेशा ठेवून त्यांना पवित्र किंबहुना पुनर्वनिता बनविण्यासही कित्येकांची चढाओढ लागली आहे; परान्नोदक पोटात जाताच पूर्वी ज्यांना वाख्याप्रमाणे मळमळत असे तेच आता वाटेल त्या जातीच्या हातचे अन्न पाणी घेण्यात एक प्रकारचे भूषण, धैर्य इत्यागी गुण मानीत आहेत; देशाच्या हितासाठी संधेची पळी अटक नदीत टाकून थेट परदेशात गमन करीत आहेत; अशा या समजुतदार, ऐपतदार, पाणीदार मंडळींची शुद्धिबुद्धी खेडय़ापाडय़ांत शिक्षणाचा फैलाव करण्याच्या कामीच तेवढी का बरे बोथट झाल्याप्रमाणे होते?.. आताचे देशभक्त पूर्वीच्या देशभक्ताप्रमाणे हेकड, कूपमंडूक वृत्तीचे नाहीत. पृथ्वीवरील ज्ञानसंपन्न देश पाहून आलेले व त्या देशाच्या उन्नतीची गुरुकिल्ली जाणून घेतलेले आहेत! असे सर्व दिशांनी जाणते झालेल्या देशभक्तांच्या हातून खेडय़ापाडय़ांत शिक्षणाचा फैलाव करण्याच्या कामी झटून प्रयत्न होऊ नयेत याचे कारण काय?’’
‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील खेडय़ापाडय़ात शिक्षणाचा प्रसार करण्याविषयी लिहितात –
‘‘देशहितासाठी म्हणून जेव्हा जेव्हा एखादा देशभक्त, एखादे काम करीत असेल तेव्हा तेव्हा त्याने आपली दृष्टी नुसती शहरांतील माडीकडे न ठेवता, ती खेडय़ातील झोपडीकडेही वळविली पाहिजे. जोपर्यंत मंडळाची अशी दृष्टी बनणार नाही, जोपर्यंत ते खेडय़ापाडय़ांच्या परिस्थितीची माहिती करून घेणार नाहीत, जोपर्यंत खेडय़ातील शिक्षणास येणाऱ्या अडचणींचा त्यांना अनुभव येणार नाही आणि जोपर्यंत खेडय़ात शिक्षण प्रचार करण्यासाठी त्यांचा शुद्ध स्वदेशाभिमान जागृत होणार नाही; तोपर्यंत कितीही कारखाने व कितीही शिक्षण परिषदा जन्मास येवोत; त्यांपासून बहुजन समाजाचे खरे हित साधणार नाही!’’