ज्याप्रमाणे कापूस, ताग यांसारख्या सेल्युलोज बहुवारिकापासून तयार झालेल्या नर्सगिक तंतूंपासून प्रेरणा घेऊन पुनर्जनित सेल्युलोज तंतूंचा विकास झाला त्याचप्रमाणे लोकर, रेशीम यांसारख्या प्रथिन बहुवारिक असलेल्या तंतूंपासून पुनर्जनित प्रथिन तंतू बनविण्याची कल्पना पुढे आली. लोकर किंवा रेशीम यांसारखे नसíगक तंतू हे प्रथिनांच्या रूपातील बहुवारिकांपासून बनलेले असतात. निसर्गामध्ये प्रथिनांच्या रूपात बहुवारिके असलेले अनेक पदार्थ असतात; उदा. दूध, शेंगदाणे, मका, सोयाबीन इत्यादी. या पदार्थातील प्रथिन बहुवारिके घेऊन त्यांचे तंतू तयार करण्यासाठी लागणाऱ्या एकरेषीय बहुवरिकामध्ये रूपांतर करून त्यापासून तंतू बनविण्याचे प्रयत्न सुरू झाले.
केसिन हे प्रथिन बहुवारिक निसर्गत: दुधामध्ये विपुल प्रमाणात आढळते. या प्रथिनापासून लोकरीला पर्यायी तंतू तयार करण्याची कल्पना शास्त्रज्ञांना सुचली. दुधापासून तयार केलेल्या तंतूंना स्वाभाविकच केसिन तंतू असे नाव दिले गेले. टॉडटेनहाउप्त या शास्त्रज्ञाने इ. स.१९०४ मध्ये केसिनचे अखंड तंतू तयार करण्याची पद्धत विकसित केली. परंतु या पद्धतीने तयार केलेल्या तंतूंची ताकद अत्यंत कमी होती व त्यांचा पाण्याशी संबंध आल्यावर ते थोडय़ाशा ताणाने तुटत असत. त्यामुळे या तंतूंचा व्यापारीदृष्टीने यशस्वीपणे वापर होऊ शकला नाही. फेरेट्टी या इटलीमधील शास्त्रज्ञाने १९२४ ते १९३५ असे दीर्घ काळ या विषयावर संशोधन केले आणि १९३५ मध्ये तो दुधामधील प्रथिनांपासून चांगल्या प्रतीचा तंतू तयार करण्यात यशस्वी झाला, इटलीमधील रेयॉन तंतू उत्पादित करणाऱ्या स्निया व्हिस्कोसा या कंपनीने फेरेट्टीचे पेटंट विकत घेतले आणि मोठय़ा प्रमाणावर दुधातील केसिन प्रथिनांपासून तंतू उत्पादन करण्यास सुरुवात केली. या कंपनीने या तंतूचे लानिटाल असे नाव ठेवले. इटालियन भाषेत लाना म्हणजे लोकर. हा तंतू लोकरीसारखा प्रथिन तंतू असल्यामुळे आणि इटलीमध्ये तयार झाल्यामुळे त्याचे नाव लानिटाल असे दिले गेले. सन १९३७ मध्ये या कंपनीने लानिटाल या तंतूचे १२०० टन इतके उत्पादन केले.
अमेरिकेमध्ये अॅटलॅन्टिक रिसर्च असोसिएशन या संस्थेने याच काळात या तंतूवर स्वतंत्रपणे संशोधन करून दुधातील केसिन प्रथिनापासून तंतू तयार करण्यात यश मिळविले. या तंतूला त्यांनी ‘अरॅलॅक’ असे नाव दिले.
संस्थानांची बखर: होळकरांचे विविध जडजवाहर
ब्रिटिश सरकारने सर्व भारतीय संस्थानांच्या देशी राज्यकर्त्यांना मुकुट वापरण्यावर बंदी घातली होती. डोक्यावर मुकुट धारण करण्याचा मान फक्त ब्रिटनच्या राणीला किंवा राजाला होता. त्यामुळे तुकोजीराव होळकरांनी युरोपियन जवाहिऱ्यांकडून ‘पिकॉक टर्बन’ बनवून घेतले.
मोराच्या आकाराचे मुकुटाप्रमाणे बसणारे, हिऱ्यामोत्यांनी लगडलेले, पुढच्या बाजूला पाचूंचा दिमाखदार शिरपेच असलेल्या या पागोटय़ाचे मूल्य होते सव्वा कोटी रुपये! तुकोजीराव होळकर हिऱ्यांच्या पाच माळांचे, सात माळांचे आणि नऊ माळांचे सोन्यात गुंफलेले हार घालीत असत. १९२० साली या प्रत्येक हाराची किंमत एक कोटी रुपयांहून अधिक होती! या हारांमधले ‘जोंकर डायमंड्स’ हे हिरे नेपाळमधून आणले होते. हारांची कारागिरी फ्रेंच होती.
महाराजा यशवंतरावांची रत्नखचित वॉकिंग स्टिक म्हणजेच चालण्याच्या काठीची मूठ हत्तीच्या डोक्याच्या आकाराची होती. या मुठीत अत्यंत मौल्यवान असे तीन हिरे बसविलेले होते. महाराजा यशवंतरावांच्या जवाहिरांच्या संग्रहात असलेल्या ‘स्पॅनिश इक्विझिशन’ या फक्त पाचूंपासून बनविलेल्या हाराची किंमत अडीच कोटी रुपयांहून अधिक होती.
होळकरांच्या या अतिमौल्यवान जवाहिरांच्या संग्रहातील अगदी नगण्य अशा वस्तू फक्त सध्याच्या होळकरांच्या वारसाकडे शिल्लकआहेत.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com