दुधातील केसीन या प्रथिनापासून बनविलेल्या ‘अॅरलॅक’ या तंतूमध्ये जे प्रथिन असते ते लोकरीमधील प्रथिनापेक्षा फारसे वेगळे नसते. हा तंतू तयार करण्यासाठी प्रथम दूध घुसळून त्यामधून लोणी वेगळे केले जाते. तंतू तयार करण्याच्या दृष्टीने लोण्याचा उपयोग असत नाही. त्यानंतर लोणी काढलेले दूध ४० अंश सेल्सिअसपर्यंत तापवून त्यामध्ये आम्ल मिसळले जाते. त्यामुळे दुधातील प्रथिन दह्याप्रमाणे एकत्र येते आणि हे दही वेगळे करून ते त्यामधील मीठ व आम्ल काढून टाकण्यासाठी धुतले जाते. हे दही नंतर वाळविले जाते. १०० किलो दुधापासून ३ किलो केसिन मिळते आणि तेवढय़ाच वजनाचा केसिन तंतू मिळतो.
हे दुधापासून मिळविलेले केसिन प्रथिन तंतू तयार करणाऱ्या कारखान्यात आल्यावर याचे प्रथमत: चांगले मिश्रण केले जाते. त्यानंतर त्यामध्ये कॉस्टिक सोडय़ाचे द्रावण मिसळले जाते. यामुळे हे केसिन सोडय़ाच्या द्रावणात विखुरले जाते. हे द्रावण नंतर गाळून तनित्रामधून बाहेर काढले जाते आणि त्यावेळी केसिन प्रथिनापासून तंतू तयार होतात. या तंतूंच्या निर्मितीसाठी आद्र्र कताई पद्धतीचा वापर केला जातो. हे तंतू कताईनंतर अखंड तंतूंच्या स्वरूपात असतात. त्यांचे सर्वसाधारणपणे लोकरीच्या तंतूंच्या लांबी एवढे तुकडे करून आखूड तंतू तयार केले जातात.
केसिन तंतूंचे बरेच गुणधर्म हे लोकरीशी मिळते जुळते असतात. केसिन तंतू हे उबदार आणि मऊ स्पर्श असलेले असे असतात. त्यामुळे लोकरीबरोबर मिश्रण करण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. या तंतूंची ताकद लोकरीपेक्षा थोडीशी कमी असते, तर घनता लोकरी इतकीच असते. ओले केले असता केसिन तंतूंची ताकद कमी होते.
केसिन तंतूंचा उपयोग लोकरीबरोबर मिश्रण करण्यासाठी केला जात असे. याशिवाय कापूस, रेयॉन या तंतूंबरोबर मिश्रण करण्यासाठीसुद्धा केसिन तंतूंचा उपयोग केला जातो. लोकरीबरोबर मिश्रण करून केसिन तंतूचा वापर मोजे, स्वेटर, हॅट, गाऊन यांसारख्या गोष्टींसाठी केला जातो. तर केसिनच्या अखंड तंतूंचा उपयोग उशीमध्ये भरण्यासाठी आणि रजया तयार करण्यासाठी होतो.
चं. द. काणे (इचलकरंजी) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा