मानवनिर्मित, पुनर्जनित तंतूंच्या माध्यमातून एक क्रांती वस्त्रोद्योगात सुरू झाली. पण अशा तंतूंच्या मर्यादा लवकरच संबंधितांच्या लक्षात आल्या. या मर्यादा ओलांडल्या त्या संश्लेषित तंतूंनी. आणि याची सुरुवात केली नायलॉनने. रासायनिकदृष्टय़ा नायलॉनचे बहुवारिक पॉलिअमाईड या प्रकारचे असते. नायलॉनचे बरेच प्रकार उपलब्ध असले तरी व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले दोनच प्रकार आहेत.
नायलॉनला लवकरच लोकमान्यता मिळाली ती त्याच्या वैशिष्टय़पूर्ण भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामुळे. नायलॉनचे हव्या त्या लांबीचे आणि तलमतेचे खंडित तंतू सहज उपलब्ध होतात. हे तंतू मुलायम, घर्षणक्षम, स्थितीस्थापक आणि चुणीविरोधक असतात. हे तंतू चमकदार दिसतात आणि त्यांची झळाळी चटकन नजरेत भरते. हे तंतू सुलभतेने रंगवताही येतात. शिवाय बुरशी, किटाणू यांना हे तंतू चांगल्या प्रकारे विरोध करतात.
विविध क्षेत्रांत या तंतूंचा वापर केला जातो. घरगुती वस्त्रांकरिता हा तंतू वापरला जातोच, शिवाय औद्योगिक क्षेत्रातही नायलॉनच्या विविध वस्तू मोठय़ा प्रमाणात वापरल्या जातात. साडय़ा, शìटग, सूटिंग, अंतर्वस्त्रे, गुंफित वस्त्रे हे या तंतूचे घरगुती उपयोग. पण नायलॉनचे महत्त्व समजण्याकरिता घरगुती वापरापेक्षा औद्योगिक वापराच्या वस्तूंचा विचार करणे आवश्यक आहे.
अरुंद पट्टे, खोल पाण्यात मासेमारी करण्याकरिता वापरली जाणारी जाळी, पॅरॅशूटकरिता आणि बोटी ओढून घेण्याकरिता वापरले जाणारे दोरखंड, पावसाळी रंगीबेरंगी छत्र्या, भेटवस्तू देण्यापूर्वी अधिकाधिक आकर्षक दिसाव्यात म्हणून वापरण्यात येणाऱ्या फिती, शिलाईचे दोरे अशा विविध वस्तू बनवण्याकरिता नायलॉनचा वापर केला जातो.
नायलॉनच्या या यशामुळे शास्त्रज्ञांचा विश्वास वाढला आणि त्यातूनचा पॉलिएस्टर, अॅक्रिलिक, तसेच पॉलिप्रॉपिलीनसारख्या संश्लेषित तंतूंची निर्मिती झाली. नायलॉनच्या उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. खंडित तंतूपेक्षा अखंड तंतूनिर्मितीत वाढ जास्त आहे. पॉलिएस्टरच्या स्पध्रेत नायलॉन काही प्रमाणात मागे पडला असला तरी त्याचे उत्पादन दिवसेंदिवस वाढतच आहे. काळाच्या कसोटीला उतरलेल्या या तंतूचे भवितव्य चांगलेच असेल हे नक्की.
संस्थानांची बखर: शिवरायांच्या प्रेरणेतून ‘पन्ना’ राज्य-स्थापना
मध्य प्रदेशातील पन्ना हा जिल्हा तिथे मिळत असलेल्या हिऱ्यांमुळे प्रसिद्ध आहे. या प्रदेशात तेराव्या शतकापर्यंत गोंड आदिवासींचे राज्य होते. चंदेला राजपुतांनी तिथे वस्ती केल्यामुळे गोंडांनी स्थलांतर केले. पुढे पन्नाचा प्रदेश मोगलांच्या अमलाखाली आल्यावर चंपत राय या ओच्र्छा राजघराण्याच्या वारसाने त्यांच्याविरुद्ध बंड केले, परंतु त्यात तो अयशस्वी झाला. चंपतरायच्या मृत्यूनंतर मात्र त्याचा मुलगा छत्रसाल याने वडिलांचे अपुरे काम पूर्ण केले.
महान, पराक्रमी योद्धा छत्रसाल याला छत्रपती शिवाजी महाराज हे गुरूसमान होते. शिवरायांच्या प्रेरणेने छत्रसालने वयाच्या बाविसाव्या वर्षी पाच घोडेस्वार, २५ बंदुकधारी यांच्या समवेत मोगलांच्या विरोधात प्रथम बंडाचे रणशिंग फुंकले. बंडाच्या पहिल्या दहा वर्षांत त्याने पन्ना, चित्रकूट, काल्पी, सागर, दामोह वगरे मोठी गावे अंतर्भूत असलेला प्रदेश घेतला.
शिवाजी महाराज आणि छत्रसाल यांची प्रथम भेट १६६८ साली झाली. या भेटीत शिवाजी महाराजांनी छत्रसालचे गुण हेरून त्याला स्वराज्याचा मंत्र दिला. त्यामुळे प्रभावित होऊन छत्रसालने मोगल आणि इतर विरोधकांशी एकूण ५२ युद्धे केली. माळवा, बाघेलखंड आणि राजस्थानमधील मोठा प्रदेश घेऊन त्याने यमुना, नर्मदा आणि चंबळच्या खोऱ्यात विशाल बुंदेलखंड राज्य उभे केले.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com