मानवनिर्मित, पुनर्जनित तंतूंच्या माध्यमातून एक क्रांती वस्त्रोद्योगात सुरू झाली. पण अशा तंतूंच्या मर्यादा लवकरच संबंधितांच्या लक्षात आल्या. या मर्यादा ओलांडल्या त्या संश्लेषित तंतूंनी. आणि याची सुरुवात केली नायलॉनने. रासायनिकदृष्टय़ा नायलॉनचे बहुवारिक पॉलिअमाईड या प्रकारचे असते. नायलॉनचे बरेच प्रकार उपलब्ध असले तरी व्यापारीदृष्टय़ा महत्त्वाचे असलेले दोनच प्रकार आहेत.
नायलॉनला लवकरच लोकमान्यता मिळाली ती त्याच्या वैशिष्टय़पूर्ण भौतिक आणि रासायनिक गुणधर्मामुळे. नायलॉनचे हव्या त्या लांबीचे आणि तलमतेचे खंडित तंतू सहज उपलब्ध होतात. हे तंतू मुलायम, घर्षणक्षम, स्थितीस्थापक आणि चुणीविरोधक असतात. हे तंतू चमकदार दिसतात आणि त्यांची झळाळी चटकन नजरेत भरते. हे तंतू सुलभतेने रंगवताही येतात. शिवाय बुरशी, किटाणू यांना हे तंतू चांगल्या प्रकारे विरोध करतात.
विविध क्षेत्रांत या तंतूंचा वापर केला जातो. घरगुती वस्त्रांकरिता हा तंतू वापरला जातोच, शिवाय औद्योगिक क्षेत्रातही नायलॉनच्या विविध वस्तू मोठय़ा प्रमाणात वापरल्या जातात. साडय़ा, शìटग, सूटिंग, अंतर्वस्त्रे, गुंफित वस्त्रे हे या तंतूचे घरगुती उपयोग. पण नायलॉनचे महत्त्व समजण्याकरिता घरगुती वापरापेक्षा औद्योगिक वापराच्या वस्तूंचा विचार करणे आवश्यक आहे.
अरुंद पट्टे, खोल पाण्यात मासेमारी करण्याकरिता वापरली जाणारी जाळी, पॅरॅशूटकरिता आणि बोटी ओढून घेण्याकरिता वापरले जाणारे दोरखंड, पावसाळी रंगीबेरंगी छत्र्या, भेटवस्तू देण्यापूर्वी अधिकाधिक आकर्षक दिसाव्यात म्हणून वापरण्यात येणाऱ्या फिती, शिलाईचे दोरे अशा विविध वस्तू बनवण्याकरिता नायलॉनचा वापर केला जातो.
नायलॉनच्या या यशामुळे शास्त्रज्ञांचा विश्वास वाढला आणि त्यातूनचा पॉलिएस्टर, अॅक्रिलिक, तसेच पॉलिप्रॉपिलीनसारख्या संश्लेषित तंतूंची निर्मिती झाली. नायलॉनच्या उत्पादनात सातत्याने वाढ होत आहे. खंडित तंतूपेक्षा अखंड तंतूनिर्मितीत वाढ जास्त आहे. पॉलिएस्टरच्या स्पध्रेत नायलॉन काही प्रमाणात मागे पडला असला तरी त्याचे उत्पादन दिवसेंदिवस वाढतच आहे. काळाच्या कसोटीला उतरलेल्या या तंतूचे भवितव्य चांगलेच असेल हे नक्की.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा