महानगरामधील प्रमुख बाजारपेठांच्या भागात विजेची मागणी मोठय़ा प्रमाणात असून दिवसेंदिवस वाढत जाणारी आहे. या मागणीची पूर्तता करण्यासाठी विद्युत कंपन्यांना ‘विद्युत उपकेंद्र’ उभारावे लागते. त्यासाठी लागणारी जागा अशा भागात मिळणे कठीण व खर्चीक असते. अशा ठिकाणी गॅस इन्सुलेटेड सब-स्टेशन (GIS) उभारून सल्फर हेक्झाफ्लोराइड (SF6)वायूच्या वापरामुळे नेहमीच्या उपकेंद्रापेक्षा २५% जागेत पूर्तता करता येते.
का बरं या उपकरणात सल्फर हेक्झाफ्लोराइड वापरत असावेत?
सल्फर हेक्झाफ्लोराइड या वायूचे संयुगसन १९०० मध्ये मौसन व प्लीबी या शास्त्रज्ञांनी पॅरिसमध्ये केले. या वायूचे विद्युतरोधक गुणधर्म १९३७ मध्ये जनरल इलेक्ट्रिकमधील संशोधकाच्या लक्षात आले. १९४७ मध्ये या वायूचा वापर विद्युत ट्रान्सफॉर्मरमध्ये तेलाच्या ऐवजी केला गेला. पुढे १९६४ मध्ये पॅरिसमध्ये प्रथमत: हा वायू वापरून जीआयएस उभारण्यात आले. आज जगभरातील महानगरांमध्ये, डोंगर-दऱ्यात जेथे विद्युत उपकेंद्रासाठी पुरेशी, योग्य जागा मिळणे खर्चीक होते, अशा ठिकाणी जीआयएस पद्धतीचे उपकेंद्र वापरले जाते. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, भांडुप, कोयना टप्पा-४ येथे अशा प्रकाराची उपकेंद्रे आहेत.
सल्फर हेक्झाफ्लोराइड हा वायू हवेपेक्षा वजनाने सुमारे सहापट जड आहे. हा वायू रंगहीन, चवहीन असून बिनविषारी, अज्वालाग्राही आहे. अतिप्रखर उष्णतेमध्ये सल्फर हेक्झाफ्लोराइडचे सल्फर टेट्राफ्लोराइड (SF4) व सल्फर डायफ्लोराइड (SF2)मध्ये विघटन होते. हेही वायू विद्युतरोधक आहेत. तपमान कमी झाल्यावर त्यांचे पुन्हा संयोजन होऊन सल्फर हेक्झाफ्लोराइड बनतो. ५०० अंश सेल्सियस तपमानापर्यंत या वायूचे विघटन होत नाही. हायड्रोजन, क्लोरिन, प्राणवायू व आम्ले यांचा सल्फर हेक्झाफ्लोराइडवर परिणाम होत नाही. रासायनिकदृष्टय़ा हा वायू जवळजवळ निष्क्रिय आहे. या वायूवरील दाब वाढविला असता त्याचे विद्युतरोधक गुणधर्म वाढतात. त्यामुळे जीआयएसमधील उपकरणात सामान्य वातावरणीय दाबाच्या सहा ते सातपट दाब राखला जातो. त्यामुळे दोन विद्युतभारित तारांमधील अंतर अतिशय कमी ठेवून सुरक्षा राखता येते. उच्च दाबाच्या स्विचेसमध्ये जेव्हा विद्युतप्रवाह बंद होतो, तेव्हा मोठय़ा प्रमाणात विजेच्या ठिणग्या निर्माण होतात. त्याचे त्वरित खंडन करण्यासाठी अशा स्विचेसमध्ये अधिकतम दाबाचा सल्फर हेक्झाफ्लोराइड वायू वापरला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा