इ.स. १७४० पर्यंत सूतकताई चरखा वापरून हाताने केली जात असे. हाताने चालविण्याच्या चरख्याला एकच चाते असे आणि त्यामुळे एका वेळी एकाच सुताची कताई करून एकच बॉबिन बनविता येत असे. त्यामुळे चरख्याने सूत काढण्याच्या प्रक्रियेची प्रतिमाणशी उत्पादकता अत्यंत कमी होती. दरम्यानच्या काळात विणाई तंत्रात मोठे बदल होऊन धोटय़ाचा शोध लागला होता. त्यामुळे विणाई यंत्राची म्हणजेच मागाची उत्पादकता आणि त्याला लागणाऱ्या सुताची मागणीही वाढली होती. या दोन्ही कारणांमुळे सूतकताई यंत्राची उत्पादकता वाढविणे अपरिहार्य होते. सूतकताईची उत्पादकता वाढविण्यासाठी शास्त्रज्ञ सातत्याने प्रयत्न करत होते. त्याला यश येऊन १७६४ मध्ये इंग्लंडमधील शास्त्रज्ञ जेम्स हारग्रीव्हस याने ‘जेनी’ या कताई यंत्राचा शोध लावला. जेनी हे एक अनेक चात्यांचे सूतकताई यंत्र आहे. सुरुवातीला जेनीला ८ चाती असत आणि पुढे त्यामुळे एकच कामगार एका वेळी ८ चात्यांवर सूत काढू शकत असे. पुढे या यंत्राच्या आधुनिकीकरणाबरोबर चात्यांची संख्या १२० वर जाऊन पोहोचली. जेनीमुळे सूत काढण्यासाठी लागणारे परिश्रम कमी झाले व सूतकताईचा खर्चही कमी झाला.
जेनीमध्ये एका धातूच्या चौकटीवर एका बाजूला ८ चाती बसवलेली असतात. यंत्रावर दुसऱ्या बाजूला एका तुळईवर वातीच्या बॉबिन बसविलेल्या असतात. चात्यांना एका मोठय़ा चाकाच्या साहाय्याने गती देता येते. हे चाक हाताने फिरविले जाते. या पद्धतीने एकाच वेळी आठ चाती फिरविता येतात. वाती चात्यांवर नेताना एका दांडीवरून नेल्या जातात. कामगाराच्या डाव्या हाताने ही दांडी वर उचलून वातीस खेच देता येतो. यावेळी जसजशी वात खेचली जाईल, तसतसे चाक हाताने फिरवून थोडा थोडा पीळ दिला जातो. दांडी पूर्णपणे वर गेल्यावर खेच प्रक्रिया पूर्ण होते व त्या वेळी चाक गतीने फिरवून पूर्ण पीळ दिला जातो. त्यानंतर दांडी खाली आणली असता तयार झालेले सूत चात्याशी काटकोनात येते आणि चाकाने चाती फिरविली असता तयार झालेले सूत चात्यावर बसविलेल्या बॉबिनवर गुंडाळले जाते. बॉबिनवर सूत व्यवस्थित गुंडाळण्यासाठी एक छोटी तार वापरून सूत बॉबिनवर वरखाली गुंडाळले जाते. अशा रीतीने जेनी यंत्रावर सूतकताई केली जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा