निसर्गत: अन्नऊर्जा साठवण्यासाठी स्टार्च, ग्लायकोजनसारख्या ज्या बहुशर्करा असतात त्यांना संचयी बहुशर्करा म्हणतात आणि संरचनेसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुशर्करांना संरचनी बहुशर्करा म्हणतात. सेल्युलोज, कायटीन ही संरचनी कबरेदकांचे प्रकार आहेत.  
वनस्पतीच्या पेशीभित्तिका सेल्युलोजने बनलेल्या असतात. अनेक प्रकारच्या वनस्पतींची खोडे, मुळे व पाने यांना सेल्युलोज तंतूंमुळे बळकटी येते. कापसाच्या तंतूंमध्ये सेल्युलोज जवळपास १००% असतं. लाकडात सेल्युलोज सुमारे ५०% तर काडय़ांत ३०% असतं. ताग, अंबाडी, फ्लॅक्स, इ. खोडांतील तंतूंमध्येही याचे प्रमाण जास्त असतं. सर्व फळे व भाज्या यांच्यातही सेल्युलोज असतं. नसíगकरीत्या आढळणाऱ्या सर्व वनस्पतिज द्रव्यांमधील हे सर्वात विपुल द्रव्य आहे. काही सूक्ष्मजीवही सेल्युलोज तयार करतात.  
सेल्युलोज हे आपल्या आहारातील एक महत्त्वाचे कबरेदक आहे. सेल्युलोज पचवणारी विकरे आपल्या शरीरात तयार होत नाहीत. त्यामुळे आपण सेल्युलोज पचवू शकत नाही.  साहजिकच आपल्याला सेल्युलोजपासून पोषणमूल्ये मिळत नाहीत; मात्र पचन सुलभ होण्यासाठी आणि शौचबांधणीसाठी आपल्या आहारात तंतुमय पदार्थाची म्हणजेच सेल्यूलोजची आवश्यकता असते. मात्र वाळवीसारख्या प्राण्यांत अशी विकरं असल्यानं, ते सेल्युलोज सहज पचवू शकतात. गुरे, शेळी, मेंढय़ा आणि इतर अनेक प्राणी चारा-वनस्पती म्हणजेच सेल्युलोज खातात. अशा प्राण्यांच्या पचनसंस्थेत जीवाणू असतात.  हे जीवाणू सेल्युलोजचे अपघटन करतात. अशा प्राण्यांच्या शरीरात पचन झालेल्या सेल्युलोजचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी होतो.
वनस्पतींची पेशीभित्तिका सेल्युलोजने बनलेली असते, तर काही कवकांची पेशीभित्तिका ‘कायटीन’ या बहुशर्करेने बनलेली असते. कोळंबी, शेवंड, खेकडे, मुंग्या अशासारख्या प्राण्यांचे बाह्य़ आवरणदेखील कायटीनने बनलेलं असतं.  या बहुशर्करेत नायट्रोजनचा समावेश असतो.
कायटीन अर्धपारदर्शक असून अतिशय मजबूत असतं.  शिवाय पाण्यातही ते विरघळत नाही.  त्यामुळे कायटीनचे आवरण असलेल्या प्राण्यांचं संरक्षण होतं. कायटिनेजमध्ये मात्र कायटीनचे विघटन होऊ शकतं. काही सूक्ष्मजीव, कवके आणि काही प्राणी कायटिनेज तयार करतात. हे सजीव कायटिनेजच्या साहाय्याने कायटीनचं पचन करतात किंवा आकार देण्यासाठी कायटीन मऊ करतात. मानवाच्या जाठररसातदेखील कायटेनिज असतं.

मनमोराचा पिसारा: बोलू दे ना समोरच्या व्यक्तीला
‘मानस, महत्त्वाची गोष्ट सांगायचीय तुला..’ मानसी म्हणाली. ‘माहित्येय, काही तरी कानपिचक्या देणार असशील!’ मानस घाईनं म्हणाला, ‘नाही रे, मला तुझ्याशी बोलायचंय ते तुझ्या..’  मानसी म्हणाली, ‘माझ्या काय? माझ्या कपडय़ांबद्दल? माहित्येय मला.’ मानस तिला थांबवत म्हणाला. ‘तसं नाही रे. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवय, तुझ्या त्या सवयी.’ मानसी म्हणाली, ‘हं, माझ्या सवयी माहित्येत मला..’ मानस तिचं वाक्य तोडून पूर्ण करीत म्हणाला.
‘अरे बाबा, मला बोलू दे ना! तुझ्या नेमक्या याच सवयीबद्दल मला बोलायचंय. तू मला बोलू दिलंस तर ना! तू माझी वाक्यं का पूर्ण करतोस?’ मानसला हातानं खुणा करून थांबवत म्हणाली. मानस ऐकू लागला.
‘अरे, तू काय गाळलेल्या जागा भरा, असे प्रश्न सोडवतोस का रे, माझ्याशी बोलताना?’ मानसी ठासून म्हणाली. ‘हे बघ दुसऱ्याबरोबर बोलत असताना एक सर्वसाधारण नियम पाळायला तुझी काय हरकत आहे? बोलू दे ना समोरच्या माणसाला!’ मानसीनं एक विसावा घेतला. तू असं मध्ये मध्ये का बोलतोस? का इंटरप्ट करतोस? का दुसऱ्याची वाक्यं पूर्ण करतोस? का असं वागतोस? जरा विचार कर..’ हे बोलतानादेखील मानसी मानसला हातानं थांबवून रोखत होती. ‘हे बघ, जरा चार-दोन दीर्घ श्वास घे, गप्प राहा, स्वत:शी विचार कर.. मग बोल..’ मानसनं थबकून दीर्घ श्वसन केलं. ‘मला मी असं का वागतो? मला नाही समजत!’ तो म्हणाला.
‘तू बोलू दिलंस तर सांगीन मी.’ मानसी खटय़ाळ हसत म्हणाली. ‘मानस, यू लॅक पेशन्स. तुला धीर धरवत नाही. कोणी बोलू लागलं की तुला वाटतं समोरची व्यक्ती उगीच लांबण लावत्येय. मुद्दय़ाचं बोलत नाहीये. किंवा मानस तुला असं तर नाही ना वाटत की समोरच्याला बोलू दिलं तर ती व्यक्ती आपल्यावर वर्चस्व गाजवेल? तुला नमतं घ्यावं लागेल? नाही तरी तुला सदैव काम करण्याची घाई लागलेली असते. घाईघाईत बोलणं संपवावं असं तुला वाटतं!’ मानस बुचकळ्यात पडला. ‘तू म्हणतेस तो शब्द न् शब्द खराय’ तो अंमळशानं म्हणाला. ‘मग हेसुद्धा ऐक. तुझ्या या सवयीमुळे लोकांना तुझ्याशी बोलावंसं वाटणार नाही. तू दुसऱ्या व्यक्तीला बोलू देत नाहीस म्हणजे तिचं म्हणणं ग्राह्य़ धरत नाहीस. तू समोरच्या व्यक्तिमत्त्वाची, भावनांची दखल घेत नाहीस. तुझा तसा हेतू नसेलही.’ मानसला थांबवत डोळे मिचकावून मानसी म्हणाली, दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घ्यायची तुझी तयारी नसेल तर, त्यांनाही तुझा हेतू समजून घ्यायला वेळ नसतो, हे लक्षात घे. मानसी म्हणाली. आणि हे बघ, दुसऱ्याला बोलू न देण्याचा आततायीपणा करताना, तू उगीच टेन्स होतोस. तुला माहित्येय का की हृदयावर दाब पडण्याचं, रक्तदाब, धीर न धरणं हे महत्त्वाचं मानसिक कारण असतं! म्हणजे इकडे घाई केली वाढलं तिकडे बीपी, असं नाही. पण एक महत्त्वाचा घटक म्हणून! नुस्ती सवय नाही रे मानस, अशा मानसिक सवयींचे दूरगामी परिणाम होतात. हे सांगायचं होतं.’ मानसीनं मानसच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, ‘ऐकून घेतलंस माझं, तुझा फायदा झाला ना!’ ‘मग मी काय करू?’ मानसनं विचारलं. ‘ते पण मीच सांगू?’ मानसी हसत, टपली मारीत म्हणाली. ‘मध्ये बोलण्याची इच्छा झाली की थांब, विसावा घे, दीर्घ श्वास सोड आणि ऐक. महत्त्वाच्या मीटिंगमध्ये असलास तर आपला मुद्दा कागदावर टिपून ठेव.. समोरच्या व्यक्तीचं बोलणं झालं की मग मुद्देसूद बोल आणि माझं ऐकल्याबद्दल ही जादूकी झप्पी..’
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com

प्रबोधन पर्व: दादा धर्माधिकारी : गांधीवादाचे भाष्यकार, सवरेदयी विचारवंत
आचार्य दादा धर्माधिकारी (१८८९-१९८५) हे विद्वान, आचार्य, सवरेदयाचे आणि गांधीवादाचे एक प्रमुख भाष्यकार मानले जातात. संपूर्ण आयुष्य त्यांनी देशकार्य केले. भारतभर भ्रमंती करत सभा, संमेलनं, परिषदा, परिसंवाद आणि शिबिरं यांमधून समाजमन घडवण्याचा ते प्रयत्न करत. त्यांच्याविषयी पु. ल. देशपांडे म्हणतात- ‘‘ ‘विचारांना मोकळे ठेवणे’ हीच दादांच्या स्वभावातली मूलधारणा असल्यामुळे या विराट मानवी संसारात जीवनदृष्टीचा एकच कोन त्यांना पटू शकला नाही. मनाची सारी कवाडे उघडी ठेवून ते या जगाकडे पाहू शकले. जीवनभर चालवलेल्या तपश्चर्येने ज्यांना तापदायक न करता शीतल केले असे दादा हे एक दुर्मीळ विचारवंत.’’ राजकारणात राहूनही त्यांच्याकडे त्यांच्या काही समकालिनांसारखीच अभिजात रसिकता होती. श्रीपाद जोशी म्हणतात – ‘‘त्यांची जीवनदृष्टी इतकी विशाल, सखोल व व्यापक होती की ती कोणत्याही विशिष्ट वादाच्या किंवा संप्रदायाच्या चार भिंतीत बंदिस्त राहू शकत नव्हती. ती पूर्णार्थानं जीवनस्पर्शी होती. आणि जीवन हे तर नेहमीच अथांग राहिलेलं आहे.’’ त्यांनी स्वातंत्र्यलढय़ात कारावास भोगला, विविध आंदोलनांत भाग घेतला, विधिमंडळात आणि घटनासमितीत काम केलं आणि आयुष्यभर भाषणंही केली. शिवाय भरपूर लेखनही केलं. हिंदीत २४ तर मराठीत २० पुस्तकांचे लेखन त्यांनी केलं आहे. ‘आपल्या गणराज्याची घडण’, ‘तरुणाई’, ‘स्त्रीपुरुष सहजीवन’ ही त्यांची मराठीतील पुस्तके कालजयी म्हणावी अशी आहेत. भारतीय राज्यघटनेची जडणघडण कशी झाली याचा आँखो देखा हाल त्यांनी ‘आपल्या गणराज्याची घडण’ या पुस्तकात नोंदवला आहे. ‘स्त्रीपुरुष सहजीवन’मध्ये स्त्री-पुरुषांच्या परस्परसंबंधाविषयी मूलभूत चिंतन मांडलं आहे. डॉ. कुमार सप्तर्षी म्हणतात – ‘‘विचार संक्रमित करण्याची दादांची विशिष्ट धाटणी होती. निवेदनाची मोहक शैली होती. थोरल्यांना ते स्नेहाच्या धाग्यानं बांधून ठेवत. नंतर विचार देत. धाकटय़ांना प्रेमानं ओथंबलेल्या जिव्हाळ्यानं न्हाऊ घालत. त्यामुळं त्यांचे क्रांतिदर्शी विचार तरुण सहज स्वीकारत.’’

Story img Loader