निसर्गत: अन्नऊर्जा साठवण्यासाठी स्टार्च, ग्लायकोजनसारख्या ज्या बहुशर्करा असतात त्यांना संचयी बहुशर्करा म्हणतात आणि संरचनेसाठी वापरल्या जाणाऱ्या बहुशर्करांना संरचनी बहुशर्करा म्हणतात. सेल्युलोज, कायटीन ही संरचनी कबरेदकांचे प्रकार आहेत.
वनस्पतीच्या पेशीभित्तिका सेल्युलोजने बनलेल्या असतात. अनेक प्रकारच्या वनस्पतींची खोडे, मुळे व पाने यांना सेल्युलोज तंतूंमुळे बळकटी येते. कापसाच्या तंतूंमध्ये सेल्युलोज जवळपास १००% असतं. लाकडात सेल्युलोज सुमारे ५०% तर काडय़ांत ३०% असतं. ताग, अंबाडी, फ्लॅक्स, इ. खोडांतील तंतूंमध्येही याचे प्रमाण जास्त असतं. सर्व फळे व भाज्या यांच्यातही सेल्युलोज असतं. नसíगकरीत्या आढळणाऱ्या सर्व वनस्पतिज द्रव्यांमधील हे सर्वात विपुल द्रव्य आहे. काही सूक्ष्मजीवही सेल्युलोज तयार करतात.
सेल्युलोज हे आपल्या आहारातील एक महत्त्वाचे कबरेदक आहे. सेल्युलोज पचवणारी विकरे आपल्या शरीरात तयार होत नाहीत. त्यामुळे आपण सेल्युलोज पचवू शकत नाही. साहजिकच आपल्याला सेल्युलोजपासून पोषणमूल्ये मिळत नाहीत; मात्र पचन सुलभ होण्यासाठी आणि शौचबांधणीसाठी आपल्या आहारात तंतुमय पदार्थाची म्हणजेच सेल्यूलोजची आवश्यकता असते. मात्र वाळवीसारख्या प्राण्यांत अशी विकरं असल्यानं, ते सेल्युलोज सहज पचवू शकतात. गुरे, शेळी, मेंढय़ा आणि इतर अनेक प्राणी चारा-वनस्पती म्हणजेच सेल्युलोज खातात. अशा प्राण्यांच्या पचनसंस्थेत जीवाणू असतात. हे जीवाणू सेल्युलोजचे अपघटन करतात. अशा प्राण्यांच्या शरीरात पचन झालेल्या सेल्युलोजचा वापर ऊर्जानिर्मितीसाठी होतो.
वनस्पतींची पेशीभित्तिका सेल्युलोजने बनलेली असते, तर काही कवकांची पेशीभित्तिका ‘कायटीन’ या बहुशर्करेने बनलेली असते. कोळंबी, शेवंड, खेकडे, मुंग्या अशासारख्या प्राण्यांचे बाह्य़ आवरणदेखील कायटीनने बनलेलं असतं. या बहुशर्करेत नायट्रोजनचा समावेश असतो.
कायटीन अर्धपारदर्शक असून अतिशय मजबूत असतं. शिवाय पाण्यातही ते विरघळत नाही. त्यामुळे कायटीनचे आवरण असलेल्या प्राण्यांचं संरक्षण होतं. कायटिनेजमध्ये मात्र कायटीनचे विघटन होऊ शकतं. काही सूक्ष्मजीव, कवके आणि काही प्राणी कायटिनेज तयार करतात. हे सजीव कायटिनेजच्या साहाय्याने कायटीनचं पचन करतात किंवा आकार देण्यासाठी कायटीन मऊ करतात. मानवाच्या जाठररसातदेखील कायटेनिज असतं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा