चमचाभर लिंबाचा रस, एखादं चिंचेचा बुटूक, कैरीची फोड यापकी जास्त आंबट कोण, असं विचारलं तर? तुम्ही काय उत्तर द्याल? या प्रश्नाचं उत्तर आपली जीभच सांगेल.
आंबट पदार्थ म्हणजे रासायनिक भाषेत आम्लधर्मी पदार्थ. एखादा पदार्थ किती प्रमाणात आम्लधर्मी आहे हे त्या पदार्थात असलेल्या हायड्रोजन आयनाच्या संहतीवर अवलंबून असतं. प्रयोगशाळेत एक विशिष्ट प्रकारचा कागद असतो. या कागदाला पी.एच. कागद म्हणतात. आम्लाचं प्रमाण मोजण्यासाठी काही उपकरणंसुद्धा असतात. हे झालं प्रयोगशाळेत असलेल्या साधनांविषयी. आपल्या शरीरातील जीभसुद्धा असंच एक साधन आहे. पदार्थातील आंबटपणाची जाणीव आपल्याला जिभेवर असणाऱ्या रुचिकलिकांमुळे होते. जिभेच्या मागच्या बाजूला असलेल्या रुचिकलिका आंबट पदार्थाना जास्त प्रमाणात प्रतिसाद देतात. जेव्हा एखादा आंबट पदार्थ जिभेच्या पृष्ठभागावर पसरतो तेव्हा एक विद्युत रासायनिक क्रिया होते.
आंबट पदार्थाचे धन प्रभारित आयन आणि ऋण प्रभारित आयन असं विघटन होतं. हायड्रोजनचे धन प्रभारित आयन वेगळे होतात. हे वेगळे झालेले आयन रसांकुराच्या पेशीत शिरतात. रसांकुराच्या पेशीत शिरलेल्या आयनांमुळे चेतापेशींकडं संदेश पाठवला जातो. पदार्थ किती आंबट आहे, हे त्याच्यातील आम्लाच्या रेणूच्या रचनेवर अवलंबून असतं. िलबाच्या रसात सायट्रिक आम्ल, चिंचेतील टार्टरीक आम्ल, व्हिनेगरमधील अॅसेटिक आम्ल ही आपल्या नेहमीच्या आहारातील आम्लं आहेत.
आपल्याला आयुष्यात सर्वप्रथम ओळख होते ती गोड चवीची. लहान बाळाला मध चाटतात तेव्हा ते बाळ मिटक्या मारत खात असतं. आपल्याला हे दृश्य बघायला खूप मजा येते. गोड चव कोणत्याही एका विशिष्ट वर्गामुळे (रासायनिक घटकामुळे) उत्पन्न होत नाही. गोड चवीची जाणीव करून देणाऱ्या ग्रंथी जिभेच्या शेंडय़ावर असतात.
साखर आणि साखरेच्या कुटुंबातील इतर गोड पदार्थ, ग्लायकॉल, अल्डीहाइड, क्यूटोन अमाइड असे कार्बनी पदार्थ रुचिपेशींमध्ये शिरत नाहीत, त्यामुळे या पदार्थाचे जिभेच्या शेंडय़ावर रासायनिक पृथक्करण होत नाही; पण हे पदार्थ जिभेच्या शेंडय़ावरील ग्रंथींच्या टोकावर असलेल्या जी-प्रथिनांशी जोडले जातात. हे जोडले जाताना जी-प्रथिनातील घटक वेगळे होतात आणि रुचिकलिका पेशीतील पोटॅशिअम आयनांचा मार्ग बंद होतो. यामुळे चेतापेशींकडे गोड चवीचा संदेश पाठवला जातो.
मनमोराचा पिसारा: तुझ्या गळा.. माझ्या गळा.. तणावाच्या माळा
बदललेल्या परिस्थितीशी जुळवून घेणे, मात करणे अथवा फक्त त्रस्त होणे या प्रक्रियांमुळे माणसांत (सगळ्या जिवंत वस्तुमात्रांत) जे परिवर्तन होते, त्याला तणाव आणि तणावाचे व्यवस्थापन म्हणतात.
काळ आणि परिस्थितीमध्ये होणारे बदल झपाटय़ानं होत आहेत. पूर्वीपेक्षा किती तरी अधिक वेगानं परिस्थिती बदलते, हे किशोरवयीन मुलामुलींनाही जाणवू लागलंय. हा वेग शहरात अधिक प्रमाणात जाणवतो कारण शहरातले तणाव मुख्यत: करिअरशी निगडित असतात, मोठय़ा प्रमाणात मानवनिर्मित असतात. त्यामुळे खेडय़ापाडय़ांत, गावपाडय़ांत वनवासी मंडळींना कसला आलाय मानसिक तणाव? असं काहीसं तुच्छतापूर्वक म्हणण्याचा अडाणी विचार लोकप्रिय होता; परंतु तिथे तणाव प्रामुख्याने निसर्गनिर्मित, नैसर्गिक संकट स्वरूपाचे (दुष्काळ, अतिवृष्टी, जमिनीची स्थिती इ.) असतात हे लक्षात घेत नाही. एकूणच ताणतणाव शहरं असोत वा खेडी, सर्वत्र तुझ्या गळा, माझ्या गळा असाच असतो. तुझ्या गळा, माझ्या गळा ही गोष्ट पुरुष आणि स्त्री दोघांच्या बाबतीतही सत्य आहे.
आजच्या परिस्थितीत स्त्रियांवर तर अधिक तणाव आहे; परंतु स्त्री आणि पुरुष यांच्यावर पडणाऱ्या तणावाची कारणं भिन्न असतात. त्याचप्रमाणे तणावाशी दोन हात करण्याचे स्त्रिया आणि पुरुष मार्ग वेगवेगळे असतात. या बाबतीत स्त्रिया अधिक समंजस की पुरुष अधिक धोरणी अशी शर्यत न लावता एकमेकांपासून काही शिकणं महत्त्वाचं आहे. त्याबाबतीतली काही विशेष आकडेवारी अशी..
* आपल्यावर तीव्र ताण असल्याचं फक्त ५० टक्के पुरुष मान्य करतात. तर आपल्यावरील तीव्र ताण-तणाव पडतोय असं ६६ टक्के स्त्रिया मान्य करतात. म्हणजे निम्मे पुरुष अजूनही छे! छे!! मला नाही कसला ताण वगैरे (मी काही कमकुवत मनाचा नाही!) अशी मानसिकता घेऊन वावरतात. स्त्रिया कांकणभर अधिक प्रमाणात तणावयुक्त परिस्थिती असल्याचा स्वीकार करतात. गंमत पुढे आहे.
* आपल्यावर तीव्र ताण आहे, असं मान्य करणारे ६३ टक्केपुरुष तणावाचं व्यवस्थापन करण्याचा ठाम प्रयत्न करतात.
* स्त्रिया तणावग्रस्त परिस्थिती असल्याचा स्वीकार करीत असल्या तरी प्रत्यक्षात तणावाचं व्यवस्थापन करायला थोडय़ाच तयार असतात. म्हणजे तणावग्रस्त परिस्थितीवर मात करण्याची जिगर आणि प्रत्यक्ष कृती पुरुष करतात तर स्त्रिया हे मान्य करून त्याविषयी फारसं करीत नाहीत. पुढे आणखी एक गंमत आहे.
* तणावग्रस्ततेवर मात करण्यासाठी पुरुषांकडे दोनच योग्य उपाय असतात. खेळणे आणि व्यायाम करणे! बाकी दारू, सिगारेट, अति खाणे यात पुरुष पुढाकार घेतात.
* तणावग्रस्ततेवर मात करण्यासाठी स्त्रियांकडे बरीच धोरणं असतात. उदा. गप्पा मारणे, प्रेम करणे, सेवा करणे, धार्मिक प्रथापालन आणि अर्थात शॉपिंग, व्यायाम, खेळ याकडे कल कमी.
* पुरुषांना तणावाची मुळं कामकाज, व्यावसायिक कार्य इथे असतात.
* नातेसंबंधातील दुरावा, प्रेमाची परतफेड न होणं, कामातल्या बांधीलकीची जोडीदार/ कुटुंबीयांनी कदर न करणं यामुळे स्त्रियांवर ताण पडतो!!
तुझ्या गळा. माझ्या गळा गुंफू तणावाच्या माळा..
डॉ. राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व: गोिवद पुरुषोत्तम देशपांडे – पुरोगामी विचारवंत
गोिवद पुरुषोत्तम देशपांडे (२ ऑगस्ट १९३८ – १६ ऑक्टोबर २०१३) हे मराठीतले एकमेव राजकीय नाटककार होते. गोपुंची नाटकं पूर्णपणे राजकीय नाटकं आहेत. त्याहीपेक्षा विचारसरणीची नाटकं आहेत. गोपुंची वैचारिक बांधीलकी डाव्या विचारसरणीशी होती. डावे लोक आपले तत्त्वज्ञान प्राणपणाने जपायचा प्रयत्न करतात. त्यांच्यासाठी जगण्यासाठी विचारसरणी ही नितांत निकडीची गोष्ट असते; पण मानवी व्यवहार केवळ वैचारिक तर्कप्रामाण्यावर चालत नाही आणि हेच नेमके डावे लक्षात घेत नाहीत. त्यामुळे त्यांची फरपट होते. अर्थात केवळ आपलीच विचारसरणी प्रमाण मानणाऱ्या आणि तिला चिकटून बसलेल्या प्रत्येकाच्या बाबतीत, ते होतंच. हा विचारव्यूह मांडायचा प्रयत्न गोपुंनी आपल्या नाटकांमधून केला. त्यांचं पहिलं नाटक ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’ (१९७२) ते ‘शेवटचा दिस’ (२०१०) पर्यंत हेच दिसतं. ‘एक वाजून गेला आहे’, ‘चाणक्य विष्णुगुप्त’, ‘मामक: पाण्डवाश्र्च्ौव’ -‘अस्सा नवरा सुरेख बाई’, ‘अंधारयात्रा’, ‘सत्यशोधक’, ‘रस्ते’ ही त्यांची इतर नाटके. प्रखर सामाजिक जाणिवांना विचारसरणीची जोड असेल, तर माणसांचं काय होतं, हे गोपुंच्या नाटकांतून जाणून घेता येतं. ‘इत्यादी इत्यादी कविता’ हा कवितासंग्रह त्यांच्या नावावर आहे.
‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’ या साप्ताहिकात त्यांनी वीस-पंचवीस वष्रे सदरलेखन केले. याशिवाय त्यांनी ‘निबंध’ हा विस्मृतीत जात असलेला वाङ्मय प्रकार टिकून राहावा म्हणून ‘रहिमतपूरकरांची निबंधमाला- चर्चक निबंध व नाटकी निबंध’ हे दोन खंडी पुस्तक लिहिले. हा त्यांचा अतिशय आवडता साहित्य प्रकार. निबंधातून वैचारिक मांडणी चांगल्या प्रकारे करता येते. विचारांचा व्यापक पट मांडता येतो; पण तसं लेखन मराठीमध्येच होत नसल्याने ‘निबंधा’च्या वाटय़ाला फारसं कुणी जाताना दिसत नाही, कारण त्यासाठी वैचारिक शिस्त असावी लागते आणि चांगल्या प्रकारे विचारही करता यावा लागतो. निबंधाच्या ऱ्हासाविषयी त्यांना सतत खंत वाटत असे.