चमचाभर लिंबाचा रस, एखादं चिंचेचा बुटूक, कैरीची फोड यापकी जास्त आंबट कोण, असं विचारलं तर? तुम्ही काय उत्तर द्याल? या प्रश्नाचं उत्तर आपली जीभच सांगेल.
आंबट पदार्थ म्हणजे रासायनिक भाषेत आम्लधर्मी पदार्थ. एखादा पदार्थ किती प्रमाणात आम्लधर्मी आहे हे त्या पदार्थात असलेल्या हायड्रोजन आयनाच्या संहतीवर अवलंबून असतं. प्रयोगशाळेत एक विशिष्ट प्रकारचा कागद असतो. या कागदाला पी.एच. कागद म्हणतात. आम्लाचं प्रमाण मोजण्यासाठी काही उपकरणंसुद्धा असतात. हे झालं प्रयोगशाळेत असलेल्या साधनांविषयी. आपल्या शरीरातील जीभसुद्धा असंच एक साधन आहे. पदार्थातील आंबटपणाची जाणीव आपल्याला जिभेवर असणाऱ्या रुचिकलिकांमुळे होते. जिभेच्या मागच्या बाजूला असलेल्या रुचिकलिका आंबट पदार्थाना जास्त प्रमाणात प्रतिसाद देतात. जेव्हा एखादा आंबट पदार्थ जिभेच्या पृष्ठभागावर पसरतो तेव्हा एक विद्युत रासायनिक क्रिया होते.
आंबट पदार्थाचे धन प्रभारित आयन आणि ऋण प्रभारित आयन असं विघटन होतं. हायड्रोजनचे धन प्रभारित आयन वेगळे होतात. हे वेगळे झालेले आयन रसांकुराच्या पेशीत शिरतात. रसांकुराच्या पेशीत शिरलेल्या आयनांमुळे चेतापेशींकडं संदेश पाठवला जातो. पदार्थ किती आंबट आहे, हे त्याच्यातील आम्लाच्या रेणूच्या रचनेवर अवलंबून असतं. िलबाच्या रसात सायट्रिक आम्ल, चिंचेतील टार्टरीक आम्ल, व्हिनेगरमधील अॅसेटिक आम्ल ही आपल्या नेहमीच्या आहारातील आम्लं आहेत.
आपल्याला आयुष्यात सर्वप्रथम ओळख होते ती गोड चवीची. लहान बाळाला मध चाटतात तेव्हा ते बाळ मिटक्या मारत खात असतं. आपल्याला हे दृश्य बघायला खूप मजा येते. गोड चव कोणत्याही एका विशिष्ट वर्गामुळे (रासायनिक घटकामुळे) उत्पन्न होत नाही. गोड चवीची जाणीव करून देणाऱ्या ग्रंथी जिभेच्या शेंडय़ावर असतात.
साखर आणि साखरेच्या कुटुंबातील इतर गोड पदार्थ, ग्लायकॉल, अल्डीहाइड, क्यूटोन अमाइड असे कार्बनी पदार्थ रुचिपेशींमध्ये शिरत नाहीत, त्यामुळे या पदार्थाचे जिभेच्या शेंडय़ावर रासायनिक पृथक्करण होत नाही; पण हे पदार्थ जिभेच्या शेंडय़ावरील ग्रंथींच्या टोकावर असलेल्या जी-प्रथिनांशी जोडले जातात. हे जोडले जाताना जी-प्रथिनातील घटक वेगळे होतात आणि रुचिकलिका पेशीतील पोटॅशिअम आयनांचा मार्ग बंद होतो. यामुळे चेतापेशींकडे गोड चवीचा संदेश पाठवला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा