सागवानाच्या शेतीसाठी ४० हेक्टर क्षेत्रात १७-१८ वष्रे एकतर्फी गुंतवणूक करण्यात मोठाच जुगार होता. पण स्वत:ची जिद्द, हिंमत व अथक प्रयत्नांवर पूर्ण विश्वास असल्यामुळे यवतमाळ जिल्ह्य़ाच्या राळेगाव तालुक्यातील भांब गावातील प्रभाकरराव उत्तरवार सागवान शेतीत कमालीचे यशस्वी झाले. उत्तरवार हे १९५५ सालचे नागपूर विद्यापीठाचे कृषी पदवीधारक आहेत. सर्व शेती स्वबळावरच करायची असल्यामुळे कमी त्रासाच्या व देखरेखीच्या पर्यायी शेतीचा स्वीकार त्यांनी केला. कारण अमेरिकेतील मुलाकडे आणि मुंबईतील मुलाकडे वर्षांतून काही काळ घालवण्याची मुभा व मोकळीक त्यांना हवी होती. पण खासगी वनशेतीत आधी १८-२० वष्रे गुंतवणूक करताना त्यात मोठा धोका होता.
सागवानाची लागवड १९९२ पासून प्रथम २० हेक्टरमध्ये सुरू केली. दुसऱ्या वर्षी परत २० हेक्टरमध्ये लागवड केली. सागवान रोपटय़ांशी स्पर्धा नको म्हणून इतर पिके घेणे बंद केले. सुरुवातीला त्यांनी रोपांना युरिया खत दिलं. स्फुरद व पालाश खत न देता उपलब्ध असलेल्या प्रमाणात शेणखत मात्र दर वर्षी दिले. सिंचनासाठी सुरुवातीला दोन विहिरी व नंतर चार टय़ूबवेल्सची निर्मिती केली. झाडांच्या बुंध्यापासून १.२० मीटर उंचीवरील भाग कमीतकमी ६० सेमी व्यासाचा असेल तर इमारती लाकूड म्हणून त्याची विक्री करता येते. सागवानाची लागवड झाल्यानंतर त्याची सातबाऱ्याच्या उताऱ्यामध्ये नोंद केल्यास झाड कापण्यास अडचण येत नाही. शासनाच्या परवानगीपासून झाडांची विक्री होईपर्यंत बरेच सोपस्कार करावे लागतात.
सर्वसाधारणपणे सरासरी रु. २३ हजार प्रति झाड याप्रमाणे ११ हजार झाडांची विक्री केली. या हिशेबानुसार त्यांना काही कोटींमध्ये किंमत मिळाली. विक्रीच्या सोपस्कारासाठी शासकीय परवानगीपासून झाडांची मापाई, कटाई, वाहतूक, देखरेख वगरेंसाठी जवळपास २० लाख रुपये खर्च झाला. अजून अंदाजे ३५ हजार ते ३६ हजार झाडे शिल्लक आहेत. त्यांच्या देखभालीसाठी खर्च होईलच. शिवाय मागणीप्रमाणे भाव कमी-जास्त होत राहील. तरीही पारंपरिक शेतीपेक्षा खचितच तोटय़ात राहणार नाही हे नक्की.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा