सर्व प्रकारच्या फळांतील जीवनसत्वे व खनिजे टिकवण्याचा एक चांगला व स्वस्त मार्ग म्हणजे त्यांच्यापासून आसवे व अरिष्टे बनवणे. हे शास्त्र म्हणजे आपले वाइन तंत्रज्ञानच म्हणता येईल. आयुर्वेदिक औषधांमध्ये आसवे आणि अरिष्टे यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
औषधी वनस्पती जर वाळलेली असेल तर त्या वनस्पतीचे चूर्ण करून किंवा त्या वनस्पतीचा काढा करून ते औषध म्हणून वापरले जाते. काढा करत असताना वनस्पती ओली असेल तर तिचे बारीक तुकडे केले जातात व वाळलेली असेल तर तिचे भरड चूर्ण केले जाते. यात आठपट पाणी घालून ते एक चतुर्थाश इतक्या प्रमाणापर्यंत उकळवले जाते.
दरवेळी ताजा काढा तयार करणे शक्य होत नाही. तसेच काही काळानंतर काढा खराब होतो. त्यामुळे त्यापासून औषधी गुण मिळत नाहीत. कधीकधी तर ते विषासमान होते. हा दोष टाळण्यासाठी संधानक्रिया (फर्मेटेशन) करून औषधांची निर्मिती करतात. वनस्पतींची चुर्णे पाण्याबरोबर मिसळून किंवा वनस्पतींचा काढा करून त्यामध्ये गूळ, साखर, मध यांसारखे गोड पदार्थ मिसळतात. तयार झालेले मिश्रण भांडय़ाचे तोंड बंद करून एक महिन्यापेक्षा अधिक काळ ठेवतात. त्यामुळे संधानक्रिया घडते. तयार झालेल्या औषधास ‘आसव’ म्हणतात.
आसवे आणि अरिष्टे तयार करण्याच्या पद्धतीत थोडासा फरक आहे. द्राक्षापासून तयार करतात ते द्राक्षासव तर मनुकापासून तयार करतात ते द्राक्षारिष्ट. आसवे आणि अरिष्टे यांमध्ये थोडेतरी अल्कोहोल असतेच. त्यामुळे त्यांचा वापर रिकाम्या पोटी करू नये. तसेच त्यामध्ये पाणी मिसळून ते घ्यावे, असे म्हणतात. आसवे चमचा, दोन चमचा घ्यावे असे सांगतात. एवढेच नव्हे, तर त्यावर गरम पाणी पिण्यास सांगतात, म्हणजे त्यांतील अल्कोहोलचे दुष्परिणाम होत नाहीत. मद्याचा उल्लेख खूप वेळा औषध म्हणून करतात, त्याचे हे कारण आहे.
वॉर अँड पीस हाडांचे विकार : भाग ३
अनुभविक उपचार – १) टाचेचे हाड वाढणे- त्रिफळा, लाक्षादि, सिंहनाद या तीन गुग्गुळकल्पांच्या प्रत्येकी तीन गोळ्या बारीक करून दोन वेळा रिकाम्या पोटी गरम पाण्याबरोबर घेणे. बलदायी महानारायण तेलाने टाचेला मसाज करावा. त्यानंतर एका पातेल्यात पाण्यात मीठ मिसळून उकळावे. त्या पाण्यात टाचा बुडवून शेकावे. असे रात्री व सकाळी अंघोळीच्या वेळेस करावे. २) गुडघ्याची हाडे आतल्या बाजूस वाढणे- या विकारात वरीलप्रमाणे औषधी तेलाने मसाज व शेकणे करून पाहावे. ३) मान, पाठ, कंबर यांच्या मणक्यांचे दुखणे- सिंहनाद, लाक्षादि गुग्गुळ, आरोग्यवर्धिनी प्र. तीन गोळय़ा बारीक करून दोन वेळा रिकाम्या पोटी घेणे. ज्या मणक्यांचे विकार आहेत त्या भागातील बाहय़ सुजेवर गोळय़ांचा लेप उगाळून दाट व गरम लेप सकाळ-सायंकाळ लावावा. लेप किमान दोन तास किंवा जास्त ठेवावा. काढताना गरम पाण्यात मीठ टाकून शेकावे. गादीवर झोपू नये. ४) मणक्यातील चकत्या झिजणे- क्र. ३ प्रमाणे उपचार. अश्वगंधापाक सकाळ-सायंकाळ २ चमचे कृश व्यक्तींनी घ्यावा. शवासनात फळीवर कटाक्षाने दीर्घकाळ सकाळ-सायंकाळ झोपून राहावे. ५) हाडय़ाव्रण – लाक्षादि घृत सकाळ-सायंकाळ दोन चमचे एक कप गरम दुधाबरोबर; सोबत आरोग्यवर्धिनी, त्रिफळागुग्गुळ, प्रवाळ, लाक्षादिगुग्गुळ प्र. ३ गोळ्या दोन वेळा घेणे. ६) हाड मोडणे- मोडलेले हाड जुळून येण्यास लाक्षादिगुग्गुळ आभादिगुग्गुळ प्र. ६ गोळ्या दोन वेळा घ्याव्यात. सोबत लाक्षादिघृत दोन चमचे घ्यावे. पिंपळलाखचूर्ण, अर्जुनसाल व गहू यांचे सिद्ध दूध घ्यावे. बाभळीच्या बियांचे चूर्ण तूपमधाबरोबर घ्यावे. लसूण, मध, लाख, साखर यांचा एकत्र वाटलेला कल्प सकाळ-सायंकाळ घ्यावा. ७) बालकांचा मुडदूस- ज्वरांकुश, लाक्षादिगुग्गुळ ३ गोळ्या दोन वेळा बारीक करून देणे. दोन्ही जेवणानंतर आरोग्यकाढा तीन चमचे समभाग पाण्याबरोबर घेणे. ८) पायांच्या लांबीत कमीअधिकपणा असणे- लाक्षाचूर्ण एक चमचा ऋतुपरत्वे निरनिराळय़ा औषधांबरोबर मिसळून नेमाने वर्षभर देणे. आस्कंद, शतावरी, सुंठ, भुईकोहळा इत्यादी औषधे वापरावीत.
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत ४ जुलै
१८९० > कवी, कादंबरीकार, काव्यसमीक्षक नारायण केशव बेहेरे यांचा जन्म.‘सीता वनवास’, ‘हिंदू कोण’, ‘ध्येयाकडे’ इ. कादंबऱ्या. ‘मोत्यांची माळ’ या काव्यसंग्रहात ३०७ कविता समाविष्ट आहेत. ‘सप्तर्षी’ या कवितेमुळे त्यांना ब्रिटिशांनी शिक्षण खात्यातून बडतर्फ केले.
१९८०> आपल्या कथा-कादंबऱ्यांतून शेतकरी आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न हाताळणाऱ्या रघुनाथ वामन दिघे यांचे निधन. ‘पाणकळा’ या पहिल्याच कादंबरीतून दिघ्यांची लेखनातील मनोहारी वैशिष्टय़े स्पष्ट झाली. ग्रामीण व कृषिजीवनाच्या वास्तववादी चित्राचे दर्शन त्यांच्या ‘आई शेतात आहे’ व ‘पड रे पान्या’ या कादंबऱ्यांतून दिसते. सराई, पूर्तता, निसर्गकन्या, रानजाई या कादंबऱ्यांनी दिघ्यांना प्रादेशिक कादंबरीकार, असा नावलौकिक मिळवून दिला.
१९९६> रहस्यकथा लेखक चंद्रकांत सखाराम चव्हाण ऊर्फ बाबुराव अर्नाळकर यांचे निधन. १९३६ ते ८४ या काळात त्यांनी १०९२ रहस्यकथा लिहिल्या. याची नोंद १९८५ साली गिनिज बुकात घेतली गेली.
२००२> ऐतिहासिक पुस्तकांचे लेखक आणि महाराष्ट्र राज्य पाठय़पुस्तक मंडळाच्या इतिहास समितीचे अध्यक्ष प्रा. डॉ. अरविंद देशपांडे यांचे निधन.
संजय वझरेकर
जे देखे रवी.. लढा-३
भालचंद्र (इॅ) देशमुख मुंबईचे आयुक्त होते. त्यांनी मला मोठय़ा सूचकपणे हिंदुजा या उद्योगपतीची माझ्या घराच्या शेजारच्या भूखंडावर कशी वक्रदृष्टी आहे हे सांगितले. त्या काळात हिंदुजा एक मोठे प्रस्थ होते. बोफोर्स घोटाळा अजून व्हायचा होता. यांचे साम्राज्य अनेक देशांत होते आणि इराणमधे यांच्या धंद्याचे केंद्र होते. हल्लीचे अंबानी तसे त्या काळचे हिंदुजा आणि मी एक चळवळी लाल मुंगी. याचा त्या भूखंडाबद्दलचा आराखडा बघून मला उंल्लूी१ हा शब्द आठवला. ही होऊ घातलेली विकृती आधीच छाटून त्याचे विघटन करावे आणि त्यातून सुघटन शस्त्रक्रिया करावी (ढ’ं२३्रू र४१ॠी१८) असे मनाने घेतले आणि त्यात मी स्वत:ला पार लोटून दिले. त्यावेळी अनेक माणसांना भेटलो. हा भूखंड मुळात स्कॉटिश शाळेचा. मागचा सलग भूखंड त्यांनी घेतला आणि हा महापालिकेने रीतसर घेतला. आता हा भूखंड हिंदुजाच्या घशात घालण्यासाठी सरकार आणि महानगरपालिकेत जणू चढाओढ लागली होती. एक गोष्ट नमूद करतो. हा लढा अनेक वर्षे चालला पण हिंदुजा हा वैरी कसा का लोभी असेना, सौम्य होता. कधी धाकदपटशा, मारामारी, दमबाजी झाली नाही. जे झाले ते वैधानिक झाले. त्याला आमच्याकडून चळवळीचे स्वरूप होते. पण ही चळवळ मध्यमवर्गीयांची होती आणि ती ज्यांना मराठीत ‘साव’ म्हणतात त्यांच्याशी होती. एक गंमत घडली. ही चळवळ आम्ही जिंकल्यावर हिंदुजांनी अमेरिकेत संगणक संबंधित मोठा व्यावसाय सुरू करण्याची योजना आखली आणि मुख्य प्रशासकीय अधिकारी नेमण्यासाठी जाहिरात दिली. माझ्या अमेरिकेतल्या धाकटय़ा भावाने अर्ज केला. त्याची रीतसर मुलाखत एक तास चालली. हिंदुजा बंधू हजर होते. त्याचे नाव बघितल्यावर त्यांनी भुवया चढवल्या. माझा भाऊ म्हणाला, ‘होय मी रविन थत्तेचा सख्खा धाकटा भाऊ आहे.’ तेव्हा हिंदुजा म्हणाले, ‘ते तिथे, हे इथे. आम्ही मनात ते ठेवलेले नाही. एक नक्की. तू जर त्याचा भाऊ असशील तर प्रामाणिक असणार. तुला आम्ही नेमत आहोत.’ पुढे ही कंपनी बारगळली, पण जग किती लहान असते याचा प्रत्यय आला.
स्कॉटिश शाळेचे प्राचार्य गमेलियल नावाचे पंतोजी होते. ते आमच्या चळवळीचे समर्थक होते. एकदा त्यांच्या शाळेतले एक धेंड मला म्हणाले, ‘हा भूखंड पूर्वी आमचा होता. आम्ही रीतसर दिला हे कबूल, परंतु या चळवळीतून तो आम्हाला परत मिळाला तर बरे होईल.’ मी उठलो आणि गमेलियलना म्हणालो ‘याला इथून हकला नाहीतर माझा तुम्हाला रामराम’ एका घावात तो मामला सुटला. मराठी माध्यमात शिकलेला मी आणि उत्कृष्ट इंग्रजी व्याकरण शिकवणारे गमेलियल यांची तार जमली. तो एक झपाटलेला काळ होतो.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com