सर्व प्रकारच्या फळांतील जीवनसत्वे व खनिजे टिकवण्याचा एक चांगला व स्वस्त मार्ग म्हणजे त्यांच्यापासून आसवे व अरिष्टे बनवणे. हे शास्त्र म्हणजे आपले वाइन तंत्रज्ञानच म्हणता येईल. आयुर्वेदिक औषधांमध्ये आसवे आणि अरिष्टे यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
औषधी वनस्पती जर वाळलेली असेल तर त्या वनस्पतीचे चूर्ण करून किंवा त्या वनस्पतीचा काढा करून ते औषध म्हणून वापरले जाते. काढा करत असताना वनस्पती ओली असेल तर तिचे बारीक तुकडे केले जातात व वाळलेली असेल तर तिचे भरड चूर्ण केले जाते. यात आठपट पाणी घालून ते एक चतुर्थाश इतक्या प्रमाणापर्यंत उकळवले जाते.
दरवेळी ताजा काढा तयार करणे शक्य होत नाही. तसेच काही काळानंतर काढा खराब होतो. त्यामुळे त्यापासून औषधी गुण मिळत नाहीत. कधीकधी तर ते विषासमान होते. हा दोष टाळण्यासाठी संधानक्रिया (फर्मेटेशन) करून औषधांची निर्मिती करतात. वनस्पतींची चुर्णे पाण्याबरोबर मिसळून किंवा वनस्पतींचा काढा करून त्यामध्ये गूळ, साखर, मध यांसारखे गोड पदार्थ मिसळतात. तयार झालेले मिश्रण भांडय़ाचे तोंड बंद करून एक महिन्यापेक्षा अधिक काळ ठेवतात. त्यामुळे संधानक्रिया घडते. तयार झालेल्या औषधास ‘आसव’ म्हणतात.
आसवे आणि अरिष्टे तयार करण्याच्या पद्धतीत थोडासा फरक आहे. द्राक्षापासून तयार करतात ते द्राक्षासव तर मनुकापासून तयार करतात ते द्राक्षारिष्ट. आसवे आणि अरिष्टे यांमध्ये थोडेतरी अल्कोहोल असतेच. त्यामुळे त्यांचा वापर रिकाम्या पोटी करू नये. तसेच त्यामध्ये पाणी मिसळून ते घ्यावे, असे म्हणतात. आसवे चमचा, दोन चमचा घ्यावे असे सांगतात. एवढेच नव्हे, तर त्यावर गरम पाणी पिण्यास सांगतात, म्हणजे त्यांतील अल्कोहोलचे दुष्परिणाम होत नाहीत. मद्याचा उल्लेख खूप वेळा औषध म्हणून करतात, त्याचे हे कारण आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा