जीभ आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव. चवीची किंवा रुचीची जाणीव करून देणं हे या जिभेचं काम. रुचीची संवेदना करून देणाऱ्या विशिष्ट ग्रंथी जिभेवर असतात त्यांना रुचिकलिका (टेस्ट बड) म्हणतात. आपल्या जिभेवर साधारणपणे १०,००० रुचिकलिका असतात. आकारानुसार तीन प्रकारच्या रुचिकलिका आपल्या जिभेवर असतात. जिभेच्या मागच्या बाजूला लहानशा उंचवटय़ासारख्या गोलाकार रुचिकलिका असतात. जिभेच्या शेंडय़ावर कवकासारख्या किंवा दांडय़ाच्या आकाराच्या कवकरूपी रुचिकलिका असतात. तंतूरूपी कलिका जिभेच्या पृष्ठभागावर सगळीकडे पसरलेल्या असतात. बहिर्वक्र िभगाने जर आपण जिभेचं निरीक्षण केलं तर हे लहान लहान उंचवटय़ासारखे भाग आपल्याला स्पष्ट दिसतात. तसेच प्रत्येकाच्या तोंडातील रुचिकलिकांची संख्या आणि आकार थोडाफार वेगळा असतो. रुचिकलिकांमध्ये तयार झालेली संवेदना मेंदूपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीचं काम रुचिकलिका करतात. रुचिकलिकांचे आयुष्य दहा ते पंधरा दिवसांचं असतं. कोणत्याही रुचिकलिका एका विशिष्ट चवीला प्रतिसाद देत नाहीत, पण एका चवीला जास्त प्रतिसाद देतात. सर्वच पदार्थाची चव आपल्याला कळत नाही. जर पदार्थ पाण्यात विरघळणारा असेल आणि शिवाय त्या पदार्थाला विशिष्ट रासायनिक संरचना असेल तरच चवीचे ज्ञान होते. एखादा पदार्थ आपल्या जिभेच्या पृष्ठभागावरील लाळेत विरघळला की सर्वप्रथम त्यात असलेले रसायनातील घटक वेगळे होतात. रासायनिक घटकाच्या स्वरूपानुसार रुचिकलिका रसाकुरांच्या मदतीनं चेतापेशींपर्यंत हा संदेश पोहोचवतात. चेतापेशी हा संदेश मेंदूकडे पाठवतात. ही प्रक्रिया काही क्षणात घडते. ही एक विद्युत रासायनिक यंत्रणा आहे. शिवाय पदार्थाच्या या वेगवेगळ्या चवी ह्य़ा त्यातील रासायनिक घटकांबरोबरच पदार्थाच्या तापमानावरही अवलंबून असतात. पदार्थ फार गरम असेल तर त्याची चव नीट समजत नाही आणि पदार्थ अति थंड असेल तरी तो खाताना जीभ थंड झाल्याने रुचिकलिकांची संवेदनक्षमता कमी होते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून गोड, आंबट, खारट आणि कडू अशा चार चवी मूलभूत म्हणून मानल्या जातात. या मूलभूत चार चवींची संवेदना जिभेवर वेगवेगळ्या ठिकाणी होते. गोड चव जिभेच्या टोकाला आंबट आणि खारट तिच्या बाजूला तर पाठीमागच्या बाजूला कडू चवीची संवेदना होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा