एकंदरीत प्राचीन काळापासून भारतामध्ये वस्त्रे निर्माण करण्याची परंपरा असल्याचे स्पष्ट होते. एका चाटुश्लोकामधील हास्यरसपूर्ण श्लोकात म्हटले आहे.
किं वाससा इत्यत्र विचारणीयं
वास: प्रधानं खलु योग्यताय।
पीताम्बरं वीक्ष्य ददौ स्वकन्यां
दिगम्बरं वीक्ष्य विषं समुद:
या सदरामधून समग्र वस्त्रविश्व व प्रक्रियांविषयी आपणास सजाण करणे हा हेतू आहे. या क्षणी वस्त्राच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीकडे कटाक्ष टाकणेही सयुक्तिक ठरावे. हे सदर सर्वसमावेशक व्हावे यादृष्टीने वस्त्रांसंबंधित सर्व क्षेत्रांतील तज्ज्ञ त्यांच्या अनुभवावर आधारित ज्ञान वाचकांसमोर मार्गदर्शनार्थ ठेवणार आहेत. या ज्ञानदानाचा केंद्रिबदू वस्त्र परिधान करणारा सामान्य माणूस असेल. आपल्या अवतीभवती माणूस नजर टाकेल तर त्याच्या लक्षात येईल की, दरवाजातील पायपुसणे, घरांचे पडदे, सोफ्याचे कापड, बठकीच्या खोलीतील टेबलावरचा टेबलक्लॉथ, दिवाणखान्यातील गालिचा ते स्वयंपाकघरातील अंगावरचा अॉप्रन, थंडीतील गरम वस्त्र ते उन्हाळ्यातील शीतवस्त्र, अंगावर घ्यायचे पांघरूण ते जुनी आजीची गोधडी, विविध रंगांतील बेडशीट, अंगावरचं उबदार जाकीट ते विजारीतला रुमाल सर्व काही बनतात या वस्त्रातून!
विज्ञान-तंत्रज्ञान आणि निसर्गातील वरदान ठरलेले प्रामुख्याने कापसासारखे तंतू यांच्या संगमातून आपल्या दैनंदिन जीवनाचे किती मोठे विश्व वस्त्रनिर्मितीचा भाग आहे पाहिलेत? कापसाचे तंतू आपला प्रवास सुरू करतात मोठय़ा मशीनच्या अनंत भागांशी संवाद करत; रासायनिक प्रक्रियांशी एकात्मता साधत. या प्रवासात होणारे सर्व संस्कार ते विनातक्रार स्वीकारतात. स्वत:त हवे ते परिवर्तन घडवत मोठा प्रवास करत, वस्त्र म्हणून आपल्यापर्यंत पोहोचतात. या सर्व प्रवासाचा आढावा निरनिराळ्या स्तरांवर आपण घेणार आहोत
१.उत्पत्ती
२. उत्पादन
३. दर्जा
४. विपणन
५. ग्राहक
६. उपयुक्तता निकष
प्रत्येक स्तरावर मूळ तत्त्वावर मूल्यवृद्धी होत असते. मूल्यवृद्धीची दोन अंगे आहेत. प्रत्येक स्तरावर मूळ तत्त्वाचे स्वरूप बदलते त्यावर होणारा अर्थव्यय हे जसं मूल्यवृद्धीचं अंग आहे तद्वतच गुणात्मक मूल्यवृद्धी हे दुसरे अंग आहे. यांचा उपभोक्त्यावर व उपयुक्ततेवर होणारा परिणाम याविषयी ग्राहकाला सुजाण करणे हे एक प्रयोजन आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा