सुस्वागतम! या वर्षीच्या ‘कुतूहल’ सदरामधे सुहृद, विषयतज्ज्ञ, लेखक, वाचक, हितचिंतक, व्यासंगी सर्वाचे स्वागत. या सदरात ‘वस्त्रोद्योग’ या विषयावर लेखमालिका ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्रात सुरू करताना सर्व लेखकांना आनंद होत आहेच आणि जबाबदारीचं भानही आहे. या सदराचं प्रयोजन आहे आपल्याला अनभिज्ञ असलेल्या आपल्या शाश्वत सान्निध्याचं, आपल्या दुसऱ्या त्वचेचं, वस्त्राचं जाणीवपूर्वक आकलन करून घेणं.
आमची भूमिका
मनुष्यप्राण्याला वास्तवत: दोन त्वचा असतात. प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना बरोबर घेऊन येते ती एक मूलभूत व अविभाज्य त्वचा. जीवन जगण्यास आवश्यक असलेली दुसरी त्वचा म्हणजे वस्त्र. निसर्गदत्त त्वचेची मूलभूत निर्मितीप्रक्रिया आम्हाला अनाकलनीय आहे. पाश्चात्त्य वैद्यक शास्त्रालासुद्धा शरीराचं ज्ञान आयुर्वेदाच्या तुलनेत अतिशय जुजबी आहे. वस्त्रांच्या निर्मितीची विशिष्ट प्रक्रिया अनाकलनीय नाही म्हणून या वस्त्र निर्मितीच्या प्रक्रियेबद्दल व समग्र वस्त्रविश्वाबद्दल आम्ही वस्त्रोद्योग सदरातून आपल्याशी हितगुज करणार आहोत. या वस्त्रविश्वाचं अस्तित्व ५००० वर्षांपासून उपभोक्त्याला ज्ञात आहे. वस्त्रांचा व वस्त्रनिर्मितीचा उल्लेख वेदांमध्ये आढळतो.
ईश उपनिषदात ‘ईशावास्यम या पदामध्ये ‘वास्यम’ या पदाचा अर्थ ‘वस्त्राच्छादित करावे असे’ किंवा ‘वस्त्राप्रमाणे अंगावर घ्यावे’ असा आहे. वेदिक पूर्व व उत्तर (वेदान्त)कालीन रूपकात्मक विवरणाच्या पद्धतीला अनुसरून हा संदर्भ इथे चपखल बसतो. वस्त्रांच्या निर्मितीचा उल्लेख वेदांमध्ये कसा आढळतो ते पाहा. वेदकालीन ऋषी भरद्वाज बार्हस्पत्य; देवता वैश्वानर अग्नि; त्रिष्टुम् – विणकाम कला या सूक्तातील दुसऱ्या ऋचेमध्ये उभ्या-आडव्या धाग्यांनी विणलेल्या वस्त्राचं रूपक आढळतं. ऋग्वेदामध्ये जरतारी वस्त्राचा उल्लेख ‘हिरण्यद्रपी’ म्हणूनसुद्धा आला आहे. अनेक धार्मिक ग्रंथांत अनंत वल्कलांचा उल्लेख आहे. उदा. महाभारतामध्ये याचा उल्लेख मणिचिरा असा करण्यात आला आहे. यामध्ये जरतारी कामाबरोबरच माणिक-मोती व मौल्यवान हिरे गुंफण्याच्या नोंदी मिळतात. मौल्यवान रेशमी वस्त्रांचा उल्लेख जैन साहित्यामध्ये पट्टा या नावाने करण्यात आला आहे. आणि महाराष्ट्रातील मौल्यवान वस्त्रांचा विचार केल्यास महानुभाव साहित्यामध्ये पठणच्या भरजरीचा उल्लेख आढळतो. पाश्चिमात्य प्रवाशांच्या नजरेतूनसुद्धा अशा प्रकारची वस्त्रं व ही वस्त्रं निर्माण करणारी केंद्रं सुटली नाहीत.
वस्त्रोद्योग लेख १ : वस्त्र- ईशावास्यम
सुस्वागतम! या वर्षीच्या ‘कुतूहल’ सदरामधे सुहृद, विषयतज्ज्ञ, लेखक, वाचक, हितचिंतक, व्यासंगी सर्वाचे स्वागत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 01-01-2015 at 12:13 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Curiosity textile industry