एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात व्हिस्कोज या पहिल्या मानवनिर्मित तंतूचा शोध लागला. त्यानंतर व्हिस्कोजनंतर अनेक पुनर्जनित तंतू विकसित झाले. हे पहिल्या पिढीतील मानवनिर्मित तंतू होत. इ.स. १९३५ साली नायलॉन या संश्लेषित तंतूच्या निर्मितीपासून दुसऱ्या पिढीतील तंतूंच्या निर्मितीस प्रारंभ झाला, त्यानंतर पॉलिस्टर, अॅक्रिलिक, पॉलीप्रॉपिलिन, असे अनेक तंतू उदयास आले. या वेळेपर्यंत नसíगक तंतूंचे पर्यायी तंतू अशीच मानवनिर्मित तंतूंची ओळख होती. परंतु गेल्या पाव शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीने वस्त्रोद्योगापुढे नवी नवी आव्हाने उभी केली. या आव्हानांची पूर्ती करणे हे नसíगक व पहिल्या व दुसऱ्या पिढीतील मानवनिर्मित तंतूंच्या आवाक्याबाहेरचे होते. त्यामुळे विशिष्ट उपयोग डोळ्यासमोर ठेवून त्याला लागणारे गुणधर्म असणारे तंतू निर्माण करावेत असा विचार शास्त्रज्ञांनी केला. अमेरिका, युरोप आणि आशिया खंडातील प्रगत देशांमध्ये यासंबंधीच्या संशोधनांनी जोर धरला. आणि त्यातूनच मानवनिर्मित तंतूंच्या तिसऱ्या पिढीचा विकास झाला. या तंतूंना उच्च कार्यक्षमता तंतू किंवा उच्चतंतू असे संबोधले जाते. सर्वसामान्यांच्या गरजांशी या तंतूंचा फारसा संबंध येत नाही त्यामुळे त्यांचे उत्पादन मर्यादित प्रमाणातच केले जाते. मात्र त्या त्या क्षेत्रात हे तंतू फार मोलाची कामगिरी बजावीत आहेत.
उच्च कार्यक्षमता या नावाप्रमाणेच या तंतूंमध्ये ताकद, लंबन क्षमता, स्थितिस्थापकत्व, उष्णतारोधकता, ज्वलनरोधकता, विशिष्ट रासायनिक द्रव्यांना रोधकता यासारखे गुणधर्म अतिशय उच्च कोटीचे असतात.
उच्च कार्यक्षमता तंतू या वर्गात अनेक तंतू येतात आणि प्रत्येकाचे कार्यक्षेत्र वेगळे असते. त्यांच्या संभाव्य उपयोगाप्रमाणे अतिशय उच्च कोटीची तन्यता, उष्णतारोधकता, विद्युतरोधकता, रसायनरोधकता इत्यादी गुणांची आवश्यकता असते. या विविध गरजा पूर्ण करणारे वेगवेगळे तंतू विकसित करण्यात आले आहेत. या तंतूच्या विविध प्रकारच्या गुणधर्मामुळे या तंतूंचा वापर जमिनीची धूप थांबवणाऱ्या भूवस्त्रापासून, संरक्षण, क्रीडा, उद्योग अशा अनेक क्षेत्रांमध्ये केला जात आहे. म्हणूनच एका दृष्टीने पाहिले असता हे सर्व असामान्य तंतू आहेत.
संस्थानांची बखर: संस्थान जिंद
सध्याच्या हरियाणात उत्तरेकडे असलेल्या जिंद जिल्ह्य़ात स्वातंत्र्यपूर्व काळात जिंद हे महत्त्वाचे संस्थान होते. जैसलमेरचा संस्थापक जैसल याच्या मुलाने कौटुंबिक कलहाला कंटाळून भटिंडा येथे आपले छोटे राज्य स्थापन केले. पुढे गादीचा शीख वारस चौधरी फूल याने कारभाराची घडी नीट बसवून जिंद आणि नाभा हे परगणे घेतले. चौधरी फूलने आपला थोरला मुलगा गुरुदत्तसिंग याला नाभा, तर दुसरा मुलगा गजपतसिंग याला जिंद हा परगणा दिला. १७६३ मध्ये गजपतसिंगने जिंद येथे भव्य किल्ला बांधून तेथे आपली राजधानी वसविली.
१७६८ साली मोगल बादशाह शाहआलम द्वितीय याने त्याला राजा हा किताब देऊन स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. गजपतसिंगांची मुलगी बीबी कौरचा विवाह सरदार महानसिंगाशी झाला व तिचा मुलगा पुढे महाराजा रणजीतसिंग म्हणून विख्यात झाला.
गजपतसिंगच्या मृत्यूनंतर गादीवर आलेला त्याचा मुलगा भागसिंग अत्यंत धूर्त होता. त्याने १८०९ साली ब्रिटिशांशी संरक्षण करार करून तनाती फौज राखली. पक्षाघाताचा झटका आल्यामुळे विकलांग झालेल्या राजा भागसिंगाने आपला थोरला मुलगा प्रतापसिंग याने आपल्या वतीने राज्य प्रशासन पाहावे, अशी इच्छा ब्रिटिशांकडे व्यक्त केली, परंतु प्रतापसिंगाच्या मनात ब्रिटिश सत्तेविषयी असलेल्या अढीची जाणीव असल्याने कंपनी सरकारने प्रतापसिंगास रिजंट न नेमता राणी सुब्राहीला १८१३ रोजी भागसिंगाची रिजंट नेमले. यामुळे संतप्त प्रतापसिंगने बंडाचे हत्यार उपसले. या बंडात राज्याची फौजही सहभागी झाली. त्याने जिंदचा किल्ला ताब्यात घेऊन राणीला कैद करून ठार मारले. हे कळल्यावर सावध झालेल्या कंपनी सरकारच्या दिल्ली येथील निवासी अधिकाऱ्याने आपली फौज प्रतापसिंगशी सामना करण्यासाठी पाठवली. प्रतापसिंगला फूलसिंग अकालीचीही साथ होतीच. दोन्ही फौजांमध्ये झालेल्या तुंबळ युद्धात प्रतापचा पराभव झाला. त्याला पकडून कैदेत टाकले गेले. दिल्ली येथे कैदेतच १८१६ साली तो मृत्यू पावला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com