आपल्या श्वासोच्छ्वासात कार्बन डायऑक्साइड हा वायू असतो. वनस्पती या वायूचा वापर करून शर्करा तयार करीत असतात. आपल्या श्वसनातील बायप्रोडक्ट म्हणून हा कार्बन डायऑक्साइड वायू आपण श्वासातून मुक्त करतो. वातावरणात वावरणारा कार्बन डायऑक्साइड हा हरितगृह वायूच्या रूपात असतो. तो वायू सोडा वॉटर, थंड पेयांत वापरतात. याच्यापासून कोरडा बर्फ तयार करून औद्योगिक क्षेत्रात वापरला जातो. हा वायू विषारी आहे का, अशी शंकाही आपल्याला येत नाही. पण खरंच तो विषारी आहे? साधारणत: कार्बन डायऑक्साइड वायू विषारी नसतो. आपल्या पेशीतील ज्वलनातून मुक्त झाला की तो रक्तप्रवाहात घुसतो. मग फुप्फुसातून बाहेर पडतो. तरीही तो शरीरभर वावरत असतो.
परंतु जर का आपल्या श्वसनात तो मोठय़ा प्रमाणात आला किंवा आपण प्लास्टिक बॅग किंवा एखाद्या तंबूत वास्तव्य करून पुन:पुन्हा श्वास घेतला आणि जर वायुविजनची सोय नसेल तर या वायूने विषबाधा होऊ शकते. कार्बन डायऑक्साइड वायूच्या विषबाधेचा ऑक्सिजन वायूच्या प्रमाणाशी संबंध नसतो. श्वसनातून पुरेसा ऑक्सिजन मिळत असला तरी कार्बन डायऑक्साइडच्या रक्तातील व ऊतीतील अवाजवी प्रमाणाने काही दुष्परिणामांना तोंड द्यावे लागतेच. रक्तदाबातील वाढ, डोकेदुखी, त्वचेचे फुगणे आणि स्नायूचे आखडणे या त्रासांचा भडिमार होतो. त्याचे प्रमाण वाढले तर हृदयक्रिया अनियमित होणे, जीव घाबरणे, उलटय़ा होणे, बेशुद्ध होणे किंवा मृत्यू येणे या विपरीत गोष्टी घडू शकतात. या विषबाधेला ‘हायपर कॅप्निया’ किंवा ‘हायपर कार्बयिा’ असे नाव आहे. शरीरातील कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण अती प्रमाणात वाढले आणि या वायूचा शरीराशी दीर्घकाळ संपर्क आला की वरील जैवरासायनिक प्रक्रिया घडतात. त्यास कारणीभूत ठरणाऱ्या काही बाबी म्हणजे फुप्फुसाचे विकार, बेशुद्ध अवस्था, कमी वायुविजन, निद्राविकारावर ऑक्सिजनचा उपाय करतो त्या वेळचा प्रारंभीचा परिणाम, ज्वालामुखीच्या उद्रेकातील वायू श्वासात जाणे, श्वास रोखून धरणे, कमी दाबाच्या हवेत वावरणे (उदा. अंतराळ, खाणी, बोगदा, बंदिस्त खोली.) इत्यादी.
मनमोराचा पिसारा: जगण्याविषयीच्या लख्ख जाणिवा प्रज्वलित करण्यासाठी..
ध्यानधारणेवरील पुस्तक कसं असायला हवं? मुळात पुस्तकामार्फत ‘ध्यानधारणे’ची प्रक्रिया शिकवता येते का? ध्यानधारणा हा शिकवण्याचा विषय आहे की शिकण्याचा? असे अनेक प्रश्न मनात घेऊन ‘सेटलिंग बॅक इन टू द मोमेंट’ हे पुस्तक हाती घेतलं.
आपल्या विचार परंपरेमध्ये गुरूला अपरंपार महत्त्व आहे. कोणत्याही आध्यामित्क संपदेवरील ग्रंथ वाचा. गुरूला पर्याय नाही, असं ठासून सांगितलेलं असतं. त्या विचाराला छेद देणारं हे पुस्तक आहे. मुळात पुस्तकाची रचना अतिशय जाणीवपूर्वक आनादि-अनंद अशा स्वरूपाची आहे. आपल्यापुढील प्रश्न, विषयाची ओळख, विस्तार, चर्चा, निकष आणि निष्कर्ष अशा मांडणीला बाजूला सारून सुरुवात नसलेलं आणि शेवट न करणारं हे पुस्तक आहे.
जणू काही काळाचा प्रवाह अखंड असल्यानं काल, आज आणि उद्या हे संदर्भ निर्थक म्हटले पाहिजेत. म्हणूनच कुठल्याही पानावर उघडा, वाचा पुढे जा, मागील पानाकडे वळून पाहा अशा स्वरूपात मांडणी आहे. ध्यानधारणा हा विषय अमूर्त आणि आविष्काराच्या मर्यादांमुळे खुंटीत आणि अबोध राहिला. कदाचित हा गूढवाद आहे असा बुद्धिवाद्यांचा समज होईल आणि तर्काच्या तलवारी घेऊन चाल करून येतील.
ध्यानधारणा हा अनुभव गूढवादी नसून शब्दातीत आहे. नेमक्या, मोजक्या आणि अचूक शब्दात त्या प्रक्रियेचं वर्णन करता येणार नाही. मुळात ही प्रोसेस अनुभवात्मक आहे. स्व-संवेद्य आहे. त्या अनुभवाची गुणवत्ता तपासता येईल, पण त्या अनुभवांना मोजता येणार नाही. ती अनुभूती क्वांटिफायेबल नसते. म्हणूनच आधुनिक भौतिक विज्ञानवाद्यांना स्वानुभव आणि केवळ वर्णन करून सांगता येण्याजोग्या गोष्टींना अवैज्ञानिक ठरवून त्या अनुभवांना झिडकारलं! मानसविज्ञान आणि भौतिकशास्त्रामधला हा जुना संघर्ष आहे. अर्थात, मेडिटेशन या प्रक्रियेचा आता अत्यंत आधुनिक तंत्राच्या मदतीने पेटस्कॅन, फंक्शनल एमआरआय, ईईजीचा साद्यंत संशोधनात्मक अभ्यास झालेला आहे आणि ‘सायंटिफिक’ असण्याचा शिक्काही मिळाला आहे. पण याची दखल बहुतेक विज्ञानवादी घेत नाहीत.
परंतु मेडिटेशनवरील काही पुस्तकं अशा बचावात्मक वैज्ञानिक पवित्र्याला सोडून शुद्ध अनुभवांवर आधारित विवेचन करीत आहेत. कोणत्याही प्रकारे वैज्ञानिकतेचा दावा न करता, ध्यानधारणा या विषयावर कविता आणि सुवचनांची मांडणी इथे केलेली आहे. अमूर्त विषय सांगण्यासाठी वापरलेली अभिव्यक्ती गद्यवजा धडे अशी न करता पद्यरचनेत केली आहे.
ध्यानधारणा ही एके जागी ठाम बसून न करता, दैनंदिन जीवन जगण्याची ती प्रोसेस आहे, याचं भान जागोजागी जाणवतं.
सर्वसाधारणपणे, ध्यानधारणा शिकवण्याकरता साधक आश्रम, संस्था अशा रिट्रीटमध्ये सहभागी होतात. सामान्यत: अशा रिट्रीट निसर्गानं नटलेल्या सुशांत परिसरात घडतात. तिथलं वातावरण संपूर्णपणे नियंत्रित असतं. गुरूंच्या उपस्थितीने नियंत्रित असतं. गुरूंच्या उपस्थितीने अथवा पूजा-अर्चा, मंत्र-भजनादी गोष्टीने भारलेलं असतं. त्या ठिकाणी असलेल्या वातानुकूलित सभागृहात ध्यानधारणा बहुतेकांना जमते. मात्र रोजचं धकाधकीचं जीवन सुरू झालं की रिट्रीटमधला तो रम्य परिसर, शांतमुद्रेनं वावरणारे साधक, सात्त्विक आहार या गोष्टी परग्रहावर असल्यासारख्या परक्या होतात. शीतल, प्रसन्नदायी शांती हा केवळ अनुभव असतो. त्या अनुभवांपलीकडे आत्मज्ञान असतं. ही जाणीव रिट्रीटमध्ये मनात रुजत नाही. त्यामुळे अशा अनुभवांभोवती मन घुटमळतं आणि त्या अनुभवांना मुकलो तर ध्यानधारणेवरचा विश्वास उडतो.
अशा वेळी मनात याविषयावरची सुवचनं घोळत राहिली तर मनाला प्रेरणा मिळते. असे विचार नि कविता स्फूर्तिदायक ठरतात. चिंतन हीदेखील ध्यानधारणेची साधना असते. त्या चिंतनामधून स्वत:च्या जगण्याविषयी विलक्षण साक्षात्कारी समज आणि आत्मज्ञान प्राप्त होतं. अशी ‘इनसाइट’ मनात विजेसारखी लखलखते. त्या प्रकाशात स्वत:विषयी, जगण्याविषयी आणि जीवनाविषयी लख्ख जाणिवा प्रज्वलित होतात.
डॉ.राजेंद्र बर्वे
प्रबोधन पर्व: स्वातंत्र्य, समता नि बंधुभाव
‘‘माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे. ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. तथापि हे माझे तत्त्वज्ञान फ्रेंच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले आहे असे कोणीही समजू नये. मी ते उसने घेतलेले नाही. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत; राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध याच्या शिकवणीपासून ते मी काढले आहे. माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समता यांना जागा आहे. परंतु अपरिमित स्वतंत्रतेने समतेचा नाश होतो आणि निर्भेळ समानता स्वातंत्र्याला वाव ठेवीत नाही. माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य नि समता यांचे उल्लंघन होऊ नये म्हणून, केवळ संरक्षण म्हणून र्निबधाला स्थान आहे. परंतु र्निबध हा स्वातंत्र्य नि समता यांसंबंधी होणाऱ्या उल्लंघनाविरुद्ध हमी देऊ शकतो असा माझा विश्वास नाही. माझ्या तत्त्वज्ञानात बंधुतेस फार उच्च स्थान आहे. स्वातंत्र्य नि समता यांच्याविरुद्ध संरक्षण फक्त बंधुभावनेचेच आहे. त्याचेच दुसरे नाव बंधुता किंवा मानवता. आणि मानवता हेच धर्माचे दुसरे नाव होय. ’’
३ ऑक्टोबर १९५४ रोजी आकाशवाणीवर झालेल्या ‘माझे वैयक्तिक तत्त्वज्ञान’ या मालिकेतील भाषणात डॉ. आंबेडकर म्हणतात-
‘‘ र्निबध हा निधर्मी असतो. तो एखाद्याला मोडता येतो. परंतु बंधुता किंवा धर्म हा पवित्र आहे. बंधुतेविषयी आदर वाटला पाहिजे. माझ्या तत्त्वज्ञानाचा प्रचार हेच मला माझे जीवितकार्य बनवायचे आहे. मला माझ्या मताला लोक अनुकूल करून घ्यायचे आहेत. त्रिगुणांच्या अनुयायांना त्यांचा अव्हेर करून माझे तत्त्वज्ञान स्वीकारण्यास मी त्यांना भाग पाडणार आहे. भारतीयांच्या विचारांवर दोन मतप्रणाली नियंत्रण करतात. राज्यघटनेच्या उपोद्घातात जे राजकीय ध्येय मांडले आहे ते स्वातंत्र्य, समता नि बंधुता ह्य़ांना प्राध्यान्य असलेल्या जीवनाची ग्वाही देते. पण भारतीयांच्या धर्मात जे सामाजिक ध्येय गुंफले आहे ते स्वातंत्र्य, समता नि बंधुता नाकारते. जे बहुतेक सर्व भारतीयांना राजकीय ध्येय म्हणून मान्य झाले आहे ते सर्वाचे सामाजिक ध्येय होईल.’’