पॉलिस्टरच्या तंतूंच्या काटछेदाचा आकार हा सामान्यत: वर्तुळाकार असतो. वर्तुळाकार आकाराच्या काटछेदामुळे या तंतूंना चमकदारपणा असत नाही. कापूस, रेशीम यांसारख्या तंतूंच्या छेदाचा आकार वर्तुळाकार असत नाही. कापसाच्या तंतूंचा छेद हा घेवडय़ाच्या दाण्यासारखा तर रेशमाच्या तंतूंचा छेद हा त्रिकोणी असतो. व्हिस्कोज रेयॉन तंतूंचा छेद हा कातरे असलेला असतो. वर्तुळाकार काटछेदाचे तंतू एकमेकांच्या अधिक जवळ येऊन संपूर्ण लांबीवर एकमेकास खेटून बसतात. त्यामुळे अशा तंतूंपासून तयार केलेले सूत किंवा कापड अतिशय दाट व घट्ट असे बनते. वर्तुळाकार नसलेल्या काटछेदामुळे तंतू एकमेकांच्या अगदी जवळ येऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा तंतूंपासून तयार केलेले सूत व कापड हे जास्त चमकदार, मऊ व हलके, उबदार, अधिक बाष्पशोषक आणि स्पर्शास आरामदायक असते. वर्तुळाकार नसलेल्या छेदामुळे अशा तंतूंमध्ये केशाकर्षणाची क्षमता असते व त्यामुळे हे तंतू जल एका ठिकाणाहून दुसरीकडे जलद वाहून नेऊ शकतात. अवर्तुळाकार छेदाचे हे फायदे लक्षात आल्यावर त्रिदलीय आणि बहुदलीय असे पॉलिस्टर तंतू बनविण्यास सुरुवात झाली.
डय़ू पॉन्ट कंपनीने सर्व प्रथम त्रिदलीय छेदाचा पॉलिस्टर तंतू विकसित केला. या तंतूचा उपयोग प्रामुख्याने चमकदार व चांगली झळाळी असणारे कपडे तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. त्रिदलीय तंतूं हे वितळकताई पद्धतीनेच उत्पादित केले जातात, फक्त तनित्रातील छिद्रांचा आकार तीन पाकळ्यांचा असतो.
त्रिदलीय पॉलिस्टर तंतूचा छेद हा रेशमाच्या जवळ जाणारा असतो त्यामुळे या तंतूंना रेशमासारखा चमकदारपणा असतो. याशिवाय या तंतूंची बाष्प व रंग शोषणक्षमता नेहमीच्या पॉलिस्टरपेक्षा अधिक असते. या तंतूंचा उपयोग उदर्जाच्या व किमती पोशाखामध्ये प्रामुख्याने केला जातो. याशिवाय सॅनिटरी नॅपकिन व डायपरमध्ये भरण तंतू म्हणूनसुद्धा पॉलिस्टरच्या त्रिदलीय तंतूंचा उपयोग केला जातो. या तंतूंच्या चमकदारपणामुळे व आकर्षकतेमुळे या तंतूंचा उपयोग कापडावरील नक्षीकाम करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर केला जातो.
संस्थानांची बखर: सिरमूरचे प्रशासन
सिरमूरचा राजा करम परकाश याने आपली राजधानी नहान येथे नेली. पुढे त्याचा वारस मंधाता परकाश याच्याकडे बादशाह शाहजहानने त्याच्या गढवालच्या मोहिमेत २००० घोडदळाची मदत मागितली. त्याला मंधाताने सर्वतोपरी मदत केल्याने मंधाताचा वारस सुभाग परकाशला कोटाह परगणा इनाम दिला. सुभाग परकाशने औरंगजेबालाही त्याच्या अनेक मोहिमांमध्ये मदत केल्यामुळे बादशाहने कोलागढम् परगणा त्याला इनाम दिला. सुभागने कृषिक्षेत्रातही सुधारणा करून शेतसारा ठरवून दिला.
सिरमूर शासकांना गुरखा लोकांच्या हल्ल्यांना अधूनमधून तोंड द्यावे लागे. गुरख्यांनी गढवाल परगाण्यावर आक्रमण केले असता तत्कालीन सिरमूर राजा कीरत परकाशने त्यांना गंगा नदीपार हटविले. १७९३ साली गादीवर आलेला राजा करम परकाश दुसरा हा अत्यंत दुबळा होता. त्याच्या कुशासनामुळे झालेली बंडखोरी दाबण्यासाठी त्याने गुरख्यांची मदत घेतली. त्यापूर्वीच बंडखोरांनी रत्न परकाश याला गादीवर बसविले होते. गुरख्यांनी बंड मोडल्यावर रत्न परकाशला गादीवरून हटविले परंतु करम परकाशला परत गादी देण्यासही विरोध केला. करम परकाशची पत्नी अत्यंत मुत्सद्दी आणि धर्यवान होती. तिने ब्रिटिशांकडे मदत मागितली. त्याच दरम्यान ब्रिटिशांची नेपाळवर हल्ला करण्याची योजना होती. ब्रिटिशांनी आपली फौज पाठवून सिरमूरमधील गुरख्यांचा प्रथम बीमोड केला आणि दुर्बळ करम परकाशचा मुलगा फतेह परकाश याला गादीवर बसविले. त्या वेळी ब्रिटिशांनी कोटाह, फिआर्डा, डून वगरे परगाणे सिरमूर शासकांकडून घेतले परंतु पुढे सिरमूरकडून ५०००० रु. घेऊन डून हा परगणा त्यांना परत केला.
ब्रिटिशांना सिरमूर शासकांनी वेळोवेळी कर्जाऊ रक्कमही दिली, पहिल्या अँग्लो-शीख युद्धात ब्रिटिशांच्या मदतीला फौज पाठविली आणि १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धात ब्रिटिशांनाच पाठिंबा दिला. राजा समशेर परकाश याची कारकीर्द इ.स. १८५६ ते १८९८ अशी झाली. त्याने राज्यात दवाखाने, रस्ते, पोस्ट व तारघर या सुविधा देऊन वेठबिगारी पद्धत बंद केली.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com