पॉलिस्टरच्या तंतूंच्या काटछेदाचा आकार हा सामान्यत: वर्तुळाकार असतो. वर्तुळाकार आकाराच्या काटछेदामुळे या तंतूंना चमकदारपणा असत नाही. कापूस, रेशीम यांसारख्या तंतूंच्या छेदाचा आकार वर्तुळाकार असत नाही. कापसाच्या तंतूंचा छेद हा घेवडय़ाच्या दाण्यासारखा तर रेशमाच्या तंतूंचा छेद हा त्रिकोणी असतो. व्हिस्कोज रेयॉन तंतूंचा छेद हा कातरे असलेला असतो. वर्तुळाकार काटछेदाचे तंतू एकमेकांच्या अधिक जवळ येऊन संपूर्ण लांबीवर एकमेकास खेटून बसतात. त्यामुळे अशा तंतूंपासून तयार केलेले सूत किंवा कापड अतिशय दाट व घट्ट असे बनते. वर्तुळाकार नसलेल्या काटछेदामुळे तंतू एकमेकांच्या अगदी जवळ येऊ शकत नाहीत. त्यामुळे अशा तंतूंपासून तयार केलेले सूत व कापड हे जास्त चमकदार, मऊ व हलके, उबदार, अधिक बाष्पशोषक आणि स्पर्शास आरामदायक असते. वर्तुळाकार नसलेल्या छेदामुळे अशा तंतूंमध्ये केशाकर्षणाची क्षमता असते व त्यामुळे हे तंतू जल एका ठिकाणाहून दुसरीकडे जलद वाहून नेऊ शकतात. अवर्तुळाकार छेदाचे हे फायदे लक्षात आल्यावर त्रिदलीय आणि बहुदलीय असे पॉलिस्टर तंतू बनविण्यास सुरुवात झाली.
डय़ू पॉन्ट कंपनीने सर्व प्रथम त्रिदलीय छेदाचा पॉलिस्टर तंतू विकसित केला. या तंतूचा उपयोग प्रामुख्याने चमकदार व चांगली झळाळी असणारे कपडे तयार करण्यासाठी केला जाऊ लागला. त्रिदलीय तंतूं हे वितळकताई पद्धतीनेच उत्पादित केले जातात, फक्त तनित्रातील छिद्रांचा आकार तीन पाकळ्यांचा असतो.
त्रिदलीय पॉलिस्टर तंतूचा छेद हा रेशमाच्या जवळ जाणारा असतो त्यामुळे या तंतूंना रेशमासारखा चमकदारपणा असतो. याशिवाय या तंतूंची बाष्प व रंग शोषणक्षमता नेहमीच्या पॉलिस्टरपेक्षा अधिक असते. या तंतूंचा उपयोग उदर्जाच्या व किमती पोशाखामध्ये प्रामुख्याने केला जातो. याशिवाय सॅनिटरी नॅपकिन व डायपरमध्ये भरण तंतू म्हणूनसुद्धा पॉलिस्टरच्या त्रिदलीय तंतूंचा उपयोग केला जातो. या तंतूंच्या चमकदारपणामुळे व आकर्षकतेमुळे या तंतूंचा उपयोग कापडावरील नक्षीकाम करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर केला जातो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा