सिमेंट हायड्रॉलिक आणि नॉन-हायड्रॉलिक या दोन प्रकारांत उपलब्ध असते. पोर्टलॅण्ड सिमेंट हे हायड्रॉलिक सिमेंट प्रकारातील आहे. एनर्जीकली मॉडीफाइड सिमेंट हे पोझोलनिक खनिजापासून तयार केले जाते. हे सिमेंट पोर्टलॅण्ड सिमेंटला पर्याय म्हणून वापरता येते. एवढेच नाही तर ते स्वस्त असून त्यांची कार्यक्षमता उत्तम आहे. त्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्याने ऊर्जा वाचते आणि त्यामुळे कार्बनडाय ऑक्साइडचा प्रादुर्भाव कमी होतो. सिमेंट तयार करणाऱ्या कंपन्या सिमेंटमधील पदार्थाचे गरजेनुसार प्रमाण बदलतात. त्यानुसार त्याचे विविध प्रकार आहेत. उदा. पोर्टलॅण्ड ब्लास्ट फन्रेस सिमेंटमध्ये ७० टक्के ब्लास्ट फन्रेसचा स्लॅग असून त्यात पोर्टलॅण्ड क्लीन्कर आणि जिप्सम (हायड्रेटेड कॅल्शिअम सल्फेट) असते. जर स्लॅगचे प्रमाण याहून अधिक वाढले तर सिमेंटची ताकद कमी होते. पोर्टलॅण्ड फ्लाय अॅश सिमेंटमध्ये ३५ टक्के फ्लाय अॅश (पृथ्वीच्या उदरातून बाहेर पडलेली राख) असते. ही फ्लाय अॅश पोझोलानिक खनिजापासून तयार झाल्याने सिमेंटची क्षमता वाढते. फ्लाय अॅश ही स्वस्तात उपलब्ध असेल तर असे सिमेंट हे सामान्य सिमेंटपेक्षा स्वस्त पडते. पोर्टलॅण्ड पोझोलन सिमेंट ह्य़ामध्ये फ्लाय अॅश हे पोझोलन असून ते नसíगक आणि कृत्रिम पोझोलन असते. त्यात ज्वालामुखीची राख मिसळतात. पोर्टलॅण्ड सिलिका फ्यूम सिमेंट यामध्ये सिलिका फ्यूमचे प्रमाण ५ ते २० टक्के असते. सिलिका फ्यूममुळे सिमेंटला अधिक ताकद येते. पोझोलन लाइम सिमेंट हे पोझोलन आणि लाइम यांचे मिश्रण असते. जसजसा वेळ जाईल तसतशी त्या सिमेंटला ताकद येते. सुपरसल्फेटेड सिमेंटमध्ये ८० टक्के ब्लास्ट फन्रेस स्लॅग, १५ टक्के जिप्सम आणि लाइम किंवा पोर्टलॅण्ड क्लीन्कर हे कमी प्रमाणात उत्प्रेरक म्हणून वापरतात. कॅल्शिअम अल्युमिनिएट सिमेंट हे हायड्रॉलिक सिमेंट असून ते लाइमस्टोन आणि बॉक्साइटपासून बनवलेले असते. नसíगक सिमेंट हे पोर्टलॅण्ड सिमेंटच्या पूर्वीपासून अस्तित्वात असून अॅरगिलॅसिस लाइमस्टोन हे मध्यम तापमानास तापवले असता तयार होते. या लाइमस्टोनमध्ये चिकणमातीचे प्रमाण ३०-३५ टक्के असते.
प्रबोधन पर्व: सामाजिक पुनर्घटनेचे तत्त्वज्ञान
‘‘राष्ट्रात जे विचारी व कर्ते पुरुष निर्माण होतात त्यांच्या विचारांचे व कृर्तत्वाचे धन ग्रंथबद्ध झाले की पुढील पिढीवर त्याचे संस्कार होतात व त्या पिढीत कर्ती माणसे निर्माण होतात. त्यांचे तत्त्वज्ञान पुन्हा ग्रंथबद्ध झाले की, ते पुढील पिढीस उपयोगी पडते आणि अशा रीतीने राष्ट्राचे ज्ञानधन वाढत जाऊन त्यातून अनेक प्रकारची शास्त्रे निर्माण होऊन समाज बलशाली होतो.. युरोपात बुद्धिवादाचा उदय झाला. ग्रंथप्रामाण्यवादी धर्मोपदेशकांचे वर्चस्व नष्ट झाले, राष्ट्रनिष्ठा ही प्रबळ शक्ती उदयास आली आणि विज्ञान वाढीस लागून पुढे औद्योगिक क्रांती घडून आली. यांपैकी कोणतीही घटना हे एका व्यक्तीचे कार्य नाही. शेकडो पंडित, तत्त्ववेत्ते, शास्त्रज्ञ यांचे ते कार्य आहे आणि या पंडितांनी आपले विचार लिहून ठेवले नसते तर हे कार्य घडून आले नसते. तेराव्या शतकातील पंडितांच्या तत्त्वज्ञानाचा पत्ता चौदाव्या शतकातील पंडितांना लागला नसता. त्यांना पुन्हा पायापासूनच सुरुवात करावी लागली असती.’’ पु. ग. सहस्रबुद्धे यासंदर्भात आपण नेमके कुठे आहोत हे सांगताना लिहितात –
‘‘कोणत्याही क्षेत्रात पंडितांनी आपले विचार ग्रंथबद्ध केले तर त्याचा प्रभाव केवढा पडतो याचे उदाहरण महाराष्ट्राच्या इतिहासातच सापडते. परमार्थ, भक्तिमार्ग, अद्वैतवेदांत यांविषयी ज्ञानेश्वरांनी ग्रंथ लिहिण्याची जी परंपरा घालून दिली ती आजतागायत चालू आहे. त्यामुळे परमार्थातले कर्म, पुनर्जन्म, आत्मा, मोक्ष, माया, सगुणनिर्गुण असले गहन विचारसुद्धा अगदी निरक्षर शेतकऱ्यापर्यंत जाऊन पोहोचले आहेत.. अलीकडच्या काळात मागल्यासारखी स्थिती नाही हे जरी खरे असले तरी जी सामाजिक, राजकीय, धार्मिक क्रांती व्हावयास पाहिजे आहे, तिच्या मानाने पाहता निर्माण झालेले वाङ्मय अगदी अल्प आहे.. दीर्घकाल रूढ असलेल्या आचारविचारांचे तत्त्वज्ञानपूर्वक निर्मूलन झाले नाही तर क्रांतिकारक सुधारणा या चिरस्थायी होत नाहीत आणि त्या दृष्टीने विचार करता आपल्या सामाजिक पुनर्घटनेचे तत्त्वज्ञान शास्त्रीय दृष्टीने लिहिले गेलेच नाही असे म्हणावे लागते.’’
मनमोराचा पिसारा: ‘शाळे’चं ‘ओपन हाऊस’
‘येत्या शनिवारी पालक-शिक्षक भेटीगाठीसाठी तास-दीड तास राखून ठेवलेला आहे’, हे कळताच शाळा आणि शिक्षकांना भेटायला उत्सुक झालो. शाळेकडून प्रगतीचा फीडबॅक हवा होता आणि मनात शंकाकुशंकांचं भेंडोळं झालं होतं. रोज उठून त्याच्याबद्दल नवनव्या तक्रारी निर्माण होत होत्या. त्यामुळे एका लांबलचक कागदावर त्याची जंत्री केली आणि शाळेत हजर झालो.
अशा भेटीगाठींना ओपन हाऊस म्हणतात; हे तेव्हा कळलं. शिक्षक हसतमुखाने सामोरे आलेले पाहून नवल वाटलं. बघावं तर पालक मंडळी नटूनथटून आली होती. एखाद्या मिनी फॅशन परेडलाच चुकून आलोय की काय असं क्षणभर वाटलं. पण त्या सुशोभित चेहऱ्यावर स्मितरेषा नव्हती आणि वावरण्यातही सहज रिलॅक्सड् फीलिंग नव्हतं.
सर्व विद्यार्थ्यांनी छान प्रगती केली आहे, त्यांच्या शिकण्याचा वेग आणि आकलनशक्तीचं आम्हाला कौतुक वाटतंय. असं शिक्षकांनी म्हटल्यावर इतर पालकांच्या चेहऱ्यावर स्मितरेषा तरळून लुप्त झाली आणि कपाळावर आठय़ांच्या लहरी उमटल्या.
प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हालचाली आणि प्रगतीवरती शिक्षकांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं. शिक्षक मॉडर्न आणि चटपटीत वाटले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घेणारं पुस्तकच सगळ्यांना वाटण्यात आलं. मुख्य म्हणजे विद्यार्थ्यांचा सहज वावर, नव्या ठिकाणी रुळण्यात कुरकुर न करणं, नवीन शिकायला उत्सुक असणं, बरोबरच्या सवंगडय़ांशी खेळणं आणि आनंदी-उत्साही राहणं या बाबींचा समावेश होता.
होमवर्क करणं, आज्ञाधारकपणा, पाहुण्यांसमोर आमच्या इच्छेनुसार करामती दाखवणं, खाण्यात खोडय़ा न करणं असे रकाने नसल्यामुळे पालक गोंधळले.
घरी आल्यावर नुसता झोपतो, संध्याकाळ झाली की बाहेर हुंदडायला उत्सुक असतो. खा खा म्हणून पौष्टिक खाऊ दिला तरी त्याकडे ढुंकून बघत नाही. मुख्य म्हणजे त्याला आमच्याबरोबर सारखं खेळायचं असतं! अशा तक्रारींचं भेंडोळं आम्ही घेऊन शिक्षकांकडे गेलो.
कानोसा घेतला तर जवळजवळ सगळ्यांच्या अशाच तक्रारी होत्या. मुख्य म्हणजे शाळा पुरेशी पडत नसेल तर आम्ही स्वतंत्र टय़ूशन लावू, हवं तर इथल्याच शिक्षकांनी चालवलेले क्लास असतील तर त्यांच्याकडे पाठवू! हो, आणि त्यासाठी पैसे खर्च करायला तयार आहोत!
विद्यार्थ्यांच्या प्रगतिपुस्तकावरून आता पालकांची आपापसात कुजबुज होऊ लागली होती. शाळेत एकूण ‘फेवरिटिझम्’ आहे अशा निष्कर्षांप्रत बहुतेक पालक आले. गलका वाढत होता. तेवढय़ात शिक्षकांनी पुन्हा पालकांना संबोधायला सुरुवात केली.
मित्रहो, हे बघा, तुमचा सतत गैरसमज होतोय. अहो, तुमच्या पेटडॉगची शाळा आहे. इथे त्यांच्या आकलनशक्तीवर भर असतो. प्रत्येकाचा स्वतंत्र करिक्युलम असतो. आपापसात प्रगतीची तुलना करू नका. घरी होमवर्क दिलेलं नसतं. त्यांना खेळायला, हुंदडायला आवडतं यात काही गैर नाही आणि टय़ूशन-क्लास यांच्या कचाटय़ात त्यांना अडकवायचं असेल तर तिकडे माणसांच्या मुलांच्या शाळेत टाका! आम्हाला तरतरीत हुशार आणि प्रेमळ विद्यार्थ्यांना घडवायचंय. बघा विचार करा..
डॉ. राजेंद्र बर्वे