उच्च व अतिउच्च तन्यता तंतू – सामान्यत: पॉलिस्टर तंतूची तन्यता इतर नसíगक आणि मानवनिर्मित तंतूंपेक्षा अधिक असली तरी काही औद्योगिक वापरासाठी यापेक्षाही जास्त तन्यतेचे तंतू लागतात. उदा. शिलाईचा दोरा, ताडपत्री बनविण्यासाठी वापरले जाणारे धागे, मासेमारीचे जाळे बनविण्यासाठी लागणारे धागे अशा उपयोगासाठी नेहमीपेक्षा अधिक तन्यतेचे पॉलिस्टर तंतू लागतात. अशा विशिष्ट उपयोगासाठी उच्च व अतिउच्च तन्यता असणाऱ्या पॉलिस्टर तंतूंची निर्मिती केली जाते. उच्च तन्यतेच्या तंतूंची तन्यता साधारणपणे ५.५० ते ६.८० ग्रॅम प्रती डेनिअर इतकी असते तर अतिउच्च तंतूंची तन्यता ७.०० ते ७.६ ग्रॅम प्रती डेनिअर इतकी असते. अशा तंतूंमध्ये अधिक लांबीच्या बहुवारिकाचा उपयोग केला जातो आणि वितळ कताईनंतर तंतूला अधिक खेच दिला जातो. तंतूंच्या अंतिम उपयोगाच्या गरजेनुसार तंतूंची निवड केली जाते. औद्योगिक व तांत्रिक क्षेत्रामध्ये तंतू व कापडाचा वापर जलद गतीने वाढत आहे. यासाठी उच्च तन्यतेच्या तंतूंची गरज असते. या क्षेत्रांमध्ये पॉलिस्टर तंतूंचा वापर मोठय़ा प्रमाणावर केला जातो.
कपडे शिवताना शिलाईसाठी जो दोरा वापरला जातो त्याला फार महत्त्व आहे. हा दोरा उच्च तन्यतेचा तसेच कमी दोष असलेला असावा लागतो. नाहीतर शिलाई वारंवार उसवते आणि शिवताना दोरा सारखा तुटत राहतो. आधुनिक गतिमान यंत्रांसाठी शिलाईचा दोराही अधिक चांगला लागतो. या सर्व गरजा उच्च तन्यतेचे पॉलिस्टर तंतू पूर्ण करत असल्यामुळे तयार कपडय़ांच्या उद्योगात शिलाईचा दोरा म्हणून पॉलिस्टर तंतूंचा वापर होतो.
सर्वसामान्यपणे नेहमीच्या वापराचे तंतू हे एक डेनिअर किंवा अधिक जाडीचे असतात. यापेक्षा कमी जाडीच्या तंतूंची गणना अतितलम तंतूंमध्ये केली जाते. अखंड व आखूड या दोन्ही प्रकारांमध्ये पॉलिस्टरचे अतितलम तंतू निर्मिले जातात. आखूड तंतूंमध्ये तंतूंची जाडी ही ०.८ ते ०.९ डेनिअर इतकी असते तर अखंड तंतूंच्या बाबतीत जाडी ०.६ ते ०.९ डेनिअर इतकी असते. या तंतूंची निर्मिती इ.स. १९७० मध्ये सर्व प्रथम जपानमध्ये झाली. त्यानंतर १९८० मध्ये यूरोपमध्ये या तंतूंचे उत्पादन होऊ लागले. आता ०.३ डेनिअर इतक्या तलमतेचे तंतू विकसित झाले आहेत त्यांना उच्च अति तलमतेचे तंतू असे म्हणतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा