इ. स. १९३०मध्ये कॅरोथर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांना व्यवहारापयोगी बहुवारिक बनविण्यामध्ये पहिले यश आले. त्यांनी पॉलीक्लोरोप्रीन हे बहुवारिक बनविले. ‘या बहुवारिकामध्ये रबरासारखे गुणधर्म होते. डय़ुप्रीन या नावाने ते बाजारात आले. १९३६ मध्ये ते निओप्रीन या नावाने प्रचलित झाले. हे जगातील पहिले संश्लेषित रबर आहे व आजही ते अतिशय प्रसिद्ध आहे.
१९३१ मध्ये कॅरोथर्स आणि हिल यांनी अमेरिकन केमिकल सोसायटीच्या परिसंवादामध्ये एक प्रबंध सादर केला ज्यामध्ये त्यांनी पॉलिस्टर बहुवारिकाचा महारेणू तयार केला असल्याचे आणि त्यापासून रेशमासारखे तंतू तयार केल्याचे प्रतिपादन केले, परंतु कॅरोथर्स आणि त्याच्या सहकाऱ्यांनी खूपच प्रयोग केले तरी त्यांना व्यवहारात उपयोग असा संश्लेषित तंतू तयार करता येऊ शकला नाही. प्रयोगादरम्यान जे तंतू तयार केले गेले ते एक तर कमी तापमानाला वितळत असत किंवा कुठल्या तरी क्षाराच्या द्रावणात विरघळत असत. त्यामुळे हे संशोधन १९३३ साली जवळजवळ पूर्णपणे थंडावले. हे सर्व संशोधन पॉलिस्टर बहुवारिकांवर चालले होते. या संशोधनादरम्यान त्यांनी अनेक प्रकारच्या सेंद्रिय आम्लाचा वापर करून पाहिला, पण यश आले नाही. दुर्दैवाने त्यांनी टेरिप्थालिक आम्ल वापरून पाहिले नाही. नाही तर नायलॉनऐवजी त्यांना पॉलिस्टर तंतूंचा शोध लागला असता, कारण पॉलिस्टर तंतू बनविताना टेरिप्थालिक आम्ल आणि डाय मिथाईल ग्लायकॉल यांच्या रासायनिक प्रक्रियेमध्ये बनलेल्या ईस्टरच्या रेणूचा बहुवारिकच वापर केला जातो.
१९३० मध्ये एल्मर बोल्ट्न हा डय़ू पॉन्ट कंपनीचा संशोधन संचालक बनला आणि त्याने कॅरोथर्सला संशोधन पुढे सुरू करण्याबाबत प्रोत्साहन दिले. यामुळे कॅरोथर्सने संशोधन पुन्हा सुरू केले आणि त्याने आता नव्याने तंतूसाठी योग्य असे बहुवारिक तयार करण्यासाठी प्रयत्न चालू केले. पॉलिस्टर बहुवारिकाचे प्रयोग यशस्वी न झाल्यामुळे त्याने आता अमाइनो अॅसिडपासून बहुवारिक बनविण्यावर भर दिला. अमाइनो अॅसिडपासून बनविलेल्या या बहुवारिकास पॉली अमाइड असे म्हणतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा