कुठलाही पदार्थ फक्त तोंडाने खाल्ला जात नाही, तर तो डोळ्यांना सुखद वाटला पाहिजे तसेच त्याच्या सुगंधानेही तो आपल्याला खावासा वाटला पाहिजे. स्वयंपाकघरात कोणता पदार्थ शिजतोय हे त्याच्या सुगंधावरून ओळखला जातो. आणि या सुगंधाने आपली भूक चाळवली जाते. पदार्थाच्या स्वत:च्या सुगंधाव्यतिरिक्त आपण काही पदार्थ सुगंधासाठी म्हणून वापरतो. गोड पदार्थातील वेलची, जायफळचा सुगंध आपल्याला आवडतो. एकंदरच पदार्थ सुगंधित बनवण्याकडे आपला कल असतो. मग ते आइस्क्रीम असो वा केक. अगदी नेहमीचा चहा किंवा कॉफीसुद्धा आपल्याला आलं, जायफळ घालून प्यायला आवडते. विविध सुगंधांसाठी नसíगक पदार्थाचा वापर तर केला जातोच, पण कृत्रिम म्हणजेच काही रसायनांचा वापरदेखील केला जातो. खरं तर ही सुगंधित द्रव्य किंवा पदार्थ मूळ पदार्थाच्या चवीत बदल करतातच असे नाही, पण तरीदेखील पदार्थात ती आवर्जून वापरली जातात.
लहान मुलांच्या विशेष आवडीचा सुगंध म्हणजे व्हॅनिला. व्हॅनिला फ्लेवर आइस्क्रीमध्ये जास्त वापरला जातो. खरं तर व्हॅनिला आइस्क्रीम म्हणजे प्लेन, नुसतं आइस्क्रीम असंच समजलं जातं. इतका हा सुगंध आइस्क्रीमच्या बाबतीत आपल्याला सवयीचा झालेला आहे. व्हॅनिला हे सुगंधित द्रव्य व्हॅनिलाच्या शेंगांपासून तयार करतात. व्हॅनिलातील व्हॅनिलिन म्हणजेच ४ हायड्रॉक्सी-३ मिथॉक्सी बेंझलडीहाइड या रसायनामुळे सुगंध येतो. याव्यतिरिक्त व्हॅनिलामध्ये पिपिरिनॉल असतं.
१८५८ मध्ये गोबले याने सर्वप्रथम व्हॅनिलाच्या शेंगांपासून व्हॅनिलाचा अर्क वेगळा केला. १८७४ पासून व्हॅनिलाचा अर्क दोन प्रकारांत मिळू लागला. खऱ्या व्हॅनिलाच्या शेंगांपासून मिळणारा अर्क म्हणजे खूप रसायनांचे मिश्रण असते. यात अॅसिटलडीहाइड, अॅसिटिक आम्ल, हेक्झॉनिक आम्ल, युजेनॉल, मिथाइल सिनामेट, ४ हायड्रॉक्सी बेंझलडीहाइड, आइसोब्युटेरीक आम्ल या रसायनांचा समावेश असतो. कृत्रिम व्हॅनिलाच्या अर्कात इथेनॉलमधील कृत्रिम व्हॅनिलिनचे द्रावण असते. कृत्रिम व्हॅनिलिन तयार करण्यासाठी विविध पदार्थ वापरले जातात, पण बहुतेक पदार्थामध्ये वापरले जाणारे व्हॅनिलिन मुख्यत: गॉइकॉलपासून (Guaiacol) तयार केले जाते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा