कुतूहल: गाई – म्हशींच्या जाती
भारतात गाईंच्या २६ आणि म्हशींच्या १६ जाती आहेत. उपयुक्ततेनुसार गाईंची, जास्त दूध देणाऱ्या दुधाळ, शेतीच्या कामासाठी उत्कृष्ट बल पदास करणाऱ्या तथापी दूध कमी देणाऱ्या ओढाळ आणि दूध मध्यम प्रमाणात देणाऱ्या तसेच शेतीकामासाठी उपयुक्त बल पदास करणाऱ्या दुहेरी अशा तीन जातींमध्ये विभागणी करण्यात येते. आपल्याकडे फक्त गीर, साहीवाल, सिंधी या दुधाळ गायी असून बहुसंख्य ओढाळ आहेत. त्यामुळे दूध उत्पादन खर्च जास्त होतो. विदेशातील गाई दुधाळ असून वेतास सरासरी आठ हजार लिटर दूध देतात. आपल्याकडील दुधाळ गाई वेतास दीड हजार ते आठ हजार लिटर दूध देतात. ओढाळ गाई वेतास सहाशे ते आठशे लिटर दूध देतात. भाकड कालावधी आठ महिन्यांचा असतो. त्यामुळे दूध व्यवसायाकरिता देशी गाईंचा विदेशी वळूंशी संयोग करून संकरित गाय पदास करण्याचा कार्यक्रम १९७० नंतर राबवण्यात आला.
महाराष्ट्रातील गौळण, डांगी, खिलार, देवणी गाई फार कमी दूध देतात. तथापी त्यांचे बल काटक असून अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीकामात अत्यंत उपयोगी आहेत. दुधाळ गीर गाई गुजरात राज्यातील काठेवाड आणि साहीवाल, सिंधी गाई पंजाब, हरियाणा भागात आढळतात. संकरित गाई वेतास २००० ते ३२०० लिटर दूध देतात. फक्त चार-पाच महिने भाकड राहतात. संकरित गाईंना आपल्याकडील उष्ण हवामानाचा त्रास होतो. त्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी असते. त्यामुळे संकरित गाईंची निगा राखावी लागते.
म्हशीच्या बाबतीत मुरा (दिल्ली), मेहसाणा, जाफराबादी, रावी अशा दुधाळ म्हशी आपल्याकडे आहेत. मुरा म्हैस पंजाब, हरियाणा, दिल्ली या भागात आढळतात. मुंबई, पुणे भागात दूध विक्री चढय़ा दराने होते. त्यामुळे मुरा म्हशींची मोठी आयात होते. मुरा म्हैस वेतास १८०० ते दोन हजार लिटर दूध देतात. महाराष्ट्रातील पंढरपुरी, नागपुरी म्हैस वेतास दीड हजार लिटर दूध देतात. तथापी त्या नियमितपणे दर १५ महिन्यांनी वितात. खाद्य चारा कमी प्रतीचा मिळाला तरी तग धरतात. त्यामुळे पंढरपुरी म्हैसदेखील संगोपन करणाऱ्यांची पसंती असते. मुरा वळूचा स्थानिक म्हशीच्या जातीशी संयोग करून पदास झालेल्या म्हशी किफायतशीर दूध व्यवसायास उपयुक्त आहेत.
डॉ. पी. डी. कुळकर्णी
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
वॉर अँड पीस: गुप्तरोग (पुरुषांचा आजार)
कामवासना सर्वानाच असते. ती नैसर्गिक आहे. या हजारो सैनिकांपैकी तुलनेने अल्प सैनिक त्या त्या भागातील दुर्दैवी वेश्या स्त्रियांचा केव्हा तरी आधार घेतात. परस्त्रीसंग होतो. अशा या महिला अगोदरच गुप्तरोग पीडित असतात. या सीमावर्ती भागातील हवामान नेहमी खूप थंड असल्यामुळे या पुरुषांना त्या थंड प्रदेशात गुप्तरोगाची बाधा लगेच होत नाही. पण ही सैनिक मंडळी रजेनिमित्त सखल प्रदेशात, तसेच सीमावर्ती ठराविक काळाची डय़ूटी संपल्यावर उष्ण हवामानाच्या ठिकाणी आल्यावर एकदम गुप्तरोग गंभीर स्वरूप धारण करतो. लिंगाचे जागी फोड येतात; आकार एकदम बारीक होतो; स्त्री-पुरुष संबंधात कमकुवतपणा येतो, नपुसकता येते. काहींना पेनिसिलिनसारख्या स्ट्राँग औषधांनी थोडा काळ आराम मिळतो. पण एकूण जीवनात नैराश्य येते; जीवनाची मजा जाते. आयुर्वेदीय औषधी महासागरात पुरुषांच्या या समस्येवर शेकडो औषधीयोग आहेत. धात्रीरसायन, च्यवनप्राश, अश्वगंधापाक, शतावरीकल्प, बदामकल्प, शतावरीघृत, अश्वगंधाघृत; वसंतकुसुमाकर, बृहत्वातचिंतामणी, चंद्रप्रभा, श्रंग, सुवर्णमाक्षिकादिवटी, सुवर्णमालिनीवसंत, लक्ष्मीविलास, मधुमालिनीवसंत; द्राक्षासव, द्राक्षारिष्ट, अश्वगंधारिष्ट; आस्कंद, शतावरी, भुईकोहळा, वाकेरी, हरणखुरी, मदनमस्त, चोबचिनी अशा अनेकानेक औषधांमधून नेमकी निवड केली तर रुग्णाला गमावलेली ताकद नक्कीच परत मिळवता येते. पण त्याकरिता वर्तमानपत्रातील उत्तर हिंदुस्थानी जाहिरातींपासून शहाण्या पुरुषाने नक्कीच लांब राहावे. प्रथम आपल्या लिंगाची स्वच्छता ठेवण्याकरिता त्रिफळा काढय़ाने शोधन व एलादि तेलाने रोपण करून घ्यावे. शुक्रवीर्य ओजवृद्धीकरिता आस्कंध, शतावरी, भुईकोहळा, चोपचिनी, वाकेरीमिश्रीत चौगु चूर्ण घ्यावे. आपल्या ऐपतीप्रमाणे धात्रीरसायन, च्यवनप्राश, अश्वगंधापाक शतावरीकल्प यातील निवड करावी. चोपचिनी ही वनस्पती स्त्री-पुरुषांच्या गुप्तरोगात आपल्या पाठीशी राहून दिलासा देणारी; सत्वर परिणाम गुप्तरोगावर देणारी दैवी देणगी आहे. चोपचिनीमातेला अनेकानेक प्रणाम!
वैद्य प. य. वैद्य खडीवाले
जे देखे रवी.. ओंगळवाणा गोंधळ
काही वर्षांपूर्वी एकाने सरस्वतीचे वस्त्रहीन चित्र काढले आणि त्याहीनंतर काही वर्षांनी त्याच चित्रावरून मोठाच गोंधळ माजला. दोन डोंगरात उगवणारा सूर्य शेजारी एक झाड, आकाशात एखादा ढग आणि जमले तरच एखादी नदी काढण्यापलीकडे माझे चित्रकलेशी नाते नाही. मोनालिसाचे ते स्मित हास्य आणि पिकासोने काढलेली आडवे नाक आणि उभे डोळे असलेली सुप्रसिद्ध चित्रे माझ्या आवाक्याबाहेरची आहेत. तसे बघायला गेले तर सगळ्याच संस्कृतींत विवस्त्र स्थितीत शरीरसौष्ठव आणि सौंदर्य दाखवण्यासाठी आणि त्यानंतर युरोपियन देशात सांस्कृतिक पुनस्र्थापनेच्या काळात सुंदर नव्हे तर वयोमानाप्रमाणे शिथिल झालेल्या शरीराची विवस्त्र स्थितीत काढलेली चित्रे आहेतच. लहानपणी शाळेत पाटीवर सरस्वतीचे एक जरा अजब सांकेतिक चित्र काढण्याची प्रथा होती ते चित्रही मला जमत नसे. परंतु सरस्वतीच्या या विवस्त्र चित्राने मीही जरा दचकलोच. कोणीतरी म्हणाले अहो सरस्वतीचे असे पुतळे यापूर्वी उत्खननात मिळाले आहेत. चारित्र्यवान सीतेच्या देहयष्टीची उन्मादक वर्णनेही झाली आहेत. एक म्हणाले ‘अहो तुम्ही तर ज्ञानेश्वरीचे अभ्यासक. येनकेनप्रकारेण प्रसिद्धी मिळवण्यासाठी आपल्या आईचे कपडे भरसभेत फेडण्यालाही काही महाभाग पुढे-मागे बघत नाहीत. अशी ज्ञानेश्वरांची ओवी आहे. सगळे कलाकार शेवटी सरस्वतीची मुले. तेव्हा तुम्ही काय ते समजा आणि गप्प बसा.‘ नागडय़ांचे गाव। तेथे रेशमी कपडय़ांना सुद्धा। नाही काही भाव।’ ही ओवी मात्र त्या वेळी आठवली.
हल्लीचा जमाना वस्त्रहीनतेचा आहे. सगळे जण कपडे उतरवण्याच्या मागे आहेत. वस्त्रे संरक्षक सौंदर्यवर्धक आणि सांस्कृतिक उपांगे आहेत असे मला वाटत असे पण कमीत कमी कपडय़ात हल्ली सौंदर्य स्पर्धा नुसत्या भरवल्या जात नाहीत तर त्याचे जागतिक दर्शन घडते. मग त्या सुंदऱ्यांना अहिंसा म्हणजे काय असा प्रश्न विचारला जातो. या प्रश्नाचे उत्तर सॅक्रेटिस आणि शंकराचार्य या दोघांना माहीत होते की नाही कोणास ठाऊक?
ही सुंदरी मात्र एका ओळीत त्याचे अचूक उत्तर देते मग हिला शरीरच नाही तर डोकेसुद्धा आहे असे सिद्ध होते मग त्या डोक्यावर मुकुट चढतो त्या वेळी हर्षभरित झालेली ही ललना संकोचते आणि दात दिसू नयेत म्हणून तोंडावर पंजा ठेवून एक दर्दभरी किंकाळी फोडते. पुरुषांचे तेच. एक स्त्री दिग्दर्शक एका मशहूर नटाला म्हणाली हा सिनेमा चालायचा असेल तर तुला कपडे काढावे लागतील. दिसले ते ढेरपोट. मग या व्यायामशाळेत गेला आणि त्याने स्नायू घट्ट केले. त्याला अॅब्ज म्हणतात मग म्हणे, सगळ्या तरुण आणि पोक्त स्त्रिया म्हणू लागल्या हा हॉट आहे.
अशा तऱ्हेने हे उदारमतवादी जग चालते. ते सहन करावे लागते.
रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
आजचे महाराष्ट्रसारस्वत: १२ ऑगस्ट
१८८०> ‘दादासाहेब खापर्डे यांचे चरित्र’ लिहिणारे दादासाहेबांचे पुत्र, बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म. ‘साहित्याची प्रेरणा, पद्धती आणि ध्येय’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.
१९०६> ‘माझी शिपाईगिरी’ या आत्मचरित्रातून स्वत:चा आणि भारतीय लष्कराचा इतिहास सांगणारे आत्मचरित्रकार लेफ्टनंट जनरल शंकरराव थोरात यांचा जन्म.
१९२०> शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य या नावाचे साप्ताहिक सुरू केले.
१९४८> कवी, समीक्षक व अनुवादक फकिरा मुंजाजी शिंदे यांचा जन्म. जुलूस, आदिम, अवशेष, फकिराचे अभंग, दिल्ली ते दिल्ली, आई आणि इतर कविता, यांसह एकंदर २० काव्यसंग्रह, स्वान्त आणि कालमान हे समीक्षा लेखसंग्रह आणि ‘क्रांतिबा फुले’ हे पुस्तक, हे त्यांच्या आजवरच्या साहित्यसंपदेतील काही उल्लेखनीय भाग.
१९८४> कथालेखिका, कादंबरीकार आनंदीबाई जयवंत यांचे निधन. लेखनातून स्त्रीचे दु:ख आणि तिच्यावरील अन्यायाला वाचा फोडणाऱ्या आनंदीबाईंनी ‘शिकार’सारखी सामाजिक कथा, ‘पारंब्या’, ‘मेघयंती’ हे लघुकथासंग्रह, ‘आमचा शाम आणि इतर गोष्टी’ सारखे बालकथासंग्रह आणि ‘चितोडचा चंद्र’ ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली होती.
संजय वझरेकर