प्रथिनांच्या बांधणीचा सर्व आराखडा डीएनएवर रेखलेला असतो. डीएनए पेशी केंद्रकात असते व प्रथिनांची बांधणी पेशीद्रवात होते. केंद्रकातून प्रथिनाच्या बांधणीसंबंधीची सर्व माहिती पेशीद्रवात आणण्याचे कार्य करणारा रेणू असतो तो म्हणजे आरएनए, रायबोन्युक्लिक अॅसिड. याची रचना काहीशी डीएनएसारखीच असते. यात जो साखरेचा रेणू असतो तो असतो रायबोज, म्हणजे डिऑक्सिरायबोजला आणखी एक ऑक्सिजनचा अणू जोडलेला असतो. डीएनएची रचना दुपदरी असते तर आरएनए एकपदरी असतो व त्याचा तो एक पदर रायबोज साखर व फॉस्फेट ग्रुप यांच्या एकाआड एक रेणूंनी बनलेला असतो. यातही साखरेतील दुसऱ्या कार्बन अणूला नत्रयुक्त घटक जोडलेला असतो. आरएनएतील प्युरिन घटक अॅडेनीन व ग्वानीन असतात आणि पिरिमिडीन घटक असतात सायटोसिन आणि युरॅसिल. केंद्रकातील डीएनएचा साचा धरून आरएनएची घडण झालेली असते. त्यामुळे डीएनएतील माहितीची ती प्रतीक ठरते. केंद्रकातील डीएनए हा एकाच प्रकारचा असतो परंतु आरएनए मात्र तीन प्रकारचे असतात. डीएनएकडून माहिती घेऊन येणारा असतो त्याला दूत आरएनए म्हणतात. तसाच दुसरा आरएनए पेशीद्रवात असतो त्याला म्हणतात ‘ट्रान्सफर आरएनए’. या आरएनएचे कार्य म्हणजे दूत आरएनएवरील संदेशानुसार योग्य अमिनो आम्लाची निवड करून प्रथिनाच्या बांधणीसाठी त्याला वाहून नेणे आणि तिसऱ्या प्रकारचा आरएनए असतो तो ‘यबिझोमल आरएनए’. हा घटक दूत आरएनएवरील संदेश वाचून त्यानुसार प्रथिनाची बांधणी करत असतो.
जर डीएनएपासून आरएनएची प्रत तयार करताना घडणीत काही चूक घडली तर या चुकीच्या आरएनएकडून घडणारे प्रथिन चुकीचे असू शकते व त्यामुळे काही दोष निर्माण होतात. आपल्या शरीरातील विकरे, हॉरमोन्स, चेतापेशी, स्नायू या सर्वाच्या बांधणीत प्रथिनांचा मोठा सहभाग असतो. तसेच दोन पेशींतील निरोपांच्या देवाणघेवाणीतसुद्धा प्रथिने कार्यरत असतात. त्यामुळे जर आरएनए बनताना काही चूक घडले तर त्या चुकीमुळे शारीरिक प्रक्रियांत मोठे बदल घडू शकतात आणि आपल्याला काही व्याधींना तोंड द्यावे लागते.
प्रबोधन पर्व: जुने प्रसंगनिरपेक्ष उपदेश टिकावयाचे नाहींत
‘‘दाक्षिण्याच्या भावनांमुळें – स्त्रियांच्या अश्रू गाळण्यामुळें – अनेक लोक फसतात, आणि स्त्रियांस अनुकूल असा निकाल पुरुष देतात, असें मत अनेक न्यायाधिशांनी व्यक्त केलें आहे. .. .. पण आपल्याकडे कांहीं वर्षांपूर्वी एका वर्गाची वृत्ति अशी झाली होती कीं, तो वर्ग स्त्रियांविषयीं मुद्दाम खोट्या कल्पना करून देई, आणि प्रसृत करी. सुशिक्षित स्त्री म्हणजे सुधारक म्हणविणाऱ्या वर्गाची मान्यदेवता होती. ह्या देवतेकडून जरी कांहीं गर कृत्य झालें, तर तें नाकारण्याची किंवा त्यावर पांघरूण घालण्याची, किंवा त्याचें गोंड व संभावित स्पष्टीकरण करण्याची पद्धत होती. स्त्रीशिक्षणास उत्तेजन देण्यासाठीं हे सर्व प्रयत्न होत होते.. सुशिक्षित स्त्रियांचें वर्तन इतर स्त्रियांच्या वर्तनापेक्षा कांहीं अंशीं बरें असणार यांत शंका नाहीं, तथापि त्यांस केवळ निष्पाप असें समजण्यांत मानवी मनोंधर्माचें अज्ञान लोक दाखवित, असें म्हणावें लागतें.’’
ज्ञानकोशकार श्री. व्यं. केतकर ‘कळ्यांचे नि:श्वास’ या विभावरी शिरूरकरांच्या कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत मानवी नात्यांबद्दल लिहितात – ‘‘स्त्रियांचीं मानसिक स्थित्यंतरें पुरुषांस समजावयास पाहिजे आहेत. आई-बापांना मुलीची मनोवृत्ति समजली पाहिजे, व मुलींना आई-बापांची मनोवृत्ति समजली पाहिजे. वडील मंडळींच्या आज्ञेत ‘ब्र’ काढल्याशिवाय अपत्यानें रहाणें किंवा नवऱ्याच्या आज्ञेंत स्वत: बायकोनें रहाणें या गोष्टी आज समाजात शक्य नाहींत, व इष्टही नाहींत. प्रत्येक मनुष्याच्या मनांत स्वार्थबुिद्ध असते आणि ती मनुष्यमात्राच्या इतर व्यक्तींशीं उत्पन्न झालेल्या संबंधांवर परिणाम करूं लागते. त्यामुळें प्रत्येकांस दुसऱ्या व्यक्तीच्या स्वार्थबुद्धिस जपावें लागतें; आणि, मानवी कौशल्य दोघांची स्वार्थबुद्धि एकमेकांस हितकर करण्यांतच असतें. आदर, भीति, नाते किंवा आश्रय या कारणांमुळें आपल्या हुकमातींत आलेल्या व्यक्तीचें हिताहित न पहाता आपापले हिताहित पहाण्याची प्रवृत्ति जगांत नेहमीं कार्य करीत असल्यामुळें ‘पित्राज्ञापालन’, ‘मातृदेवोभव’ यांसारखे जुने प्रसंगनिरपेक्ष उपदेश टिकावयाचे नाहींत.’’
मनमोराचा पिसारा: कैसे दिन बीते
कधी तरी, रात्री कानाला श्रवणखुंटय़ा लावून गाणी ऐकत पडलो होतो आणि अचानकच लतादीदींचा सूर कानी पडला. संगीताचा आत्मा स्वरबद्ध झालेला होता. वाद्यमेळ सहजपणे सूक्ष्म लकेरी घेत होता.
डोळ्यातून अश्रूंच्या धारा कधी सुरू झाल्या ते कळलं नाही, उशी भिजली आणि जाणीव झाली की, एका अत्यंत उत्कट अनुभवात आपण नाहीसे झालो होतो.
त्या सुरात आर्तता होती, हरलेपण होतं, हरवलेपण होतं. जीवनाला पारखं होऊन एकाकी झालो आहोत याची जाणीव होती. ज्या प्रियकराच्या प्रेमात आपण आकंठ बुडलेले होतो, तो जवळ असूनही दुरावलाय, त्याची नि माझ्या भावनांची नाळ जुळलेली नाहीये. त्या विचारांनी माझं मन व्याकुळ झालंय. मी तरसते आहे, विरहाच्या वेदनेनं विव्हल होते आहे आणि ते त्याला जाणवतही नाही.
माझी नि त्याची समरसता आटोपली आहे.
अशा विकल मनाला काही समजत नाही, काही उमजत नाही. असं प्रेम करून माझ्यावर आता पस्तावण्याचीच वेळ आलीय जणू. कारण माझ्या अस्तित्वाचा हुंकार त्याला ऐकू येत नाही.
असं माझ्या आयुष्यात घडत असताना जगरहाटी अव्याहत चालू आहे. वसंत ऋतू येतो आणि सगळा बगीचा फुलून जातो. कळ्यांची फुलं येतात आणि रंगाची बहार येते. अशा वेळी मनातही चिमुकल्या कळ्या उमलू पाहतात, पदोपदी एकाच उत्कटपणे त्या उत्फुल्ल निसर्गाकडे डोळे भरून पाहावंसं वाटतं, पण मनाची ही साधी इच्छाही अपुरी राहते. त्या पियाला काही उमजतच नाही.
फुलासारखी ही कोमल तनू सजवावी. डोळ्यात काजळ घालून, केसात गजरा माळून आत्ममग्नतेनं त्याच्या श्वासाची वाट पाहावी, पण तो येत नाही आणि ते काजळ काळंकुट्टं वाटतं आणि गजऱ्यातली ती फुलेही नकोशी वाटतात.
पावसाळा येतो, जलधारांनी सारी सृष्टी चिंब होते, त्या गडगडणाऱ्या घननिळाईनं मन आसुसतं. असं वाटतं की, या ओलेत्या अंगावर तुझ्या स्पर्शाचं मोरपीस फुलावं पण..
हे दिवस मी कसे सुनेपणानं जगावेच आणि रात्री तळमळतेय हे त्याला कळत नाहीये. नायिकेची कमालीची खंत (अँग्विश) लतादीदींनी सुरात अशी उतरवलीय की वाटतं ही अतीव वेदना त्या मीरेची तर नव्हे? हा विरहाग्नी त्या सावरियाँसाठी तर नव्हे.?
मन घुटमळत होतं त्या सुरांपाशी, शब्दांपाशी आणि त्या अनमोल संगीताभोवती.. मनाचा नुसता छळ, भावनांचे कढ आणि न थांबणारे अश्रू..
डॉ.राजेंद्र बर्वे drrajendrabarve@gmail.com