देशातील दुग्ध व्यवसायाचा खरा आधारस्तंभ म्हणजे म्हशी आणि गायी. उत्तर भारतात म्हशी, तर दक्षिण भारतात गायीचा उपयोग दुग्ध व्यवसायासाठी केला जातो. जगातील ५७ टक्के म्हशी, तर १६ टक्के गायी भारतामध्ये आहेत; परंतु जगाच्या एकूण दुग्ध उत्पादनाच्या केवळ १४ टक्के दूध उत्पादन भारतात होते. शेतीच्या एकूण उत्पादनांपकी २५ टक्के उत्पादन पशुसंवर्धनातून मिळते. अर्थात एवढे उत्पादन घेण्यासाठी फक्त दोन ते तीन टक्के जमीन या क्षेत्राखाली गुंतवली आहे. याउलट राज्यातील ६० टक्के शेतामध्ये अन्नधान्याची पिके घेतली जातात आणि त्याचा राज्यातील शेती उत्पादनातील वाटा मात्र २५ टक्केच आहे. यावरून लक्षात येते की, कमी शेतीमध्येही जास्त उत्पादन देण्याची क्षमता दुग्ध व्यवसायात आहे.
दुग्ध व्यवसायामध्ये दर वर्षी चार-पाच टक्के वाढ होते. म्हणजेच कृषी क्षेत्राच्या वार्षकि उत्पादनवाढीमध्ये या व्यवसायाचा महत्त्वाचा वाटा आहे. आज भारत दुग्ध व्यवसायातील जनावरांच्या संख्येमध्ये अव्वल स्थानी असूनही एकूण दुग्ध उत्पादनाच्या केवळ ०.२ टक्के निर्यात करतो. अर्थात आजही देशांतर्गत गरज आपण पूर्ण करू शकत नाही. आपल्याकडे सरासरी ३०० ग्रॅम प्रति माणशी प्रति दिवस याप्रमाणे दुधाची गरज असताना फक्त २३१ ग्रॅम दुधाचा वापर होतो. २०२० मध्ये ३३० ग्रॅम वापर होईल असे गृहीत धरले, तर मोठय़ा प्रमाणात दूध उत्पादन वाढवण्याची गरज आहे. मागील ६० वर्षांमध्ये दुधाचे उत्पादन २० दशलक्ष टनांवरून १०० दशलक्ष टनांपर्यंत वाढलेले असले तरी हे उत्पादन १३०-१४० दशलक्ष टनांपर्यंत वाढवण्याची गरज आहे.
खरं तर दुधाला पूर्ण अन्न म्हटले जाते. आजही दुधापासून प्रथिने, जैविके, प्रतिजैविके, खनिजे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, उष्मांक सर्वात जास्त मिळतात आणि इतर अन्नांतून मिळतात त्यापेक्षा ते स्वस्तही पडतात. दुधामध्ये जैविक गुणधर्म जास्त असल्यामुळे ते आरोग्यदृष्टय़ा सकस आहे. त्यामुळे दुधाचा वापर करून आपली लहान मुले आणि तरुण पिढी निरोगी तयार केली तर ते सक्षम आणि सशक्त देश घडवू शकतात.
जे देखे रवी.. – पशु-पक्ष्यांची ज्ञानेश्वरी ७
स्वधर्म कर्म केल्याशिवाय माणसाचे जीवन ओसाड होते, असे गीतेचे म्हणणे आहे. यात आपल्या वाटय़ाला आलेले कर्म हा सनातन विचार आता पार मागे पडला आहे. परवा एक मुलगी भेटली. ती म्हणाली, मी ‘गुन्ह्याच्या जागेची तपासणी’ या विषयाची तज्ज्ञ आहे. हल्ली वर्तमानपत्रे बघता हिला मागणी असणार आणि होतीच. कोण कुठे काय करील याचा हल्ली नेम नाही.
स्वेच्छेने स्वीकारलेले, वाटय़ाला आलेले,किंवा अचानक उद्भवलेल्या कर्माकडे दुर्लक्ष झाले तर ते आयुष्य शेळीच्या गळ्यावर असलेल्या स्तनासारखे व्यर्थ ठरते, अशी ओवी ज्ञानेश्वर सांगतात. हा स्तन दुधाच्या दृष्टीने निरुपयोगी असतो. अनेक प्राण्यांच्या माद्यांना दोन्ही बाजूला स्तनांची रांग असते. उत्क्रांतीत ती रांग कमी झाली. मनुष्य स्त्रीला दोनच स्तन असतात. सुंदर मी होणारच्या धर्तीवर, खूपच मी शिकणार, लग्नही नाही करणार आणि पुढे लग्न केल्यावर किंवा संबंधातून स्वातंत्र्य उपभोगण्याच्या दृष्टीने मूलही लवकर होऊ नाही देणार असल्या आधुनिक(!) विचारामुळे स्त्रियांचे स्तन आणि बीजांड कोश व्यर्थच ठरत नाहीत तर अनर्थाप्रत नेतात. नंतर मुले लवकर होत नाहीत. झाली तर त्या मुलांमध्ये विकृती जास्त असतात आणि स्तनांच्या रोगांचे प्रमाण जास्त असते, असे आता सिद्ध आहे. कर्म करणे म्हणजे केवळ नोकरी-धंदा किंवा शेती नव्हे. आपल्या शरीराच्या नैसर्गिक ऋतुचक्राबरोबर वैयक्तिक आशा-आकांक्षा आणि महत्त्वाकांक्षांना काबूत ठेवत सहजपणे जगणे हेही कर्मच असते आणि हा नियम पुरुषांनाही लागू आहे. आत्मकेंद्रित होत स्वार्थीपणे जगणे शेवटी विषयीपणाचे लक्षण असते. कारण त्यात सहभाग कमी आणि उपभोग जास्त असतो आणि हे विधान केवळ लग्न न केलेल्या ब्रह्मचाऱ्यांबद्दल (!) नाही. गरजेपेक्षा जास्त उपभोग ही गोष्ट कर्माच्या विरुद्ध आहे. उपभोगी पुरुष पतंगासारखी कुवतीपलीकडे जाऊन दिव्यावर झडप मारतात. मग मरतात, एवढेच नाही तर पुढे मेल्यावर घाण सुटते, असा उल्लेख ज्ञानेश्वरांनी तिसऱ्या आणि पुढच्या एका अध्यायात केला आहे. अतिभोगीपणा धोकादायक असतो. सापाबरोबर खेळता येत नाही आणि वाघाची संगत घात करते (का सर्पेसी खेळो येईल? व्याघ्रसंसर्ग जाईल?) भोगी माणूस मस्तवाल दिसत असेलही; परंतु तो पारध्याने घेरलेल्या हरिणासारखा दिसतो असं आता मलाही वाटू लागले आहे. (पारधी मृगातिये कवळोनी घातेचिया संधी साधावया) संधिसाधू हा वाक्प्रचार इथला. अतिभोगाच्या चिखलाशिवाय सडसडीत जगायचे असेल तर सगळ्याच प्राणिमात्रांना तिसऱ्या अध्यायात एक संदेश आहे. त्यात ज्ञानेश्वर म्हणतात- खरे तर सूर्यामुळे प्राणिमात्रांचे सगळे व्यवहार चालतात, पण तो कसा अलिप्त असतो ते बघा (जैसा का भूतचेष्टा गभस्ती। घेपवेना) गभस्ती म्हणजे सूर्य. घेपवेना म्हणजे अडकत नाही.
– रविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – पार्किन्सन्स – कंपवात : आयुर्वेदीय उपचार – ३
या विकाराचा एक काळ वर्षांतून एखाददुसराच पार्किन्सन्सग्रस्त रुग्ण यायचा; आता दर महिन्याला एकतरी नवीन रुग्ण येतो. या रुग्णाला एकटे राहायला मनाई करतो. लहान बाळगोपाळांसकट भरपूर मित्रमंडळीत नियमाने मिसळण्याचा आग्रह करतो. सार्वजनिक समारंभ, कट्टय़ावरच्या गप्पा यात पुढाकार घ्यावयास सांगतो. याप्रमाणे स्वत:ला दिवसभर गुंतवून घेतले की ताणतणाव कमी होतो. मानसिक आजारावरची माझी नेहमीची त्रिसूत्री आग्रहाने सांगतो. दीर्घश्वसन – प्राणायाम, सूर्यनमस्कार व शवासन उशी व गादी यांचा त्याग करून कठीण व उबदार अंथरूण व साडी, पंच्यासारखे उसे असा सल्ला पटवून देतो. या विकारात रुग्णाच्या हातांना मुंग्या येतात का; रुग्णाच्या रक्ताचे प्रमाण; ईएसआर- रक्त खर्च होण्याचा वेग, निद्रेतील अडचणी, खंडित निद्रा, अनिद्रा, उशिरा झोप येणे, मधुमेह, शरीराचे व अन्नातील वटघट यांचा मागोवा घेऊन औषधे दिली जातात.
या रोगाकरिता लक्षणानुरुप खूप औषधे आहेत. मूळ पार्किंन्सन्स रोगाकरिता लघुमालिनीवसंत सहा, सुवर्णमाक्षिकादि, लाक्षादि, गोक्षुरादि गुग्गुळ प्र. ३ दोन वेळा. झोपताना आस्कंद एक चमचा, निद्राकरवटी सहा गोळ्या द्यायलाच पाहिजेत.
‘अभ्यङ्गमाचरेन्नित्यं स जराश्रमवातहा’
या श्री वाग्भटाचार्याच्या सांगाव्याप्रमाणे आपले शरीराला, विशेषत: दोन्ही हातांना खालून वर; खांद्याला व मानेला गोल, सकाळ सायंकाळ तेल जिरविणे; प्रामाणिकपणे केले तर या अत्यंत दुर्धर वातविकारावर निश्चित जय मिळविता येतो; असा अनेक रुग्णांचा खराखुरा अनुभव आहे. रुग्ण कृश असल्यास व घाबरटपणा जास्त असल्यास शृंग व चंद्रप्रभा ही जादा औषधे द्यावी. कंजुषी करू नये. रुग्णात हिम्मत यावयास लागते. मधुमेह असल्यास दहा बेलाच्या छोटय़ा पानांचा व पिंपळपानांचा काढा घ्यावयास सांगावे. भारतीय विमानदलातील ९२ वर्षांचे एक महाशय माझी सल्लामसलत या रोगाकरिता घेतात, ही परममित्र कृपा; धन्यवाद!
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ३१ जुलै
१८४७ > लेखक, पत्रकार कृष्णाची बाबाजी गुरुजी यांचा जन्म. ‘भवानी तलवार’ या त्यांच्या काव्यावर ब्रिटिशांनी जप्ती आणली होती. राष्ट्रीय सभा, मारुतीचरित्र, अभिमन्युचरित्र, श्रीगणेत्सव, गोरक्षण का केले पाहिजे अशी पुस्तके त्यांनी लिहिली.
१८७२ > प्राचीन मराठी वाङ्मयाचे इतिहासकार, संतचरित्रकार हरिभक्तपरायण लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांचा जन्म. ‘भक्तिमार्गप्रदीप’ हे त्यांनी सिद्ध केलेले पुस्तक आजही घराघरांत असते. ‘मराठी भाषेचे स्वरूप’, तुकारामचरित्रामृत, महाराष्ट्रमहोदय, आनंदलहरी, पारिजातकाची फुले, नवविद्या भक्ती, संत एकनाथ व ज्ञानेश्वर यांची चरित्रे आदी पुस्तके त्यांनी लिहिली.
१९६८> वैदिक तत्त्वज्ञानाचे भाष्यकार वेदमूर्ती श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचे निधन. जवळपास ४०० हून अधिक पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. वैदिक राष्ट्रगीत व वैदिक प्रार्थनांची तेजस्विता या लेखांमुळे त्यांना इंग्रजांनी कारावासात धाडले. ‘भारतीय संस्कृती’ हा ५० लेखांचा संग्रह, ‘संस्कृत स्वयंशिक्षक माला (२४ भाग)’ वेदकालीन समाजदर्शनाची १२ पुस्तकांची मालिका, वेदांतील देवमंत्रांची ‘दैवतसंहिता’ आदी पुस्तके त्यांनी सिद्ध केली होती.
– संजय वझरेकर