उत्तम शेती, मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी असे पूर्वी म्हटले जात असे. पण आता शेती करायला सहजी कोणीच तयार होत नाही. अगदी शेतीशास्त्र शिकणारेसुद्धा अध्यापन, संशोधन, वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या, सल्लागार अशीच कामे प्राधान्याने करताना दिसतात. अर्थात, यालाही अपवाद आहेच. पण ढोबळमानाने हेच चित्र बहुतेक वेळी, बहुतेक ठिकाणी पाहायला मिळते. याचे कारण काय, याबाबत विश्लेषण केल्यास, वडिलोपार्जति जमिनीचे विभाजन होत होत अगदी लहान क्षेत्रफळच एका शेतकऱ्याच्या वाटय़ाला राहिल्याचे दिसते. सध्याच्या युगातील यांत्रिकीकरणाचा लाभ अशा शेतीला घेता येत नाही. याचबरोबर पारंपरिक पद्धतीने शेती करताना जी गुंतवणूक शेतीत करावी लागत होती, त्या तुलनेत बदललेल्या परिस्थितीत बियाणे, खते, पाणी, वीज, कीटकनाशके, तणनाशके, वाहतूक खर्च आणि मनुष्यबळ या सर्वावर होणारा खर्च खूप वाढला आहे. त्याचबरोबर शेतमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव बाजारात मिळत नाही, ही सर्वात मोठी अडचण आहे. उलट जेवढी त्या विशिष्ट पिकाची बाजारात आवक जास्त, तेवढा त्याचा दर कमी होतो.
मला वाटते, कांद्याचे उदाहरण इथे चपखल बसते. त्याकरिता होणाऱ्या आंदोलनामुळे हा प्रश्न सर्वज्ञात आहे. पण त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जात नाही. काहीतरी तात्पुरती मलमपट्टी केली जाते. त्यामुळे प्रत्येक वर्षी हा प्रश्न उभा ठाकतोय. शिवाय बाजारातील दलाल पद्धतीमुळे मध्यस्थ-दलालच गब्बर होताना दिसतो. त्यामध्ये उत्पादक शेतकरी मेहनत करूनही फायद्यापासून वंचित राहतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये सरकारने हमीभाव देऊन खरेदीचा मार्ग स्वीकारला असला तरी त्यामध्ये नुकसानच होते. कारण हे धान्य किंवा शेतीतील उत्पादन याची देखभाल, साठवण योग्य तऱ्हेने होत नाही. मग प्रत्यक्षात बाजारात या मालाची विक्री होणेच दुरापास्त ठरते. परिणामी, सरकारी योजनेत तोटा होतो. मग तोटा भरून काढायला या ना त्या मार्गाने कोणतातरी कर सर्वावर लावला जातो. म्हणजे पुन्हा ग्राहक म्हणून जनतेलाच आपल्या खिशातील पसे द्यावे लागतात.
-दिलीप हेल्रेकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग,  चुनाभट्टी,  मुंबई २२  
office@mavipamumbai.org

जे देखे रवी.. : फलश्रुती
१९७८ साली आमच्या प्लास्टिक सर्जरी विभागाला हिरवा झेंडा मिळाला. मी अडतीस वर्षांचा होतो आणि माझे अनेक वर्षांचे गुरू अठ्ठेचाळीस वर्षांचे. आता हा नवीन प्रवास सुरू होणार होता. पंधरा-वीस खाटांचा एक कक्ष आम्हाला देण्यात आला. धारावीने वेढलेल्या या आमच्या विभागात गरीब/ अतिगरीब, जखमी किंवा छिन्नविच्छिन्न अशा चारच प्रकारच्या रुग्णांचे वास्तव्य होते. मला आठवते, विभाग सुरू होताच मी कक्षात पाटी लावली ‘जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले..’ डॉ. डायस यांनी मला विचारले ‘याचा अर्थ सांग’ मी अर्थ सांगितल्यावर त्यांनी माझ्याकडे ज्या तऱ्हेने बघितले ते बघून हायसे वाटले. मी आठला येत असे आणि बारा एकपर्यंत थांबत असे. हे अकरा वाजता येत आणि चापर्यंत काम करत असत. थोडय़ाच दिवसांत आम्ही कामाचा डोंगर उभा केला. इतकी वर्षे ज्याची वाट बघितली होती ते शेवटी घडले होते. अपघातात होणाऱ्या जखमा हे आमच्यासमोरचे एक मोठे आव्हान होते. अस्थिव्यंग विभाग आणि आम्ही त्वचारोपणाच्या क्रियांमध्ये बुडालो होतो. पायावरच्या जखमा आणि उघडी पडलेली हाडे हे सगळ्यात मोठे आक्रीत होते. पाय निमुळता होत जातो आणि त्याचा रक्तप्रवाह खालच्या भागात स्वाभाविकपणे अरुंद भागात वाहतो. हाडे उघडी पडली असतात तेव्हा त्यांच्यामधली फ्रॅक्चर्स जुळणे अवघड होते. उघडी पडलेली पांढरी हाडे, नुसती बहित्र्वचेचे आवरण लावून बरी होणे अशक्य होते. मुळात त्यांच्यात रक्तप्रवाहच नसे. तर या नवीन त्वचेला सांभाळणार कोण? आजूबाजूची जाड त्वचेची हालचाल दुष्कर होती. कारण हलवण्याच्या, फिरवण्याच्या प्रक्रियेत त्यांचा रक्तप्रवाह पिळला जात असे. सगळ्यात हमखास उपाय होता दुसऱ्या पायाची त्वचा जाड चरबीसकट उचलणे व या जखमेला शिवणे आणि दोन्ही पाय एकमेकाला बांधून ठेवून तीन आठवडय़ांनी ती सोडवणे, जेणेकरून ही त्वचा नवीन ठिकाणी मूळ धरेल. हे बांधलेले पाय घेऊन रुग्ण कसे दिवस काढणार हा प्रश्नच होता. सार्वजनिक रुग्णालयात मलमूत्रासाठी भांडे मिळवणे हे नोबेल पारितोषिक मिळवण्यापेक्षा अवघड असते. परिचारिकांचे प्रमाण कमी आणि रुग्णांची वाढणारी संख्या आणि मर्यादित खाटा बघता पेचप्रसंग वाढतच चालला होता. आणि एके दिवशी डोक्यात वीज चमकावी तशी कल्पना अवतरली. गरजवंताला अक्कल नसते अशी एक म्हण आहे. त्या म्हणीचा संबंध याचना करण्याविषयी आहे. परंतु जेव्हा गरज पडते तेव्हा ती भागवण्यासाठी माणूस शक्कली लढवू शकतो, हेही तेवढेच खरे आहे. म्हणूनच इंग्रजीत Necessity is the mother of invention  अशी म्हण आहे. एका गरजवंताला सुचलेल्या कल्पनेने आमच्या विभागावर फार दूरगामी परिणाम होणार होता. त्याबद्दल पुढच्या लेखात.
– रविन मायदेव थत्ते  
rlthatte@gmail.com

वॉर अँड पीस : पोटदुखी -२
लक्षणे- बेंबीच्या वरच्या भागात पोटात दुखणे. छातीच्या मध्यभागी जळजळ होणे, आंबट उलटी किंवा ढेकर येणे. दात झिजणे. जेवणानंतर तीन ते चार तासांनी ठरावीक वेळी दुपारी, रात्री वा मध्यरात्री दुखणे. जंत किंवा कृमी पडणे. जीभ खराब असणे. भूक मंद होणे किंवा खूप लागणे. पोटात पाठीकडून मूत्राशयाच्या मार्गात कुठेही असह्य़ कळा येणे. लहान आतडय़ाला पिळा पडणे, त्यामुळे पूर्ण विश्रांती घेतल्यास, झोपून राहिल्यास बरे वाटते. अ‍ॅपेंडिक्सला सूज येणे. रिकाम्या पोटी दुखणे, काही खाल्ले असता बरे वाटणे. परसाकडे लागणे, गेल्यावर न होणे, नुसतीच शेम पडणे किंवा वायू सरणे. जुनाट मलावरोधाची खोड असणे. नवीनच पाळी यायला लागल्यावर काही महिने पोट दुखणे, विश्रांती घेतल्यास बरे वाटणे.
कारणे- उदरवात : अजीर्ण, पोट डब्ब होणे, आमाशयात किंवा वरच्या पोटात वायू धरेल किंवा पोट गच्च होईल, असे जड पदार्थ खाणे. घाईघाईने किंवा भूक नसताना जेवणे. खूप थंड, खूप गोड, तेलकट, न मानवणारे व न आवडणारे पदार्थ खाणे.
आम्लपित्त : तिखट, जळजळीत, आंबट, खारट पदार्थ खाणे, जागरण, उशिरा जेवण, दारू किंवा तंबाखूचे व्यसन असणे. चहा, मांसाहार, बेकरी पदार्थ.
अल्सर : वरील दोन्ही प्रकारची कारणे घडतील असे वागणे, फाजील चिंता करणे.
जंत : जंत वा कृमींकरिता कारण होईल असे खूप गोड, अस्वच्छ खाणे; खराब पाणी पिणे, माती खाणे, इत्यादी.
मूतखडा : खूप बिया असलेले पदार्थ, काजू, कोबी, चहा, मद्य व कोल्ड्रिंक यांचा अतिरेकी वापर, सातत्याने बोअरवेलचे पाणी.
अ‍ॅपेंडिस : अ‍ॅपेंडिसला सूज येणे. तसेच लहान आतडय़ाला वेढा पडणे.
रिकामे पोट : पोट रिकामे असणे, चटकन रिकामे होणे.
पक्वाशय : मोठय़ा आतडय़ात वायू किंवा आव साठणे, खाली न सरकणे, गुदद्वाराला सूज येणे. बारीक जंत किंवा मोठा जंत असणे.
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले

आजचे महाराष्ट्रसारस्वत : १८ मे
१९८५ >  कथा-कादंबरीकार वि. सी. गुर्जर यांचा जन्म. त्यांनी मराठी कथेत असलेली पारंपरिक नीतिमत्ता आणि बोधप्रदता बाजूला सारून रंजकता आणली.  त्यांनी रमेशचंद्र दत्त, रवींद्रनाथ ठाकूर, शरच्चंद्र चटर्जी या बंगाली लेखकांच्या कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद केले. ‘जीवनसंध्या’, ‘देवघर’, ‘प्रेमसंयोग’, ‘हिरक वलय’, ‘शंकांक’ या त्यांच्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या.
१८९८ > मार्क्‍सवादी लेखक व पत्रकार लालजी मोरेश्वर पेंडसे यांचा जन्म. ‘नवमतावाद’, ‘साहित्य आणि समाजजीवन’, ‘धर्म की क्रांती’, ‘गुन्हेगार’ ही त्यांची काही नावाजली गेलेली पुस्तके.
१९५०> मुंबई साहित्य संघाचे एक संस्थापक आणि कथा-कादंबरीकार, संपादक श्रीपाद महादेव वर्दे यांचे निधन. ‘पत्ता लागला’, ‘कल्पक रहस्य’, ‘सोनेरी पिंजरा’, ‘देशसेविकेचे रहस्य’ या त्यांच्या काही कादंबऱ्या.
१९७२> नाटय़समीक्षक, विनोदी लेखक आणि शिल्पकार रघुनाथ कृष्ण फडके यांचे निधन. ‘नाटय़परामर्श’ या पुस्तकात त्यांनी  मराठी रंगभूमीचा आढावा घेतला आहे. ‘स्वल्पविराम’ हा त्यांचा विनोदी लेखांचा संग्रह. ‘रत्नाकर’ मासिकातून त्यांच्या काही कविताही प्रसिद्ध झाल्या.
– संजय वझरेकर

Story img Loader