हा कर्टन कॉल आहे. नाटक संपल्यानंतर नाटकात काम करणारी सगळी नटमंडळी आपापला मेकप आणि कपडेपट तसाच ठेवून पडदा बाजूला सारून प्रेक्षकांना त्रिवार लवून, अभिवादन करतात. प्रेक्षक टाळ्या वाजवून त्याचं स्वागत करून, खेळ संपतो. एखादा गायक, कवी, लेखक आपल्या कलेचा आविष्कार करून अखेरच्या कृतीची पेशकश करतो, त्याला स्वान साँग म्हणतात. असं या समारोप लेखाचं स्वरूप आहे.
मुळात ‘कर्टन कॉल’ ही संकल्पना मनोहर आहे. आम्ही ‘नाटक’ नावाचा खेळ तुमच्यासमोर मांडला. रखरखीत प्रकाश रेषेपलीकडल्या रसिकांनी तो पाहिला. आता ते नाटक संपलं. पडद्यामागे असलेली रंगकर्मी मंडळी आता सेटची आवराआवर करत आहेत. आडव्या झालेल्या भिंती आणि खाली पडलेले लता कुंज, प्रेक्षक तुम्हाला नाही दाखवायचे. ते चालूच राहील. आम्ही पडद्यापुढे येऊन तुमच्यापाशी संवाद साधतो आहोत, कारण खेळ संपला तरी मित्रा, तुझं नि माझं नातं अबाधित आहे. हे नातेसंबंध कलाविष्कारापलीकडचे आहेत. ते नातं माणसामाणसांतलं आहे. सनातन आहे. चिरंतन आहे. म्हणून हा कर्टन काल. त्या संबंधाची मी कदर करतोय. लेख मालेला सुरुवात करण्यापूर्वी ‘वाचक’ म्हणून काय म्हणावं, कोणत्या नावानं पुकारावं, असा प्रश्न होता, त्यावेळी बालगंधर्व आपल्या प्रेक्षकांना ‘देवा’ म्हणून संबोधायचे त्याची आठवण झाली. म्हणून ‘मित्रा’, अशी पुकारायला सुरुवात केली. सरिता आव्हाडसारख्या पत्रमैत्रिणीला ते खटकलं म्हणून स्पष्टीकरण दिलं की हे ‘सेक्सीस्ट’ नाही. ‘मित्रा’, हे संबोधन असलं तरी त्यातलं ‘मैत्र’ महत्त्वाचं आहे.
मित्रा, लेखातल्या प्रत्येक संवादाला उत्स्फूर्त दाद, प्रतिसाद दिला तो पत्रमैत्रीण मेधा गोडबोले हिनं! मेधाच्या प्रत्येक पत्रातून लेखाचं आस्वाद्य रूप मला उलगडत असे. खरं म्हणजे, मेधानं कित्येक पत्रातून स्वतंत्र लेख लिहिला. थँक्यू मेधा.
डॉ. अमित बडवे हा सर्जन (दौंडवासी) अत्यंत भावपूर्ण प्रतिसाद देत असे. लेखाचं वाचन अतिशय बारकाईनं करून कधी हसून कधी गहिवरून प्रतिसाद देत असे. तर श्रीकांत कुलकर्णी (शाहू आणि स्वप्ना) यांनी त्यांच्या कुटुंबाचा ‘सोलमेट’ केलं. त्यांच्या पत्रातल्या नितळ भावना आणि सद्गदित होणं, अत्यंत हृद्य वाटलं. श्राकांतच्या पत्रामुळे मन खरंच भरून पावलं. ‘थँक्यू कुकूर’ या लेखाला आगरताला (त्रिपुरा)च्या अॅड. सुप. ऑफ पोलीस अभिजीत सत्पर्षीने मन:पूर्वक दाद दिली. कुकूर आणि बोकी खूप भाव खाऊन गेले. मधू बालाला अर्थात प्रतिसाद मिळाला, पण डॉ. दत्तप्रसाद दाभोळकरांनी ते ‘करिना कपूर’च्या प्रेमात असल्याची कबुली देऊन टाकली. ‘तेरा मेरा प्यार अमर’ गाण्याला दिवसभर फोन करून शेकडो साधना, शंकर जयकिशनच्या फॅननी दाद दिली. बकु, तेरडा, घाणेरी (गंध हारिका) सोनटक्का, कर्दळ, कैलाशपती या फुलांनी दिलेल्या प्रतिसादाची गणती अशक्य, वाचकांची नावं द्यायची ठरवली तर पुरवण्या काढाव्या लागतील. तुम्ही चहा घेणार की कॉफी? या लेखा समस्त दिलदार चहात्यांनी चहाला बोलावलं. कॉफीप्रेमात आम्ही शिष्ठ नाही असं ठासून सांगितलं. किती किती म्हणून सांगू. पण ग्लोरिया सुपबी वाघनखीच्या फुलांना आलेली फोटोरूपी पत्रं अगणित. त्यांचा स्वतंत्र लेख करून मित्राबरोबर बिअर प्यायला आवडतं असं मी सांगून आमंत्रणाची वाट पाहिली. आमंत्रण तर आलं नाहीच, एका मैत्रिणीने मात्र असे मद्यपानाचे संस्कार करू नका असा फटका दिला. मनमोराचा पिसारा त्याने फुलला.(समाप्त)
डॉ. राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
कुतूहल : वाचकांचा प्रतिसाद
श्री. हेल्रेकरांनी लिहिलेल्या आणखी एका लेखाद्वारे गच्चीतील बागेला चिमण्या व इतर पक्ष्यांपासून कसे संरक्षण द्यायचे हे लिहिले असताना, तुळशीदास भोईटे नावाच्या एका वाचकाने आपल्या गच्चीत गोगलगायी कसा उपद्रव देतात ते लिहून सदाफुली व तुळस या रोपांनाच फक्त त्यांचा उपद्रव होतो व इतरांना कसा होत नाही असा प्रश्न विचारला होता. थेट सूर्यप्रकाश न मिळाल्याने रोपांना वातावरणातील थंडी जाणवते का व अशा वातावरणात कोणती रोपे व भाज्या जगू शकतात असेही विचारले आहे.
अ. पां. देशपांडे
मराठी विज्ञान परिषद, पुरव मार्ग, चुनाभ ट्टी , मुंबई २२ office@mavipamumbai.org
इतिहासात आज दिनांक.. : ३१ डिसेंबर
१९२६ इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे यांचे निधन. त्यांचा जन्म २४ जून १८६३ रोजी वरसई येथे झाला. त्यांचे मूळ आडनाव जोशी. काशिनाथपंत आणि यमुनाबाई यांचे हे आपत्य. प्राथमिक शिक्षण पुण्यात झाले. डेक्कन कॉलेजातून इतिहास विषय घेऊन ते बी.ए. झाले. वनस्पतिशास्त्र, फ्रेंच, इतिहास, मानसशास्त्र हे त्यांच्या आवडीचे विषय होते. राजवाडे यांचे चरित्रकार सुरेश देशपांडे लिहितात, इतिहास संशोधन, इतिहास लेखन व इतिहास संकलन या ध्येयाने राजवाडेंना जणू पछाडले होते. त्यांनी महाराष्ट्राच्या व मराठय़ांच्या समग्र इतिहास लेखनाची पायाभरणी केली. त्यामुळे त्यांना ‘इतिहासाचार्य’ हे नामाभिधान समर्पक ठरते. ‘मराठय़ाच्या इतिहासाची साधने’ या प्रचंड प्रकल्पात त्यांनी गोळा केलेले दस्तऐवज पाहिले तर कोणीही थक्क होतो. पण त्याहून विशेष आहेत त्या खंडांना राजवाडे यांनी लिहिलेल्या प्रस्तावना. . समाज शास्त्रीय दृष्टिकोन व ऐतिहासिक तत्त्वमीमांसा यांचा सुंदर मिलाफ त्यात आढळतो. समाजविकास, वाङ्मय चिकित्सा, भाषाशास्त्र या क्षेत्रातही त्यांनी संचार केला आणि भावी संशोधकांना नवनव्या वाटा दाखवून दिल्या. त्यांनी प्रतिज्ञापूर्वक मराठीतून लेखन केले. इतर भाषांमधील उत्तम ग्रंथ मराठी आणण्यासाठी भाषांतर मासिकाचा प्रयोग व भारत इतिहास संशोधक मंडळ स्थापना महत्त्वाची आहे. १९७४ भारत व पोर्तुगाल यांच्यात राजनैतिक संबंध पुन: प्रस्थापित. १९७८ कर्नाटकात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा केंद्राचा निर्णय.
डॉ. गणेश राऊत – ganeshraut@solaris.in
सफर काल-पर्वाची : सफर प्रतिसादांची-२
२६ सप्टेंबर, स्मिता पटवर्धन, सांगली – आपले लिखाण अत्यंत नावीन्यपूर्ण आहे. परंतु एखाद्या विषयाचे आपण दोन-तीन भागांत लिहून एकदम दुसऱ्याच कुठल्यातरी देशातील घटनांवर लिहिता ते वाचायला गैरसोयीचे होते. अलीकडे आपण काश्मीरविषयी लिहून लगेच इजिप्तमधील ममीविषयी लिहिलेत. अशा लिखाण पद्धतीचे काही निश्चित कारण आहे काय?
११ फेब्रुवारी, श्रीपाद ओक, डोंबिवली – ‘सफर’ या सदरातील आपले लिखाण अत्यंत अप्रतिम आहे. अलंकारिक भाषा अजिबात न वापरता सोपे व सुसूत्र लिखाणामुळे गुंतागुंतीचा इतिहास आपण उलगडून दाखविता. आपल्या लेखांपैकी नार्वेजियन तरुणांचे धाडस, चर्चिलविषयीचे लेख, सत्याग्रहाचा जन्म, अयातोल्ला खोमेनी, स्पॅनिश बुलफाइट वगैरे लेख पुन्हा पुन्हा वाचावेसे वाटतात. ‘लोकसत्ता’चा अंक आला की प्रथम आम्ही ‘सफर काल-पर्वाची’ वाचतो.
२९ मे, अनिकेत मांडे- आपले क्रिमियन युद्ध व चर्चिल आणि गोगीया पाशा हे लेख विशेष आवडले.
२ जून, चंद्रकांत कवटकर, अंधेरी- आपला महेंद्र व संघमित्रा हा लेख नावीन्यपूर्ण वाटला. या विषयावरील अधिक सखोल माहितीचे पुस्तक आपण सुचवू शकाल काय?
२९ सप्टेंबर, ज्योत्स्ना सोनाळकर – आपल्या इजिप्तच्या ममिफिकेशनबद्दल बारीक माहिती अभ्यासपूर्ण वाटली. इजिप्तच्या प्राचीन इतिहासाविषयी एखादे पुस्तक आपण सुचवाल काय? आपले इतिहासाविषयी एखादे पुस्तक आहे काय?
वरीलप्रमाणेच राजा गुप्ते, नितीन पंडित, रवी तोरणे, सुजाता गुप्ते, शांताराम सावंत, उमेश जाधव यांचे ‘सफर काल-पर्वाची’ या सदराबद्दल प्रतिक्रिया असणारे मेल आले आहेत. (समाप्त)
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com