आपल्याकडून शत्रुपक्षाला गोपनीय माहिती मिळू नये म्हणून सन्याच्या वा पोलिसांच्या ताब्यात सापडल्यावर अतिरेकी, गुंड सायनाइडच्या गोळ्या खाऊन आत्महत्या करतात. खरेच का सायनाइड खाल्ल्यावर तात्काळ मृत्यू येतो?
सायनाइडची विषबाधा मुख्यत्वेकरून जे पदार्थ पाण्यात विरघळल्यावर सायनाइड आयन तयार करतात अशा पदार्थातून होते. सर्वसामान्यपणे सायनाइडची विषबाधा ही वायू स्वरूपातील हायड्रोजन सायनाइड आणि स्फटिक स्वरूपात असलेल्या पोटॅशिअम व सोडिअम सायनाइड यांच्यामुळे होऊ शकते. यातील हायड्रोजन सायनाइडमुळे तीव्र विषबाधा होऊन तात्काळ मृत्यू येऊ शकतो. लोकर, रेशीम आणि पॉलियुरेथेन किंवा व्हिनील इ. पदार्थ जाळल्यास यातून निघणाऱ्या धुरात या वायूचा समावेश असतो. हायड्रोजन सायनाइडचे औद्योगिक पातळीवर उत्पादन केले जाते आणि पॉलिमरपासून ते औषध कीटकनाशकांमध्ये वापरले जाते. त्यामुळे कीटकनाशकांमार्फतही ते आपल्यापर्यंत पोहोचू शकते. हायड्रोजन सायनाइड वायू हा रंगहीन असून याचा उत्कलनांक २५.६ अंश सेल्सिअस आहे. हा वायू पाण्यात विरघळतो आणि सायनाइड आयन तयार होतात, या स्वरूपात याला ‘हायड्रोसायनिक आम्ल’ म्हणतात. शरीरात गेल्यानंतर हायड्रोसायनिक आम्ल जठरात शोषले जाते व विषबाधेची लक्षणे दिसतात. पेशीतील मायटोकाँड्रियामध्ये असलेल्या ‘सायटोक्रोम सी ऑक्सिडेज’ या विकराच्या यंत्रणेवर या आम्लामुळे विपरीत परिणाम होतो व पेशी प्राणवायूचा उपयोग करू शकत नाही. म्हणजे रक्तात प्राणवायू पुरेशा प्रमाणात असला, तरीही पेशी प्राणवायूअभावी गुदमरतात व मरतात. साहजिकच व्यक्ती मृत्युमुखी पडते.
पोटॅशिअम आणि सोडिअम सायनाइड हे पांढऱ्या रंगाच्या स्फटिक स्वरूपात असतात. हे दोन्ही पाण्यात विद्राव्य आहेत. या धातू सायनाइडची आम्ल आणि पाण्याबरोबर रासायनिक अभिक्रिया होऊन हायड्रोसायनिक आम्ल तयार होते. सायनाइडची विषारी शक्ती त्यातून बाहेर येणाऱ्या हायड्रोसायनिक अॅसिडवर अवलंबून असते. ६० मि.ग्रॅ. शुद्ध हायड्रोसायनिक अॅसिड वा २०० मि.ग्रॅ. पोटॅशिअम सायनाइडमुळे मृत्यू होतो. हायड्रोसायनिक आम्लाचे सेवन केल्यास २ ते १० मिनिटांत, तर सोडिअम वा पोटॅशिअम सायनाइड खाल्ल्यास ३० मिनिटांत मृत्यू ओढवतो.
डॉ. जगन्नाथ दीक्षित (औरंगाबाद)मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
मनमोराचा पिसारा – डॉक्टर, रुग्ण आणि इतर सर्वासाठीचं वाचनीय पुस्तक
वैद्यक विषयातील माहिती देणाऱ्या पुस्तकांचे तीन-चार प्रमुख प्रकार असतात. (अर्थात पाठय़पुस्तकं वगळून) विविध रोगांची तपशिलात माहिती देणं, रोगांवरच्या उपचाराविषयी काही निवेदन करणं. काही पुस्तकं वैयक्तिक किंवा रुग्णांच्या (कुटुंबीय, समाज इ.) अनुभवावर बेतलेली तर काही वैद्यकीय पेशातील लोकांचा (डॉक्टर, औषध कं. इ.) भ्रष्टाचारावर झोड उठवणारी. पुस्तकातील मांडणीचा हा साचा ‘द हेल्दी माइण्ड, द हेल्दी बॉडी’ या पुस्तकाच्या लेखकानंही वापरलेला आहे (टीकेचा उद्देश नाही). या वस्तुपाठाच्या पलीकडे जाणाऱ्या काही पुस्तकांचा ‘पिसाऱ्या’मधल्या लेखात पूर्वी परिचय करून दिलेला आहे. (हाऊ डॉक्टर्स थिंक, कम्युनिकेशन फॉर डॉक्टर्स) परंतु, त्याही पलीकडे जाणारं अत्यंत उद्बोधक वाचनीय, प्रेक्षणीय असं हे पुस्तक हॅण्डबुक टाइम-लाइफ मेडिकल प्रसिद्ध केलेलं आहे.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर उत्तम आरोग्याकडे तुमच्या मनाचा कसा उपयोग कराल, असं म्हटलंय. (१) तणावमुक्ती (२) सुदृढ राहणं (३) आजारपणाचं व्यवस्थापन (४) रोगप्रतिकारशक्तीची वाढ (५) आनंदी मनोवृत्ती (मूड) टिकवणं आणि आरोग्यावरचा खर्च कमी करणं.
पुस्तकाचं स्वरूप हॅण्डबुक म्हणजे सहज वापरण्यास योग्य अशी माहिती वाचकापुढं दर्शनीय पद्धतीने मांडणं. साहजिकच पुस्तकात छोटी छोटी केसकथनं आहेत. लहान-मोठे तक्ते आहेत. काही चौकटीत मांडलेल्या प्रश्नावली आहेत. इतकंच काय पुस्तक वाचण्यापूर्वी छोटी चाचणी आहे आणि पुस्तक कसं वापरावं, याच्या सूचना आहेत.
थोडक्यात, विषयाचं गांभीर्य, महत्त्व आणि त्यातील वेदना लक्षात घेऊन पुस्तकानं वाचकाशी खेळीमेळीनं मैत्री केलेली आहे. पुस्तकाचा रोख आजार नसून आरोग्य कसं राखाल? व्यक्तिमत्त्व विकास म्हणजे मनोविकारतेला कसा चेकमेट द्यायचा असा आहे.
विनोद आणि हास्यरस याला ‘लाफ्टर द बेस्ट मेडिसीन’ असं म्हटलं जातं. डॉक्टरांवर केलेले, आजारामुळे होणारी पंचाईत आणि गैरसमज यावर चुटके सांगितले जातात. क्षणभर हसू येतं, पण निरोगी विनोद कोणता? याविषयी भाष्य इथे केलं आहे. विशेषत: बारीकसारीक शारीरिक तक्रारी करणाऱ्या (हायपोकॉण्ड्रीअॅक) रुग्णांना जनरल डॉक्टर ‘चिअरअप’ (हसून विसरा) असा सल्ला देतात. अशा वेळी रुग्णाला हसू येत नाही, डॉक्टरला हसू येतं आणि त्यामुळे आपल्याला डॉक्टर समजून घेत नाही, माझ्या वेदनेची खिल्ली उडवली जाते आहे, असा रुग्णाचा (गैर?) समज होतो.
रुग्णग्रस्ततेतून सुटका करणं डॉक्टरला सहज-सोपं वाटतं. ते उत्तमच. कारण, त्यातून डॉक्टरचा आत्मविश्वास दिसून येतो. पण कधी रोगाचं गांभीर्य डॉक्टरला झेपत नाही आणि अपुरी माहिती देऊन तिथून डॉक्टर निसटतो किंवा रुग्णाला आजारातल्या धोक्याची नीट कल्पना देत नाही किंवा रुग्णाला घाबरवतो. या प्रत्यक्ष अडचणीच्या प्रसंगी रुग्ण आणि डॉक्टरनं परस्परांशी कसं नातं जोडावं यावर मुद्देसूद विवेचन आहे.
काही वेळा रुग्णाईत असण्याची रुग्णाच्या मनावर (अंतर्मनावर) इतकी सखोल प्रतिमा उमटते की त्यामुळे आपण आपल्यापरीनं विकाराचा सामना कसा करावा हे कळत नाही. रुग्ण मतिमूढ होतो. अशा वेळी रुग्ण आपली कल्पनाशक्ती वापरून स्वत:ची धडधाकट प्रतिमा मनावर कोरू शकतो.
आधुनिक ताणतणावानं मनावर विपरीत परिणाम होतो आणि शरीर चुकीच्या पद्धतीनं ताणाशी मिळतंजुळतं घेतं (मॅलअॅडाप्टेशन) अशा वेळी केवळ वैद्यकीय उपचार पुरत नाहीत. किंबहुना निष्कारणच रुग्णाचं मन शरीरात खिळवून ठेवलं जातं. त्या वेळी आपल्या मनाचा ठामपणा, वेळेचं सुनियोजन, आरोग्यसंपन्न सवयी वैद्यकीय उपचारांपेक्षा सरस ठरतात. हीच गोष्ट वारंवार चिडचिड, संतापाचा उद्रेक, तंबाखू, अमली पदार्थ, दारू यांची व्यसनं याभोवती जीवन घोटाळत राहतं.
यावर वैद्यकीय माहिती हवी, पण त्यावर मात कशी करायची याच्या युक्त्या इथे दिल्या आहेत. फक्त डॉक्टरांनीच नव्हे, तर सर्वानी सहज वाचावं, चाळावं आणि माहितीबरोबर सहभागी व्हावं, असं हे पुस्तक आहे.
डॉ.राजेंद्र बर्वे – drrajendrabarve@gmail.com
प्रबोधन पर्व – सार्वभौम मूल्यांचा सिद्धान्त
सार्वभौम मूल्यांच्या सिद्धांताबाबत आचार्य दादा धर्माधिकारी लिहितात, युद्ध अशक्य झाले आहे, पण भांडण शिल्लकच आहे. ही जी आजची परिस्थिती आहे या परिस्थितीतून एकच उपाय आहे; तो म्हणजे, माणसांच्या मनोवृत्तीत पालट झाला पाहिजे. या मनोवृत्तीला मी ‘विधायक मनोवृत्ती’ म्हणतो. आता फक्त रचनात्मक आणि विधायक कार्यक्रम पुरेसा नाही. त्यांच्या जोडीला विधायक मनोवृत्तीचीही आवश्यकता आहे. विधायक वृत्ती जर नसली तर विधायक कार्यक्रमदेखील भांडणाचा कार्यक्रम होऊ शकतो आणि रचनात्मक कार्यक्रमदेखील विध्वंसात्मक कार्यक्रम होऊ शकतो. त्यामुळे संस्था, उपकरणे, संघटना यांच्यामागे विधायक मनोवृत्तीची गरज आहे.
ही मनोवृत्ती विज्ञानाने निर्माण होत नाही. विज्ञानाने Standardisation होते- एकसारखेपणा निर्माण होऊ शकतो. पण माझ्या आणि तुमच्या मनात पालट घडवून आणणे, हे काही विज्ञानाला शक्य नाही. त्याने राहणीत थोडासा फरक होतो आणि त्यामुळे मनाला एक वळण लागते आणि क्षणभर असा भास होतो की यांच्या मनोवृत्तीत पालट झाला. आपण उदाहरण घेऊ. निरनिराळ्या प्रांतांतून मी हिंडतो. सगळीकडे मध्यमवर्गाच्या आणि विद्यार्थ्यांच्या अनेक सभा होतात. खेडय़ातील माणसे जेव्हा सभेला येतात तेव्हा आपल्याला कळू शकते की, हा माणूस महाराष्ट्रातला आहे, हा सौराष्ट्रातला आहे इत्यादी. पण मध्यमवर्गाची माणसे किंवा विद्यार्थी जेव्हा सभेला येऊन बसतात तेव्हा त्यांच्या बाह्य़ांगात कसलाही फरक नसतो. तोच बुशकोट किंवा शर्ट, तीच पँट, त्याच प्रकारचे चष्मे, तीच केसांची ठेवण. नुसते बघितल्यावरून काही सांगता येत नाही, की अमुक महाराष्ट्रातला आहे, अमुक गुजराती, बंगाली किंवा बिहारी आहे. हे कळते केव्हा? जेव्हा आपण म्हणू की मानभूम हा जिल्हा बंगालात गेला पाहिजे की बिहारचा विद्यार्थी असेल तो एकदम उठून उभा राहील. त्याचे डोळे लालबुंद होतील आणि तो तावातावाने बोलू लागेल. बंगालचा विद्यार्थी त्याला विरोध करू लागेल आणि मग दोन बुशकोट आणि दोन पँटा एकमेकांशी मारामाऱ्या करू लागतील!