१९७३ चा ज्ञानपीठ पुरस्कार दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांना त्यांच्या ‘नाकुतन्ती’ या काव्यसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. हा काव्यसंग्रह १९६२ ते १९६६ या कालखंडातील प्रकाशित भारतीय भाषेतील सृजनात्मक साहित्यात सर्वश्रेष्ठ म्हणून घोषित करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार उडिया कादंबरीकार गोपीनाथ मोहन्ती यांच्यासह विभागून देण्यात आला.
द. रा. बेंद्रे यांची मातृभाषा मराठी, परंतु मराठी, कन्नड, इंग्रजी आणि संस्कृतमधून त्यांनी काव्यलेखन केले आहे. ‘अंबिकातनयदत्त’ या नावानेही ते कर्नाटकात प्रसिद्ध आहेत. बेंद्रे यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्य़ातील केळशी या गावचे. घरी विलक्षण दारिद्रय़. त्यामुळे त्यांचे पूर्वज धारवाड येथे वास्तव्यास आले. १३ जानेवारी १८९६ रोजी धारवाड येथील एका ब्राह्मण परिवारात त्यांचा जन्म झाला. वडील गंडमाळेने आजारी पण आईचे संस्कार, प्रेम आणि वेदसंपन्न आजोबांचे संस्कार हीच वारसाहक्काने त्यांना मिळालेली संपत्ती. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण धारवाड येथे झाल्यावर पुण्यातील फग्र्युसन कॉलेजमधून ते बी.ए. झाले. पुढे मुंबई विद्यापीठातून ते १९३५ मध्ये एम.ए. झाले. १९४४ ते ५६ मध्ये ते सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये कन्नडचे प्राध्यापक होते. १९५६ ते ६६ पर्यंत आकाशवाणी धारवाड केंद्रावर साहित्य सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले.
सुरुवातीला राष्ट्रीय चळवळीत त्यांचा सहभाग होता. ‘नरबली’ या त्यांच्या कविता लेखनामुळे १९३२ मध्ये त्यांना तुरुंगवास व अज्ञातवास भोगावा लागला. १९४३ पर्यंत त्यांच्या जीवनात स्थिरता नव्हती. ‘बालकाण्ड’ या कवितेने बेंद्रे यांनी, आपल्या बालपणच्या आठवणी व्यक्त केल्या आहेत. १९३२ मध्ये ‘कृष्णाकुमारी’ हा बेंद्रे यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. २६ काव्यसंग्रह, दोन नाटके, कथासंग्रह, नऊ समीक्षाग्रंथ, सहा अनुवादित पुस्तके- एवढे विपुल लेखन त्यांनी कन्नडमध्ये केले आहे.बेंद्रे यांच्या काव्याला अनेक समीक्षक ‘बौद्धिक काव्य’ म्हणतात. त्यांच्या कितीतरी कविता बौद्धिक असल्या तरी त्यांच्या इतर कवितांचे विषय आध्यात्मिक आणि रहस्यवादीच आहेत. निसर्ग, प्रेम, देशभक्ती, सामाजिक जाणीव व आध्यात्मिक चिंतन- ही त्यांची आवडती विषयसूत्रे आहेत.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com
पल्स ऑक्सिमीटर
जगण्यासाठी ‘ऑक्सिजन’ किती आवश्यक आहे हे सर्वानाच माहीत आहे. हा ऑक्सिजन फुफ्फुसांमधून रक्तावाटे शरीराच्या सर्व अवयवांना पोहचविला जातो. हा ऑक्सिजन घेऊन रक्तातील ‘हिमोग्लोबिन’ हे द्रव्य रक्तवाहिन्यांतून धावत असते. त्याला ‘ऑक्सिहिमोग्लोबिन’ म्हणतात. पेशींना ऑक्सिजनचा पुरवठा करून रिक्त झालेल्या हिमोग्लोबिनला ‘डीऑक्सिहिमोग्लोबिन’ असे म्हणतात. या दोन प्रकारच्या हिमोग्लोबिन द्रव्यांची लाल आणि अवरक्तकिरणे शोषणाची क्षमता वेगवेगळी असते. हे गुणतत्त्व वापरून रक्तातील ऑक्सिजनच्या प्रमाणाची टक्केवारी कळू शकते. हातापायांच्या बोटाला किंवा कानाच्या पाळीला चिमटय़ासारखे बसून रक्तातील ऑक्सिजनची टक्केवारी सांगणारे हे उपकरण म्हणजेच ‘पल्स ऑक्सिमीटर’.
न्यूमोनिया, अस्थमा असे श्वसनमार्गाचे आजार, बळावलेला हृदयरोग अति घोरण्याचे आजार यामध्ये पल्स ऑक्सिमीटरचा खूप उपयोग होतो. रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात सर्वाधिक वापरले जाणारे हे उपकरण सामान्य माणसाला समजावयास व वापरावयासही अतिशय सोपे असते. कुठलेही इंजेक्शन न वापरता अथवा रक्तचाचणी चिकित्सा करून सहजपणे पुष्कळ माहिती देणारे हे उपकरण आहे.
बरेचदा लोक लेह-लडाखसारख्या समुद्रसपाटीपासून उंचीवरील जागी प्रवास करण्यास जातात. या ठिकाणी हवेचा दाब कमी आणि ऑक्सिजनचे प्रमाण विरळ असते. योग्य काळजी न घेतल्यास श्वासोच्छ्वासास त्रास होऊ शकतो. त्या वेळेस डॉक्टर पल्स ऑक्सिमीटरवर ऑक्सिजनची पातळी कमी असल्यास रुग्णाला नळकांडय़ाद्वारे कृत्रिम ऑक्सिजन देतात. सर्वसाधारण तरुण आणि निरोगी माणसाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण ९५ – १०० टक्के असते. वाढत्या वयाप्रमाणे ते थोडेफार कमी होण्याची शक्यता असते. हे प्रमाण ९० टक्क्याच्या खाली गेल्यास रुग्णाला उपचारांची गरज भासते.
या उपकरणाचा तोटा असा की ते हलके आणि संवेदनशील असल्याने बोट थंड पडल्यास अथवा थोडय़ा हालचालींमुळे चुकीचे प्रमाण दाखविण्याचा संभव असतो. वेळ आल्यास रक्तचाचणी करून ऑक्सिजनचे प्रमाण नक्की करावे लागते. थोडक्यात ‘पल्स ऑक्सिमीटर’ ही आरोग्याची सगळ्यात कडक चाचणी आहे आणि त्यात उत्तीर्ण होण्यासाठी ९०% टक्के गुण अपेक्षित आहेत!
– डॉ. शीतल चिपळोणकर
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org