डॉ. नीलिमा गुंडी
मानवी जीवनाच्या मुख्य अवस्था म्हणजे बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य. या अवस्था वाक्प्रचारांमधून टिपल्या गेल्या आहेत. लहानपणी मूल बोलायला लागते, तेव्हा अडखळत बोलते. तोंडात दात नसल्यामुळे त्याला काही अक्षरांचा उच्चार करता येत नाही. त्याचे हे ‘बोबडे बोल’ वाक्प्रचारामध्ये जागा पटकावतात. त्याचा सूचित अर्थ होतो, अधिकार नसताना बोलणे. यामागे अर्थातच विनम्र भाव असतो. उदा. संत तुकडोजी महाराज म्हणतात : ‘जीवनाचे माझ्या बोबडे हे बोल / गोड करुनी घ्याल, वाटे जिवा’
पौगंडावस्थेतील मस्ती दर्शवणारा वाक्प्रचार म्हणजे ‘शिंग फुटणे’. वासरे वयात आली की त्यांना शिंगे फुटतात. तो संदर्भ येथे अलंकरणाने येतो. या वयातल्या मुलांची जादा चौकस वृत्ती, बंडखोरी या वाक्प्रचारातून सूचित होते. ‘मिशांना पीळ भरणे’ हा वाक्प्रचार तरुण मुलातील धमक, प्रौढी मिरवणे सांगून जातो. मुलगी वयात येते, तेव्हा तिच्या शरीरातील महत्त्वाच्या बदलाची – मासिक पाळी सुरू होण्याची – दखल घेणारा वाक्प्रचार म्हणजे, ‘मुका मुलगा होणे’. शारीरिक क्रियेचा स्पष्ट उल्लेख त्यामुळे टाळला जातो. ‘गद्धेपंचविशी’ हा वाक्प्रचार नेहमी वापरला जातो. त्यात जनावराशी माणसाचे असणारे साम्य गृहीत धरले आहे. गाढव निमूटपणे पाठीवर ओझे वाहत असते. त्याप्रमाणे संसाराच्या चाकोरीत दैनंदिन कामाची ओझी वाहणारा आणि स्वत:च्या मूढपणावर चरफडणारा तरुण जीव या वाक्प्रचारातून लक्षात येतो. ‘पिकले पान’ या वाक्प्रचारातून म्हातारपण नेमके कळते. झाडावरचे पान पिकले की गळून जाते. वृद्धत्व आलेली व्यक्तीही तशीच मरणाच्या वाटेवर असते, हे यातून सूचित होते. मृत्यूच्या वेळी वारस वा जवळची व्यक्ती मरणाऱ्या व्यक्तीचे डोके मांडीवर घेते, तेव्हा त्या व्यक्तीला निश्चिंतपणे मरण येते. त्यामुळे ‘मांडी देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ आहे, जबाबदारी घेणे.
वीचितरंगन्याय : पाण्यात एकामागोमाग एक लाटा निर्माण होतात. क्रमाक्रमाने त्या किनाऱ्यावर फुटतात. तोवर नव्या लाटा येत असतात. सातत्याने एकामागून दुसरी पिढी येत असते; ही जगण्याची रहाटी या दृष्टांतातून सूचित होते.
nmgundi@gmail.com