आज जास्तीत जास्त अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी तसेच शेतमजूर दुग्ध व्यवसायाद्वारे शेतीला शाश्वत स्वरूप देण्याचा प्रयत्न करतात. हा व्यवसाय एक-दोन गाईंपासून २०-२५ गाईंपर्यंत केला जातो. गोठा उभारून त्यात गाईंना बांधून ठेवले जाते. गाईंना पाणी पाजण्यासाठी तसेच जागा बदलण्यासाठी सोड – बांध करावी लागते. तसेच खाली स्वच्छता ठेवण्यासाठी शेण उचलण्याचे आणि झाडून घेण्याचे काम दिवसातून दोन – तीन वेळेस करावे लागते. चारा काढणे, वाहतूक करणे व गरजेनुसार जनावरांना देणे यासाठी मोठय़ा प्रमाणात मनुष्यबळाचा वापर होतो. गाईचे दूधही हाताने काढले जाते. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात श्रम आणि वेळ लागतो. यांपकी बहुतांशी कामे महिलाच करतात.
अनेकदा लग्न करताना मुलीच्या वडिलांनी मुलाच्या घराबाहेर गाईंचा गोठा बघितला तर मुली देण्याचे टाळले जाते! दूध धंद्यातील महिन्याच्या ४०-५० हजार रुपयांपर्यंतच्या उत्पन्नापेक्षा कमी पगाराच्या नोकरीत मिळणारा मुलगा बघून मुलीचे लग्न लावून देण्यात आज वधुपिता धन्यता मानतो.
दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, या व्यवसायाकडे इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन. ज्याप्रमाणे शेती व्यवसायामध्ये विस्तार यंत्रणा, संशोधन संस्था, सरकारी योजना आणि धोरण हे उत्पादन वाढीसाठी पोषक असतात त्याप्रमाणे दुग्ध व्यवसायामध्ये या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार होत नाही. शेती मालाचे भाव दरवर्षी वाढतात, परंतु दुधाचे भाव तीन-चार वर्षांनी वाढतात. दुधाच्या भावामध्ये उत्पादकापेक्षा ग्राहकांचाच जास्त विचार करून फारच अल्प दरवाढ केली जाते.
दुग्ध व्यवसाय नवीन तंत्रज्ञानाने करायचा म्हटले तर भांडवली खर्च आला. गाईंचा गोठा, फिरण्यासाठी बंदिस्त जागा, चॉफ कटर, दूध काढण्याचे यंत्र, चारा काढण्याचे यंत्र, जनरेटर यांसारख्या बाबींचा वापर केला तर दुग्ध व्यवसायाचा उत्पादन खर्च कमी होतो. स्वच्छ दुग्ध निर्मिती होते. परंतु या सर्व बाबींना पुरेसे अनुदान मिळत नाही. या भांडवली खर्चाला ५० टक्क्यांपर्यंत अर्थसाहाय्य मिळाले तर या व्यवसायामध्ये मोठय़ा प्रमाणात परिवर्तन होण्यास वेळ लागणार नाही.
जे देखे रवी.. – पक्ष्यांचा थवा/ टोळ धाड
वैज्ञानिक प्रयोगशाळेत शोध लावतात, अशी एक समजूत असते ती खरीच असली तरी त्यातले काही शोध अचानक आणि अपघाताने लागतात हेही तेवढेच खरे आहे. उदाहरणार्थ, राँटजेनला सापडलेले क्ष-किरण. पण त्यामागे परिश्रम होतेच. पण त्याहून महत्त्वाची असते ती द्रष्टय़ा प्रज्ञावंतांनी केलेली मानसिक/ बौद्धिक एकाग्रता. बाहेरच्या जगासंबंधी लागणारे शोध शेवटी अंतर्मुख, संयमी, स्वत:च्या वैयक्तिक प्रकृतीचे दमन केलेल्या मनांची देन असते. त्याला आपल्यात प्रत्याहार म्हणतात. प्रत्याहाराने पराक्रम केला। विकारांचा समूह मारला। इंद्रियांना कैद केले। हृदयात ।। .. अशी ओवी ज्ञानेश्वर सांगतात तेव्हा इंद्रियांच्या विकारावर ताबा मिळवल्याशिवाय प्रत्याहार घडत नाही, असे म्हणत असतात.
अणूंच्या हृदयातली धगधग समजून घेण्यासाठी अनेकांनी अशा प्रत्याहारांचा वापर केला, मग त्याचे गणित मांडले आणि मगच अणूंचे अदृश्य रूप कागदावर उतरू शकले. त्यात एका सभागृहाच्या आकाराची पोकळी म्हणजे अणूचे क्षेत्र असे गृहीत धरले तर त्यातला केंद्रक आंब्याएवढा आणि त्याभोवती फिरणारे इलेक्ट्रॉन्स माशीएवढेसुद्धा नसतात. हा स्वत:भोवती फिरणारा केंद्रक आणि हे इलेक्ट्रॉन्स त्यांच्यातल्या ऊर्जेमुळे फिरतात. या इलेक्ट्रॉन्सना आणि त्यांच्यातल्या ऊर्जेला, आपल्याला उपयोगी पडेल अशा तऱ्हेने कामाला लावता येईल, असे विधान आइन्स्टाइनने केले होते, ते शेवटी प्रयोगशाळेत सिद्ध झाले आणि मग बाजारात आले, असे विज्ञानाचा इतिहास सांगतो. या इलेक्ट्रॉनला त्याच्या ऊर्जेच्या साजेशी एखाद्या प्रकाशकणाची गोळी मारली तर हा इलेक्ट्रॉन पलीकडच्या अणूला जाऊन धडकेल. मग पलीकडला इलेक्ट्रॉन हलेल आणि अशा तऱ्हेने जर प्रकाशकणांच्या गोळ्यांची फैर सुरू राहिली तर मग चैतन्याने भरपेट असलेली एकाच तालावर आणि रेषेत चालणारी फौज तयार होईल आणि इतस्तत: भटकंती करीत ऊर्जेचा व्यय (?) करणारे हे अणूतले मूलकण मग प्रभावी शक्ती बनते हे ‘लेझर’ या आधुनिक आयुधात सिद्ध झाले आहे. ‘आयुध’ म्हटले, कारण कणांची किंवा ऊर्जेची रांग आता इकडे-तिकडे दाणे खात उडणाऱ्या पक्ष्यांच्या थव्यांसारखी नसते, तर टोळधाडीसारखी असते. झू झू करणारे हे टोळ जसे शेत फस्त करतात, तसेच हे लेझर किरण रणगाडय़ांची शकले उडवतात किंवा वस्त्या उद्ध्वस्त करू शकतात, हिऱ्यांना पैलू पाडतात. मोतीबिंदू काढण्यासाठी असले किरण बुबुळावर हळूच छेद देण्यासाठी आणि शिवाय मोतीबिंदू फोडून त्याला काढण्यासाठी वापरता येतात. शेवटी ज्ञानेश्वर म्हणतात तसे मउपणे बुबुळे। शिपकारले तर नाडले। एरवी पाषाणाला फोडे। पाणी जसे।
शेवटी माणूस कसा वापर करतो यावरच सगळे ठरते. बुबुळाला सुखावणारे पाणी पाषाणाला फोडू शकते.
रविन मायदेव थत्ते – rlthatte@gmail.com
वॉर अँड पीस – व्यसने कोणी करावी? कोणी करू नये! झ्र् ५
मग ही व्यसने कोणी करावी? निपाणी भागातील शेतकरी बंधूंची तंबाखू कशी खपावी? जगाच्या सुरुवातीपासून मद्य पिणाऱ्यांकरिता मद्य पुरवणारी, मद्य संस्कृतीत बुडालेली उत्पादक मंडळी आहेत. त्यांनी कुठे जावे? त्यांच्या उत्पादकांना गिऱ्हाइके कोण? गिऱ्हाइके खूप आहेत. बडेबडे पैसेवाले, ज्यांच्याकडे फेकायला पैसे आहेत असे भांडवलदार, बिल्डर, कॉन्ट्रॅक्टर, दलाल, पैसा खाऊन ज्यांनी आपले उखळ, बक्कळ पैशाने भरले आहे त्यांनी व्यसन जरूर करावे. त्यांना सर्व तऱ्हेचे कॅन्सर वा अन्य रोग होऊ द्यावे. एकदा एक ज्येष्ठ सनदी नोकर मला म्हणाले की, माझी नोकरीतील मिळकत मी व्यसनाकरिता वापरत नाही. आम्ही मिळवलेला दोन नंबरचा पैसा, सांघिक तऱ्हेच्या सेक्शनच्या पाटर्य़ाकरिता दरमहा, तिमाही वा नवीन वर्षांच्या स्वागताकरिता वा जुगार खेळण्याकरिता वापरतो. मला प्रामाणिकपणे असे वाटते की, अशा बडय़ाबडय़ा धेंडांनी, लफडेबाजांनी व्यसने करावी. त्यांना रोग असे व्हावे की, ते फास्टेस्ट सव्र्हिसने वर जावेत. वरच्या माणसाकडे ‘लॉजिंग बोर्डिग फ्री’ आहे. तो सर्वानाच बोलावतो. या बडय़ा मंडळींनी दारू व तंबाखूचे सेवन अजिबात सोडू नये. त्यामुळे त्यांनी मिळविलेल्या वैध वा अवैध मार्गाच्या संपत्तीचे वाटप होईल. समाजातील आर्थिक विषमतेचा प्रश्न सुटेल. अधिक म्या पामराने काय सांगावे? ‘एकच प्याला’ नाटक लिहिणारे महान मराठी साहित्यिक राम गणेश गडकरी, महात्मा गांधी, संत विनोबा, संत गाडगेमहाराज यांना प्रणाम!
विमानदलात असताना एका बंगाली मित्रासोबत चारजण गप्पा मारत होतो. तेवढय़ात पोस्टमन खास तपकिरीचे पार्सल घेऊन आला. बाँगला महाशयांनी पार्सल घेतले. जवळच ओपन गटार होते. मी क्षणभरही विचार न करता ते पार्सल गटारात टाकले. ‘बाँगला मोशाय’ क्षणभरच हादरला! बघत राहिला; ‘व्यसन कायमचे सुटले; कँटीनमध्ये जाऊन सेलिब्रेशन करू या. बैदजी धन्यवाद!’
– वैद्य प. य. वैद्य खडीवाले
आजचे महाराष्ट्रसारस्वत – ६ ऑगस्ट
१९०१ > कृष्णशास्त्री राजवाडे यांचे निधन. मालतीमाधव, मुद्राराक्षस, विक्रमोर्वशीय, शाकुंतल, महावीर-चरित ही संस्कृत नाटके त्यांनी सोप्या मराठीत आणली. ‘अलंकार विवेक’, ‘ऋतुवर्णन’ व ‘उत्सवप्रकाश’ हे ग्रंथही अभ्यासान्ती तयार केले.
१९०९ > बाळकृष्ण मरतड दाभाडे यांचा जन्म. ‘भारतीय चित्रकला’ या प्रबंधात्मक ग्रंथातून त्यांनी चित्र-शिल्प कलेच्या भारतीय परंपरांचा आढावा घेतला, तर ‘कलातरंग’, ‘कलाविमर्श’ ही कलासमीक्षात्मक पुस्तके लिहिली. ‘झंकारांचे पडसाद- विद्यामंदिरात’ व ‘भारतीय आदर्श’ ही पुस्तके शैक्षणिक हेतूने लिहिली, तर ‘कलासाधना’, ‘अक्षरशोध’मधून लेणी, देवळे आदींतील कलेचा शोध त्यांनी घेतला. काव्यसंग्रह, गद्यकाव्ये, नाटिका आदी लिहूनही कलासमीक्षक व निबंधकार म्हणून ते अधिक प्रसिद्ध ठरले होते.
१९२० > आलाप, नाद, सात स्वरश्री, कलात्म गोमंतक या संगीतविषक पुस्तकांचे लेखक गोपालकृष्ण भोबे यांचा जन्म.
१९२५ > सुमारे ५० कादंबऱ्या, ३९ कथासंग्रह, तीन कवितासंग्रह, दोन नाटके आणि दोन चरित्र-कादंबऱ्या लिहिणाऱ्या योगिनी जोगळेकर यांचा जन्म. नोव्हेंबर २००५ मध्ये त्यांचे निधन झाले.
– संजय वझरेकर