– डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सिग्मंड आणि त्यांची कन्या अ‍ॅना फ्रॉइड यांनी सांगितलेल्या मनाच्या बचाव यंत्रणांमधील ‘डिस्प्लेसमेन्ट’ आणि ‘डीनायल’ या दोन यंत्रणा आजदेखील मोठय़ा प्रमाणात पाहायला मिळतात. ‘डिस्प्लेसमेन्ट’ म्हणजे ‘वडय़ाचे तेल वांग्यावर काढणे’! मराठीत फ्रॉइडसारखा कुणी मानसशास्त्रज्ञ झाला नसला, तरी मराठीतील म्हणी बचाव यंत्रणा समर्पक शब्दांत व्यक्त करतात!  मानसशास्त्रीय सिद्धांताच्या रूपात मांडले गेले नसले, तरी सामान्य माणसाचे निरीक्षण किती अचूक होते, याचे ते उत्तम उदाहरण आहे.

नोकरी करणाऱ्या माणसाला त्याच्या साहेबाचा राग आला तरी तो त्याच्या समोर व्यक्त करू शकत नाही. मग तो साठलेला राग घरी बायकोवर किंवा मुलांवर काढला जातो. हे ‘डिस्प्लेसमेन्ट’चे उदाहरण आहे. भावनांची सजगता वाढली, की हा दुसऱ्यावर अन्याय करणारा प्रकार कमी होतो. सध्या समाजमाध्यमांवर होणारे ट्रोलिंग, मुद्दाम दुसऱ्याला दुखावणाऱ्या प्रतिक्रिया देणे हेही याचमुळे असू शकते. प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या व्यक्तीचा राग येत असेल, पण तेथे तो व्यक्त करता येत नसेल तर तो ‘ऑनलाइन’ काढला जातो. त्यामुळे एखादा माणूस आपल्याशी रागावून बोलत असेल, तर तो आपल्यावरच रागावला असेल असे नाही. घरी बायकोशी झालेल्या भांडणाचा राग तो आपल्यावर काढत असू शकतो, याचे भान ठेवून आपण शांत राहायला हवे. मनात अस्वस्थता आली तरी लक्ष शरीरावर नेऊन जाणवत असलेल्या संवेदना स्वीकारल्या की त्या अस्वस्थतेचा दुष्परिणाम कमी होईल आणि आपण ती अस्वस्थता तिसऱ्या माणसावर काढणार नाही.

‘डीनायल’ म्हणजे अस्वीकार; ही आणखी एक धोकादायक बचाव यंत्रणा आहे. ‘नाचता येईना अंगण वाकडे’- म्हणजे स्वतच्या कमतरता मान्य न करता दुसऱ्यांना, परिस्थितीला दोष देणे हे याचे एक रूप आणि तथाकथित सकारात्मक विचार करण्याच्या शिकवणीमुळे वास्तव धोका नाकारणे हे दुसरे रूप असते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने हृदयविकाराच्या धक्क्यामुळे येणाऱ्या मृत्यूचे महत्त्वाचे कारण म्हणजे ही प्रवृत्ती असे नमूद केले आहे. छातीत दुखत किंवा जळजळत असेल, तर योग्य तपासणी करून न घेता हे गॅसेसने होते आहे, असे गृहीत धरण्याची प्रवृत्ती आपल्या देशातही आहे. वस्तुस्थितीचा स्वीकार न करण्याची ही बचाव यंत्रणा अनेक वेळा धोक्याची ठरू शकते.