डॉ. यश वेलणकर yashwel@gmail.com

‘सुप्त मन’ या संकल्पनेप्रमाणेच सिग्मंड फ्रॉइड यांनी मांडलेली ‘डिफेन्स मेकॅनिझम’ अर्थात मनाची बचाव यंत्रणा ही कल्पना अजूनही महत्त्वाची मानली जाते. ‘जर्नल ऑफ पर्सनॅलिटी’ या नामांकित संशोधनपत्रिकेने १९९८ मध्ये या विषयावर खास अंक प्रसिद्ध केला होता. सुप्त मनातील भावना प्रकट झाल्याने येणारी अस्वस्थता कमी करण्यासाठी मन बचाव यंत्रणा वापरते. त्यामुळे अस्वस्थता कमी झाली असे वाटले तरी दांभिकता वाढते आणि सुप्त मनात तणाव कायम राहिल्याने शारीरिक आजार होऊ लागतात. फ्रॉइड यांची कन्या अ‍ॅना फ्रॉइड यांनी या संकल्पनेचा अधिक अभ्यास केला होता.

‘रॅशनलायझेशन’ म्हणजे आपल्या वागण्याला बौद्धिक कारणे देणे. उदाहरणार्थ, मी कंजूष असल्याने कोणाला दान देत नाही; पण ‘मी कंजूष आहे’ हे नाकारतो आणि चुकीच्या ठिकाणी दान देणे कसे योग्य नाही, दान घेणारे सत्पात्री नाहीत, असे माझ्या वागण्याचे बौद्धिक समर्थन करतो. कोल्ह्य़ाला न मिळणारी द्राक्षे आंबट वाटणे, हेदेखील याचेच उदाहरण आहे!

‘रिप्रेशन’ म्हणजे भावनांचे दमन. हे सध्या समाजात मोठय़ा प्रमाणात आहे. माणसे आपण यशस्वी आणि सुखी असल्याचा बुरखा घालून खोटे खोटे हास्य चेहऱ्यावर ठेवत मनात निसर्गत: येणारी उदासी नाकारत असतात. तणावजन्य शारीरिक आजार वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. उदास वाटणे हे जणू काही अपयश किंवा गुन्हा आहे, असा अनेकांचा समज झाला आहे. मनात सतत आनंद आणि उत्साह असला पाहिजे, असे वाटणे म्हणजे समुद्राला सतत भरतीच असली पाहिजे असा अनैसर्गिक आग्रह धरण्यासारखे आहे.

मेंदूतील ‘सेरोटोनिन’ नावाचे रसायन कमी झाले की उदासी येते. हे रसायन प्रकाश असेल त्या वेळी तयार होते. त्यामुळे पूर्वी कृत्रिम प्रकाश नव्हता तेव्हा कातरवेळी संध्याकाळी उदासी येते हे मान्य केले जात होते.

मनातील विचार आणि भावना साक्षीभाव ठेवून पाहू लागलो, की भावना निसर्गत: कशा बदलतात, याचा अनुभव येऊ लागतो. रोजच्या आयुष्यात मनात अस्वस्थता येणे स्वाभाविक आहे. ती मान्य करून त्या वेळी शरीरावर लक्ष नेण्याचा सराव करू लागलो की आत्मभान वाढते आणि बचाव यंत्रणा अनावश्यक होतात.