लोखंडाच्या धातुकापासून लोखंड तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या झोतभट्टीत लोखंडाच्या धातुकाबरोबर चुनखडकाचे तुकडे आणि कोक एकत्र करून तापवतात. त्यासाठी लागणारा कोक दगडी कोळशावर किंवा खनिज तेलावर विशिष्ट प्रक्रिया करून तयार करतात. त्या प्रक्रियेला भंजक ऊर्ध्वपातन (डिस्ट्रिक्टिव डिस्टिलेशन) असे म्हणतात. त्यासाठी जेथे हवा अथवा ऑक्सिजन नाही अशा बंदिस्त भट्टीत दगडी कोळसा तापवतात. त्यामुळे कोळशातील बाष्पनशील (व्होलाटाइल) रसायने वेगळी होतात. खाली जो काळसर करडय़ा रंगाचा, सच्छिद्र पदार्थ राहतो, त्यालाच कोक म्हणतात. दगडी कोळशापेक्षा कोकची उष्णतादेय शक्ती (कॅलॉरिफिक व्हॅल्यू) अधिक असते. कार्बनचे प्रमाणही जास्त असते.
सर्वच दगडी कोळशापासून कोक तयार होईलच असे नाही. त्यावरून कोळशाचे दोन प्रकार मानले जातात. ज्याच्यापासून कोक तयार होतो तो कोकयुक्त कोळसा आणि कोक तयार होत नाही तो कोकरहित कोळसा.
पण अपवादात्मक परिस्थितीत दगडी कोळशांच्या प्रस्तरात नैसर्गिकरीत्या कोक निर्माण झालेला दिसतो. जसा तो अन्य देशांमध्ये सापडतो, तसाच भारतातही सापडतो. अर्थातच जर कोक निर्माण व्हायचा असेल तर दोन गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली म्हणजे ऑक्सिजनचा अभाव आणि दुसरी म्हणजे आवश्यक तेवढी उष्णता.
गाळांचे प्रस्तर निर्माण झाले की त्यांच्यापासून अवसादी खडक निर्माण होतात. बऱ्याच वेळा त्यांच्यावर नव्या खडकांचे प्रस्तर निर्माण होतात. त्यांच्या वजनाने आधी निर्माण झालेले प्रस्तर खोलवर दबले जातात. आता तेथे ऑक्सिजनचाच काय पण हवेचाही संपर्क नसतो.
त्यानंतर काही काळाने त्या खडकांमध्ये अग्निजन्य खडकांची अंतर्वेशने (इग्निअस इंट्रूजन) होतात. खोलवरून अतितप्त शिलारस येतो आणि खडकांमध्ये घुसतो. जसा तो इतर अवसादी खडकात घुसतो, तसाच तो दगडी कोळशाच्या प्रस्तरांमध्येही घुसतो. थंड झाला की त्याच्यापासून एखादा अग्निजन्य खडक तयार होतो. परंतु शिलारसाचे अंतर्वेशन होताना ज्या खडकांमध्ये तो घुसतो, त्या खडकांचे तापमान काही काळासाठी वाढते.
जर असे अंतर्वेशन दगडी कोळशाच्या प्रस्तरात झाले, तर कोळशाच्या जेवढय़ा भागाला अशी उष्णता मिळते तेवढय़ा भागाचे रूपांतर कोकमध्ये होते. यालाच नैसर्गिक कोक म्हणतात. भारतात असा नैसर्गिक कोक झारखंडमधील गिरिदिह कोळसाक्षेत्रात मिळतो. अन्यत्र क्वचितच मिळतो.
– डॉ. विद्याधर बोरकर
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org