अनघा शिराळकर
भूकंपाचे दुष्परिणाम किती विध्वंसक आहेत, हे भूकंपाच्या तीव्रतेवरून (इंटेंसिटी) आणि महत्तेवरून (मॅग्निट्यूड) ठरते. रिश्टर श्रेणीनुसार ३.० किंवा त्यापेक्षा कमी तीव्रतेचे भूकंप कमी धोकादायक असतात. सात किंवा त्यापेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपांमुळे प्रचंड हानी होते. भूकंपाच्या केंद्रबिंदूजवळच्या भागात नुकसान जास्त होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जास्त क्षमतेच्या भूकंपांमुळे लहान- मोठ्या इमारती पूर्णपणे जमीनदोस्त होतात. सिमेंट, लोखंड, लाकूड आणि इमारतींमधल्या सामानांचे ढिगारे इतस्तत: पडल्याने अपरिमित जीवितहानी आणि वित्तहानी होते. विजेच्या तारा तुटून धक्के बसू शकतात. तीव्र क्षमतेच्या भूकंपांमुळे रस्त्यांना तडे जातात, रस्त्याखालील गॅस, पाणी इत्यादी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांचे आणि विजेच्या भूमिगत तारांचे प्रचंड नुकसान होते आणि परिस्थिती अधिकच गंभीर होते.

तीव्र भूकंपांमुळे भूस्खलन होऊ शकते आणि दरड कोसळून निखळलेले खडक अतिवेगाने उंचावरून घरंगळत खाली येतात. यामध्ये निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानी होते. कित्येक सजीव मृत्युमुखी पडतात. अतितीव्र भूकंपामुळे धरणांच्या भिंतींना तडे जाऊन धरणे असुरक्षित होऊ शकतात. जिथे माती पाण्याने संपृक्त झाली आहे अशा ठिकाणी भूकंपाच्या हादऱ्यांमुळे माती सैलसर होऊन जमिनीचा भक्कमपणा लोप पावतो. जमिनीत पुरलेले खांब, इमारतींचा पाया यांचा आधार कमकुवत होतो. खांब कोसळतात तर इमारतींची पडझड होते. भूमिगत गॅस आणि पाणी यांच्या वाहिन्यांना धोका निर्माण होतो.

पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानचा पख्तूनख्वा प्रांत (पूर्वीचा वायव्य सरहद्द प्रांत) इथे ८ ऑक्टोबर २००५ रोजी रिश्टर श्रेणीनुसार ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्याची झळ भारताच्या आणि अफगाणिस्तानच्या काही भागांनाही पोहोचली होती.

चीनमधल्या सिचुऑन प्रांतातल्या पर्वतमय प्रदेशात १२ मे २००८ रोजी रिश्टर श्रेणीनुसार ८.० तीव्रतेचा भूकंप झाला होता. या भूकंपामुळे बैचुआन आणि वेनचुऑन ही दोन्ही गावे संपूर्णपणे जमीनदोस्त झाली होती.

हिस्पॅनिओला हे बेट कॅरीबिअन बेटांपैकी एक आहे. हैती आणि डोमिनिकन गणतंत्र असे दोन देश मिळून हे बेट बनते. १२ जानेवारी २०१० रोजी झालेल्या ७ रिश्टर श्रेणीनुसार ७.० तीव्रतेच्या भूकंपाने या बेटावरील हे दोन्ही देश उद्ध्वस्त झाले होते.

तुर्किये आणि सीरिया यांच्या सीमारेषेवर ६ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या रिश्टर श्रेणीनुसार ७.८ तीव्रतेच्या भूकंपाने मध्य आणि दक्षिण तुर्किये, तसेच पश्चिम सीरिया इथे आणि १ जानेवारी २०२४ रोजी जपानच्या पश्चिम किनारपट्टीवरील होन्शु बेटावर रिश्टर श्रेणीनुसार ७.५ तीव्रतेचा भूकंप होऊन मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली होती.

अनघा शिराळकर

मराठी विज्ञान परिषद

ईमेल : office@mavipa.org

संकेतस्थळ : http://www.mavipa.org