निसर्गविज्ञान ते विज्ञान मानवाला अन्न, पाणी मिळण्याची खात्री झाल्यानंतर मोकळा वेळ मिळाला. त्या वेळेत त्याने निसर्गाचे निरीक्षण करायला सुरुवात केली. विविध गोष्टी, प्रक्रियांमागचा कार्यकारणभाव तो शोधू लागला. अगदी प्राथमिक निरीक्षणापासून सुरुवात झाली. गोल दगड डोंगरावरून घरंगळत जाताना शेवटपर्यंत जातो. गोल नसणारा दगड एवढा दूर जात नाही. हे पाहून त्याने चाकांची निर्मिती केली. पुढे कुत्रे, गाढव, घोडे वाहून नेतील अशा लहान-मोठय़ा गाडय़ांची निर्मिती केली. मानवासाठी अन्नाची गरज भागवणारी शेती हे महत्त्वाचे क्षेत्र होते. शेतीची मशागत, पेरणी, खुरपणी, पुढे कोळपणी अशी तंत्रे विकसित झाली. त्या काळात लेखन संसाधने विकसित झाली नसल्याने, या शोधांचे जनक आपणास ज्ञात नाहीत.
पुढे कुटुंबव्यवस्था विकसित होताना, लज्जारक्षण आवश्यक झाले. त्यातून अंग झाकण्यासाठी सुरुवातीस वल्कले, झाडांच्या मोठय़ा पानांचा वापर सुरू झाला. हा वापर कापसाची वस्त्रे, रेशमी वस्त्रे आणि कृत्रिम धाग्यांच्या वस्त्रांपर्यंत येऊन पोहोचला. मानवाने आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मार्ग शोधायला सुरुवात केली. तो पूर्वी अनवाणी चालत असे. अनवाणी चालताना काटे पायात रुतू लागल्यानंतर त्याने प्रथम लाकडापासून खडावा तयार केल्या. त्या वापरणे सोयीचे नव्हते. जनावरांची कातडी काटय़ांपासून बचाव करते, हे लक्षात आल्यानंतर कातडीपासून चप्पल तयार केली. जंगलातील वणव्यात होरपळलेल्या जनावरांचे मांस खाताना शिजवलेल्या, भाजलेल्या अन्नाचे पचन सहज होते. खाणे सुखाचे होते, हे लक्षात घेऊन त्याने अग्नीचा वापर सुरू केला.
शेतीसाठी वापरायची अवजारे वाहून नेणे कष्टाचे आहे, हे लक्षात आल्यानंतर त्याने बैल, रेडा वाहून नेईल अशा गाडय़ांचा वापर सुरू केला. या सर्व उपकरणांचा, अवजारांचा शोध मानवाचे जीवन सुखकर व्हावे, या गरजेतून लागला. तोपर्यंत लेखनकला विकसित झाली. यातून मानवाने निसर्गातील विविध घटनांचा शोधलेला कार्यकारणभाव व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्यातून शास्त्राची सुरुवात झाली. जो कार्यकारणभाव पूर्वजांनी शोधला आहे, तो पुन्हा शोधण्यापेक्षा समजून घेण्याची गरज निर्माण झाली. त्यातून शिक्षण सुरू झाले. यातील निसर्गाचा अभ्यास करणारा विषय म्हणजे निसर्गविज्ञान. यामध्ये निसर्गातील सर्वच घटकांचा अभ्यास केला जात असे. पुढे निसर्गविज्ञानाचा पसारा एवढा वाढत गेला की त्यातून वनस्पती, प्राणी, निर्जीव घटक यांच्या अभ्यासाच्या शाखा निर्माण करण्याची गरज निर्माण झाली. यातूनच जीव, रसायन, भौतिकशास्त्र या विज्ञानशाखा विकसित झाल्या.
– डॉ. व्ही. एन. शिंदे
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : www.mavipa.org