‘साखरेचे खाणार त्याला देव देणार’ अशी एक म्हण आहे; पण याच म्हणीत आता बदल करून ‘साखरेचे खाणार त्याला मधुमेह होणार’ अशी करायला पाहिजे.
भारताला आता ‘मधुमेहाची जागतिक राजधानी’ म्हटले जातेय. २०३० सालापर्यंत भारतातील मधुमेही व्यक्तींची संख्या ८ कोटींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज जागतिक आरोग्य संघटना करते. हाच अंदाज चीनसाठी ४ कोटी आणि अवाढव्य अमेरिकेसाठी केवळ ३ कोटी इतका आहे. याचाच अर्थ मधुमेहाचा धोका सर्वात जास्त प्रमाणात भारतीय वंशाच्या लोकांना आहे. आहार, आनुवंशिकता, लठ्ठपणा, अति ताणतणाव अशासारखी अनेक कारणे भारतातल्या मधुमेहाला खतपाणी घालत आहेत. २०१६ मध्ये ६.९ कोटी भारतीय मधुमेही झाले आहेत. गेल्या १५ वर्षांत मधुमेही रुग्णांत १०० टक्के वाढ झाली आहे.
यावर सावधगिरी म्हणजे ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन चाचणी. या चाचणीमुळे उद्या येणाऱ्या मधुमेहाबाबत आधीच कळेल. ‘National Glycohemoglobin Standardization Program (NGSP)’ या नावाने १९९६ मध्ये एक संशोधनपर उपक्रम चालू झाला. या NGSP ने ग्लायसायलेटेड हिमोग्लोबिनचे परिमाण टक्केवारीच्या स्वरूपात द्यायला सुरुवात केली. हेच परिमाण IFCC (International Federation of Clinical Chemistry) या संस्थेने mmol/mol या परिमाणात देणे पसंत केले.
खालील तक्त्यात निरोगी व्यक्तीच्या आणि मधुमेही व्यक्तीच्या HbA1c ची पातळी दाखवली आहे. आपल्याला आज ना उद्या मधुमेह होऊ शकतो असे वाटत असेल, तर त्यावरही HbA1c चाचणी प्रकाश टाकते.
The Diabetes Control and Complications Trial (DCCT) या संस्थेने १९८३ ते १९९३ या दशकात जागतिक पातळीवर मधुमेहावर संशोधन केले आहे. यांच्याकडे HbA1c च्या चाचण्यांची सविस्तर माहिती आहे. त्यांच्या मते जर HbA1c ची पातळी नियंत्रणात ठेवली तर डोळे, वृक्क आणि चेता या साऱ्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते. अन्यथा मधुमेहींसाठी या तिन्हीची सुस्थिती कधीही डळमळीत होते.
– डॉ. नंदिनी नेरुरकर- देशमुख
मराठी विज्ञान परिषद,
वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२
office@mavipamumbai.org
आशापूर्णा देवी यांच्या कादंबऱ्यांतील स्त्री
आपण गृहत्याग का केला, करावा लागला, हे सुवर्णलताला कळावं म्हणून सत्यवतीने सुवर्णलतेसाठी पत्र लिहून ठेवलं होतं. ती म्हणते- सुवर्णा, तुला सोडून आले तेव्हा केवळ तुझ्या आठवणीत, तुझ्या एकटीसाठी मी कधीच रडले नाही. आपल्या देशातल्या अशा शेकडो सुवर्ण आहेत की, ज्यांना बुद्धी असूनही शिकता आलं नाही. कळू लागण्यापूर्वीच त्यांच्यावर संसाराचं ओझं लादलं गेलं. त्यांच्यासाठी मी रडते.. सुवर्णा, जीवनात हार मानणारी तू नाहीस. तेव्हा तू मला ओळखशील, जाणून घेशील.. स्त्रीची उन्नती फक्त स्त्रीनं मनावर घेतलं तर ती स्वत:च करू शकते. त्याला हवा स्त्री-शिक्षणाचा प्रसार. शिक्षणामुळेच कुसंस्कार आणि रूढींचा पगडा दूर होईल अन् स्त्री स्वतंत्र विचार करू शकेल, पण त्यासाठी धैर्य हवे. दीर्घ प्रतीक्षा केल्यावरच ते येईल. संसारात राहून स्वत:चा सर्वागीण विकास, उत्कर्ष साधता आला तर जीवन परिपूर्ण होईल, पण किती जणींना हे साधेल?. आईइतकी अगतिक व्यक्ती या जगात कोणी नसेल. याचाच फायदा आजवरच्या पुरुषप्रधान समाजानं घेतला आहे. एक दिवस हा भ्रमनिरास होईल. स्त्रीचं परावलंबी जिणं संपेल अशी आशा आहे.. तुला सोडून आले तेव्हा केवळ तुझ्या आठवणीत, तुझ्या एकटीसाठी मी कधीच रडले नाही.’ हे पत्रातील विचार वाचून सुवर्णा शांत झाली. तिनं मनाशी ठरवलं, आपलीही स्मृतिकथा लिहायची. आता या वयात तरी संसारातून मन काढून एक वेगळाच विरंगुळा निर्माण करायचा, लिहायचं. संसारातील जणू ओअॅसिसच. ..इथून सुवर्णाने मग स्मृतिकथा लिहायला सुरुवात केली.
आशापूर्णादेवी यांच्या ‘प्रथम प्रतिश्रुती’ची नायिका सत्यवती. तिचं चित्रण हा तिच्या पिढीचा स्त्री-जन्माचा इतिहास. तिच्या सुख-दु:खाचा, तिच्या व्यथा-वेदनांचा, पुरुषशासित समाजात तिच्यावर होणाऱ्या अन्यायांचा, त्याचबरोबर सत्यवतीच्या मनात या सगळ्या अन्यायाविरुद्ध सत्याची जी ठिणगी, संताप पेटतो, स्वत्व राखण्यासाठी, बंधमुक्त होण्यासाठी जो संघर्ष होतो. त्या संघर्षांचा इतिहास आहे. सत्यवती बंडखोर बनून एकटीच पुढे निघाली. तिच्यामागोमाग सुवर्णलता आली. मागचंच काम तिने पुढं हाती घेतलं आणि हा मार्ग असा बनविला की त्या मार्गावर आता तिच्या मुली बकुल, पारूल पुढे निघाल्या आहेत. त्यांना या पाऊलवाटेचा मोठा हमरस्ता बनवायचा आहे. या कादंबरीत्रयीसह त्यांच्या ‘मित्तिरबाडी’, ‘सागर सुकायजाय’ ‘कल्याणी’, ‘निर्जन पृथिवी’, ‘उन्मोचन’, ‘छायासूर्य’, ‘दोलना’, ‘नवजन्म’ आदी कादंबऱ्याही प्रसिद्ध आहेत. ‘चैताली’, ‘छोटीसी मुलाकात’ ‘मेहेरबान’, ‘तपस्या’ इ. हिन्दी चित्रपट त्यांच्या कथानकांआधारे निघाले.
– मंगला गोखले
mangalagokhale22@gmail.com