डिझेल इंजिनाच्या शोधापूर्वी औद्योगिक क्षेत्रात वाफेची आणि पेट्रोलवर चालणारी इंजिने वापरात होती. वाफेच्या इंजिनात, पाण्याचे वाफेत आणि वाफेचे पाण्यात रूपांतर करून सििलडरमधील दाब कमी-जास्त केला जातो व त्याद्वारे त्यातील दट्टय़ा पुढे-मागे ढकलून तरफेद्वारे चाके फिरवली जातात. पेट्रोलवर चालणाऱ्या इंजिनात एका सििलडरमध्ये हवा आणि पेट्रोलचे मिश्रण सोडले जाते. आगीच्या ठिणगीद्वारे हे मिश्रण प्रज्वलित करून, निर्माण होणाऱ्या वायूंद्वारे दट्टय़ा ढकलला जाऊन चाके फिरवली जातात. यातील वाफेच्या इंजिनाची कार्यक्षमता फक्त सुमारे सहा टक्के आणि पेट्रोलवर चालणाऱ्या इंजिनाची कार्यक्षमता सुमारे १२ टक्के इतकीच होती. त्यामुळे या इजिनांना बरेच इंधन लागत असे.
रुडॉल्फ डिझेल या जर्मन अभियंत्याने उच्च कार्यक्षमता असणाऱ्या एका वेगळ्या इंजिनाची निर्मिती करण्याचे ठरवले. हे इंजिन पेट्रोलवर चालणाऱ्या इंजिनापेक्षा वेगळे होते. वायू दाबला की त्याचे तापमान वाढते. इंजिनाच्या सििलडरमधील इंधन व हवेच्या मिश्रणावरील दाब एवढा वाढवायचा की, या वायूचे वाढलेले तापमान या इंधनाचे ज्वलन घडवून आणेल. या इंजिनात इंधन मोठय़ा प्रमाणात दाबले जात असल्याने, ज्वलनाद्वारे निर्माण झालेले वायू दट्टय़ाला खूपच जोरात मागे ढकलणार होते व त्यामुळे या इंजिनाची कार्यक्षमता अधिक असणार होती.
डिझेलने १८९३ साली असे पहिले इंजिन तयार केले. मात्र हे इंजिन चाललेच नाही. त्यानंतर १८९४ साली नव्या आराखडय़ानुसार तयार केलेले इंजिन मिनिटभर चालून बंद पडले. या इंजिनातील दोषांवर दोन वर्षे संशोधन करून, त्याने १८९७ साली तयार केलेले इंजिन मात्र व्यवस्थित आणि तेही सुमारे २६ टक्के कार्यक्षमतेने चालले. डिझेलने आपल्या इंजिनासाठी कोळशाची भुकटी, केरोसिन, पेट्रोल, शेंगदाण्याचे तेल, अशी विविध इंधने वापरून पाहिली. अखेर या इंजिनासाठी उपयुक्त ठरला तो खनिज तेलातील, ‘निरुपयोगी’ ठरलेला एक घटक. पेट्रोलच्या तुलनेत कमी ज्वलनशील असणारा हा घटक आता ‘डिझेल’ म्हणूनच ओळखला जातो. अधिक कार्यक्षमता असल्याने ही डिझेल इंजिने टप्प्याटप्प्याने कारखाने, खाणी, इत्यादी ठिकाणच्या अवजड कामांसाठी, तसेच जड वाहतुकीची वाहने, जहाजे यासाठी वापरली जाऊ लागली. इ.स. १९०४ मध्ये तर डिझेल इंजिन वापरून फ्रेंच लोकांनी जगातील पहिली पाणबुडी बनविली!
शशिकांत धारणे
मराठी विज्ञान परिषद,वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org