अतुल कहाते
अनेक वेळा संगणक या उपकरणाचा उल्लेख लोक ‘बिनडोक’ अशा शेलक्या शब्दाने करतात. याचे कारण म्हणजे संगणक हे खरोखरच अत्यंत निर्बुद्ध आणि आपण सांगू त्या सूचना बिनबोभाटपणे अमलात आणणारे यंत्र असते. त्याला आपणहून काय केले पाहिजे याची अजिबात जाण नसते. म्हणूनच माणसाने जर संगणकाला सूचना देताना चुका केल्या तर संगणकाला आपण काही तरी चुकीचे करत आहोत याची कल्पनासुद्धा येत नाही आणि तो त्याला नेमून दिलेले चुकीचे काम इमानेइतबारे करतो. २०२४ सालच्या जुलै महिन्यात मायक्रोसॉफ्ट विंडोज कंपनीच्या वतीने काम करत असलेल्या क्राऊडस्ट्राइक कंपनीने केलेली चूक अशाच प्रकारची होती. संगणक अभियंत्याने संगणकाला दिलेल्या सूचनेमध्ये त्रुटी असल्याचे संगणकाला समजण्याचा प्रश्नच नव्हता आणि याचा परिणाम जगभरात कोट्यवधी लोकांना भोगावा लागला.
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाचे वैशिष्ट्य आणि संगणकापेक्षा असलेले वेगळेपण म्हणजे माणसाने दिलेल्या सूचनांचे ते इमानेइतबारे पालन तर करतेच; शिवाय ते स्वत: शिकू शकते. अर्थातच अशा प्रकारे शिकण्यासाठी त्याला माणसाने ‘कसे शिकायचे’ हे आधी सांगणे भाग असते. तसेच या तंत्रज्ञानाला शिकता यावे यासाठी माणसाने त्याला खूप मोठ्या प्रमाणावर शिकण्यासाठीची माहिती पुरवणे अत्यावश्यक असते. उदाहरणार्थ, जसे एखाद्या लहान मुलाला आपण प्राण्यांची अनेक चित्रे दाखवून त्यांच्याविषयीची माहिती सांगितली तर काही काळानंतर ते मूल समोरचे चित्र किंवा प्रत्यक्षातला प्राणी बघून तो प्राणी कोणता हे सांगू लागते. याच धर्तीवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये आपण संगणकाला जर ‘शिकवले’ तर हळूहळू त्याच्यातही ही शिकण्याची आणि त्यानंतर या शिक्षणावर आधारित असलेल्या ओळखण्यासारख्या पुढच्या गोष्टी करण्याची क्षमता विकसित होते. यालाच ‘मशीन लर्निंग’ असे म्हणतात. त्यात आणखी सुधारणा करून संगणकाला निर्बुद्धतेकडून अत्यंत चलाख बनवण्याच्या क्षमता विकसित केल्या जातात.
हेही वाचा :कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भावना
मानवी मेंदू आणि शरीर ठरावीक काळानंतर थकते आणि त्याला विश्रांतीची, विरंगुळ्याची गरज भासते. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेल्या संगणकांना मात्र ‘थकवा’ ही गोष्टच माहीत नसते. त्यामुळे आणि शिवाय अद्यायावत तंत्रज्ञानामुळे एका वेळी कोट्यवधी क्लिष्ट कामे करणे, समीकरणे सोडवणे अशा गोष्टी त्यांना लीलया जमतात. त्यामुळे एके काळचे हे ‘बिनडोक’ यंत्र आता माणसालाच भारी पडेल की काय, अशा चर्चा रंगताना दिसतात. अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानामध्ये भावना आणि इतर मानवी संवेदना नसल्यामुळे सध्या तरी ही चर्चा तशी फक्त तात्त्विक पातळीपुरती मर्यादित आहे.
मराठी विज्ञान परिषद
ईमेल : office@mavipa.org
संकेतस्थळ : http://www.mavipa.org