भारतात मेंढय़ांच्या विविध ३९ जाती आढळतात. भारतीय मेंढय़ांचे भौगोलिक प्रदेशानुसार चार विभाग केले आहेत. हिमालयीन पर्वतरांगांत (जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड) काश्मिरी, गद्दी, भाकरवाल, रामपूर-भुशियार, गुरेझ, कर्नाह या प्रमुख जाती आढळतात. काश्मिरी व कर्नाह या जाती उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. भारताच्या उत्तर-पश्चिम भागात (हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश) हिस्सार डेल, मारवाडी, मागरा, लोही, नाली, काठेवाडी, सोनाडी, पाटणवाडी, कच्छी, चौकला या मेंढय़ांच्या जाती आढळतात. दक्षिण विभागात (महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू) दख्खनी, नेल्लोर, माडग्याळ, बेल्लारी, मद्रासरेड, मेंचेरी या प्रमुख जाती आढळतात. यांपकी माडग्याळ, नेल्लोर, मेंचेरी व मद्रासरेड या मेंढय़ांच्या जाती मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. भारताच्या पूर्व विभागात (बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा आणि उत्तर पूर्व भारत) छोटा नागपुरी, शहाबादी, गरोल, गंजाम, तिबेटल या जाती आढळतात. दख्खनी, बेल्लारी, मारवाडी, सोनाडी, शहाबादी, छोटा नागपुरी, गंजाम या मेंढय़ांच्या जाती लोकर व मांस या दुहेरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
मेंढय़ांच्या विदेशी जातींमध्ये मेरिनो, रॅमब्युलेट, चेव्हिओट, कॉरिडेल, डॉरसेट, साऊथ-डाऊन, पोलवर्थ, सफॉल्क विशेष प्रसिद्ध आहेत. मेरिनो मेंढीचे उगमस्थान स्पेन असून उच्च प्रतीच्या लोकर उत्पादनासाठी ती जगप्रसिद्ध आहे. संकरीकरणाद्वारे स्थानिक मेंढय़ांचे लोकर उत्पादन व प्रत सुधारण्यासाठी मेरिनो नरांचा विविध देशांत वापर केला जातो. सफॉल्क, डॉरसेट, साऊथ-डाऊन मेंढय़ांचे उगमस्थान इंग्लंड असून त्या मांस उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत.
महाराष्ट्रात मेंढय़ांच्या दख्खनी व माडग्याळ या दोन प्रमुख जाती आढळतात. दख्खनच्या पठारावर आढळत असल्याने दख्खनी मेंढी हे नाव पडले. संगमनेरी, लोणंद, सोलापुरी, कोल्हापुरी या दख्खनी मेंढींच्या चार उपजाती आहेत. दख्खनी मेंढी उष्ण हवामानात, कमी चारा असलेल्या दुष्काळी प्रदेशात पाळण्यास उपयुक्त असून मांस व लोकर उत्पादनासाठी पाळतात. माडग्याळ मेंढय़ा सांगली जिल्ह्य़ातील जत तालुक्यातील कवठेमहांकाळ, रांजणी, माडग्याळ व सिद्धनाथ या भागात जास्त आढळतात. माडग्याळ गावाच्या नावावरूनच या मेंढय़ांना हे नाव पडले.
-डॉ. शरद आव्हाड, नगर , मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
कुतूहल – मेंढय़ांच्या विविध जाती
भारतात मेंढय़ांच्या विविध ३९ जाती आढळतात. भारतीय मेंढय़ांचे भौगोलिक प्रदेशानुसार चार विभाग केले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 28-09-2013 at 12:29 IST
मराठीतील सर्व नवनीत बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Different breeds of sheeps