भानू काळे
आपल्यासाठी आपला देश हा ‘भारत’ असला तरी जगभर त्याचा उल्लेख ‘इंडिया’ असाच केला जातो. हस्तिनापूरचा सम्राट दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र भरत याच्यावरून ‘भारत’ हे नाव पडले असावे असे म्हटले जाते. पण भारतीय राज्यघटनेत ‘इंडिया दॅट इज भारत’ असे दोन्ही शब्द आपल्या देशाचा उल्लेख करताना वापरले गेले आहेत. ‘इंडिया’ शब्दाचा उल्लेख ग्रीक इतिहासकार हिरोडोटस याने इसवीसनपूर्व पाचव्या शतकात प्रथम केला आहे.
तिबेटमधल्या मानसरोवरात उगम पावणाऱ्या इंडस नदीवरून ‘त्या नदीच्या पलीकडे असणारा देश’ या अर्थाने इंडिया शब्द वापरला गेला. अमेरिकेत पोहोचलेल्या कोलंबसचा उद्देश भारतात पोहोचणे हा होता व त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना त्याने ‘इंडियन’ म्हटले. त्यांची अधिक लोकवस्ती असलेल्या अमेरिकेतील प्रांताला ‘इंडियाना’ हे नाव दिले गेले. पुढे परकीय व्यापारासाठी स्थापन झालेल्या युरोपीय कंपन्यांच्या नावातही ‘इंडिया’ हाच शब्द आहे. ईस्ट इंडिया कंपनी हे फक्त इंग्रजांच्या कंपनीचे नाव नव्हते; डच किंवा फ्रेंच लोकांच्या कंपन्यांचे नावही तेच होते! डच ईस्ट इंडिया कंपनी किंवा फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी! फ्रेंच भाषेत इंडिया शब्दाचे ‘इंडिज्’ हे रूप प्रचलित झाले आणि तेही जगभर पोहोचले. वेस्ट इंडिज किंवा इंडोचायना किंवा इंडोनेशिया या लांबलांबच्या प्रदेशांच्या नावांतही ‘इंडिज’चा समावेश झाला. ‘इंडिया दॅट इज भारत’ या आपल्या देशाशी निदान नावापुरतेतरी हे परदेश जोडले गेले!
‘हिंदू’ हा शब्द सिंधू (इंडस) या नदीवरून आला. पर्शियन भाषेत ‘स’चा उच्चार ‘ह’ असा होत असल्याने ‘सिंधू’चे ‘हिंदू’ झाले आणि त्यांची वस्ती असलेला देश म्हणून हिंदूस्तान. अनेक देशांत आजही आपल्या देशाचा उल्लेख ‘हिंदूस्तान’असाच होतो.
‘विलायत’ हा शब्द आपल्याकडे पूर्वीपासून ‘युरोप’ या अर्थी वापरला जाई. ‘त्याने खास विलायती कपडे घातले होते’, किंवा ‘उच्च शिक्षणासाठी त्याने विलायतेला प्रयाण केले’ वगैरे. या शब्दांची व्युत्पत्ती मजेशीर आहे. पूर्वी अफगाणी लोक स्वत:च्या देशाला ‘विलायत’ असे म्हणत.
पुढे ‘मायदेश’ या अर्थाने तो शब्द अरबांच्यामार्फत युरोपात रूढ झाला. स्वत:च्या देशाला युरोपीय राष्ट्रे ‘विलायत’ असे संबोधू लागले. भारतात मात्र फक्त युरोपलाच ‘विलायत’ म्हटले गेले.
bhanukale@gmail.com