एखाद्या वक्राला (कर्व्ह) स्पर्श करणारी रेषा म्हणजे ‘स्पर्शिका’ (टँजंट) ही विकलनशास्त्रात (डिफरन्शिअल कॅलक्युलस) कळीची भूमिका बजावते. मात्र त्याच्या जोडीला ‘अनंतोपगता’ किंवा अपगामी रेषा (अ‍ॅसिमटोट) अशी आणखी एक महत्त्वाची गणिती संकल्पना आहे. तिच्या व्याख्येप्रमाणे जसजसे एखादा वक्र आणि त्याची अपगामी रेषा अनंत लांबीचे होत जातात तेव्हा त्या दोघांमधील अंतर शून्याच्या जवळ जाते. दुसऱ्या अर्थाने अपगामी रेषा ही त्या वक्रासाठी अनंतावरील बिंदूत स्पर्शिका असते; याचा अर्थ ते दोघे अगदी जवळ आले तरी एकमेकांना स्पर्श करत नाहीत. अपगामी रेषा आडवी क्षितिजसमांतर, उभी आणि तिरपी यापैकी एका प्रकारची असू शकते. त्यांची उदाहरणे क्रमश: आकृती १, २ आणि ३ मध्ये दिली आहेत. आकृती ३ मधील वक्रांना उभी आणि तिरपी अशा दोन अपगामी रेषा आहेत. दिलेल्या वक्राचे बीजगणितीय स्वरूप लक्षात घेऊन त्यासाठी अपेक्षित अपगामी रेषेचे समीकरण विविध पद्धतींनी काढता येते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अपगामी विश्लेषण (अ‍ॅसिमटोटिक अ‍ॅनेलिसिस) ही गणिती विश्लेणाची शाखा या संकल्पनेवरूनच निर्माण झालेली आहे. त्यात गणिती फलाचे (फंक्शन) मर्यादीकरण केले जाते. उदाहरणार्थ, ‘न’चे मूल्य खूप मोठे म्हणजे अनंताकडे जाऊ लागले की फ(न) = न३ + २न या फलाच्या मूल्यात न३ च्या तुलनेत २न चे योगदान नगण्य होत जाते. त्या वेळी फ(न) हे अपगामी पद्धतीने न३ च्या सममूल्यात (इक्विव्हॅलंट) आहे असे मानले जाते. त्याला फ(न) प्त न३, जेव्हा न ख्न्, असे दर्शवले जाते. अशा संक्षिप्तीकरणाने प्रश्नाचा आवाका कमी करता येतो.

साधारण (ऑर्डिनरी) आणि आंशिक (पार्शिअल) विकलन समीकरणे (डिफरन्शिअल इक्वेशन्स) उदाहरणार्थ, द्रवगतिशास्त्राच्या (फ्लुइड डायनॅमिक्स) अभ्यासात आढळणारी समीकरणे सोडवण्यात, अपगामी विश्लेषण उपयुक्त ठरते. तसेच काही विशिष्ट संकलकांची (इंटिग्रल्स) आसन्न किंवा निकटतम मूल्ये अपगामी विस्तारावर (एक्सपॅन्शन्स) अवलंबून असतात. संख्याशास्त्रातही त्याचे फार महत्त्व आहे जसे की, नमुना फलाच्या संभाव्यता वितरणाचे सीमित निकटन (लिमिटिंग अ‍ॅप्रोक्सिमेशन) करणे यासाठी. उल्लेखनीय बाब म्हणजे दर्जानियंत्रण (क्वालिटी कंट्रोल) क्षेत्रात ‘सिक्स सिग्मा’ ही संकल्पना तत्त्वत: अपगामी विश्लेषणावरच आधारलेली आहे. यात दोषपूर्ण उत्पादन जवळपास शून्य असणे, म्हणजे प्रत्यक्षात दहा लक्ष वस्तूंमध्ये केवळ ३.४ वस्तू दोषपूर्ण असतील असे उद्दिष्ट गाठणे अपेक्षित असते. त्याशिवाय संख्यात्मक विश्लेषणात (न्यूमरिकल अ‍ॅनेलिसिस) समीकरणांची निकटतम उत्तरे शोधणे, संगणकशास्त्रात अल्गोरिदमची कार्यक्षमता मोजणे, अपघात-विश्लेषणात (अ‍ॅक्सिडंट अ‍ॅनेलिसिस) मोजमापन करणाऱ्या प्रारूपांची उत्तरे काढणे अशा विविध क्षेत्रांतील आकडेमोडीसाठी अपगामी विश्लेषणाची मदत घेतली जाते.    – डॉ. विवेक पाटकर मराठी विज्ञान परिषद,

संकेतस्थळ : http://www.mavipa.org    

ईमेल : office@mavipamumbai.org