लहान मुलांच्या बाळगुटीत जो हिरवट पिवळा खडा असतो तो म्हणजे डिकेमाली होय. संस्कृतमध्ये नाडिहिंगु, लॅटिनमध्ये गार्डिनिया गमिफेरा तर इंग्रजीमध्ये गनिकेपजस्मीन या नावाने ओळखला जाणारा हा एक लहान पानझडी वृक्ष असून भारत आणि श्रीलंकेत आढळतो. याची पाने चकचकीत अंडाकृती साधी, बिनदेठाची जवळजवळ असतात. फेब्रुवारी ते जूनमध्ये फांद्यांच्या टोकाला लहान देठाची, सुवासिक, पांढऱ्या रंगाची फुले येतात. या झाडाचा महत्त्वाचा भाग म्हणजे खोड. खोडाची साल हिरवट तपकिरी रंगाची व गुळगुळीत असते. सालीच्या आत पिवळट, पांढरे कठीण लाकूड असते. त्याचे कोरीव आणि कातीव काम करता येते. खोडावरील कळ्यांपासून राळेसारखा हिरवट पिवळा डिंक स्रवतो. तो वाळवतात. आणि त्याचे तुकडे किंवा वडय़ा करतात. त्याला डिकेमाली म्हणतात. या वृक्षाची फळे साधारण बोराच्या आकाराची, मृदू आणि कंगोरेयुक्त असतात. त्यांवर कायम राहणारा पाकळ्यांचा भाग असतो. फळांमध्ये अनेक बिया असतात.
डिकेमाली शुद्धकारक, सारक, भूक उद्दीपित करणारी व कामोत्तेजक असते. डिकेमालीत कृमिनाशक, जंतुनाशक, उत्तेजक आणि आचके थांबवणारे गुणधर्म असतात.
डिकेमालीचा उपयोग भूक नसणे, आतडी दुखणे खोकला अजीर्ण यांसारख्या विकारांमध्ये करतात. स्त्रियांच्या गर्भाशय विकारांवर करतात. लहान मुलांची पोटदुखी, दात येताना होणारे अपचन तसेच लहान मुलांचे दात येताना हिरडय़ांमध्ये होणारी शिवशिव डिकेमाली आणि मध यांचे मिश्रण हिरडय़ांवर घासल्याने कमी होते. व हिरडय़ा बळकट होतात. जंतविकारावर डिकेमाली उपयुक्त आहे. जनावरांच्या जखमांवर माश्या बसू नयेत म्हणून डिकेमालीची पूड लावतात. डिकेमालीच्या बियांचे तेल कृमींवर उपयुक्त असते. यकृत प्लीहा यांच्या आकारमानावर नियंत्रण ठेवण्यास डिकेमाली वापरतात. डोकेदुखी ताप त्वचा विकार यावर डिकेमाली उपयुक्त आहे. हृदयाचे कार्य सुनियोजित चालवण्यासाठी डिकेमाली वापरतात. खरूज, काटा, कंडू यावरही डिकेमाली पोटात घेतल्यास बरे वाटते. डिकेमाली उगाळून मूळव्याधीस लेप केल्यास ठणका आणि खाज थांबून मूळव्याध बरी होते.
मोडशी, अजीर्ण यापासून होणारी उलटी थांबवण्यासाठी डिकेमाली लिंबाच्या रसात नरम करून चाटवल्यास लगेच उलटी थांबते. डिकेमाली हा अनंताशी साधम्र्य असलेला छोटेखानी वृक्ष आहे.
– मृणालिनी साठे मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
नागर आख्यान : रोमन खाद्य संस्कृती
एखाद्या देशाचा किंवा राज्याचा इतिहास आणि संस्कृती जेवढी जुनी तेवढा त्याचा इतर देशांवर प्रभाव अधिक पडतो. अडीच हजार वर्षांपूर्वी रोमन संस्कृती पूर्णपणे विकसित झाली होती. रोमन संस्कृतीचा प्रभाव इतर युरोपीयन आणि काही आशियाई देशांवर पडला. रोमन खाद्यसंस्कृतीने गेल्या पाच-सहा शतकांमध्ये सर्व जगाला त्यांच्या अन्नपदार्थानी चटक लावलीय! भारतासारख्या दूरवरच्या देशामधील एखाद्या शहरात पिझ्झा आणि पास्ता मिळत नाही असे होत नाही! रोमने गेल्या दोन हजार वर्षांमध्ये त्यांच्या पाकक्रियांमध्ये नवनवीन बदल केले, ते लोकप्रिय केले. परंतु तेवढय़ावर न थांबता रोमन लोकांनी पाकक्रियांच्या नोंदींची पुस्तकेही प्रसिद्ध केली. ‘डी रे काक्विनेरिया’ ऊर्फ ‘एपिसियस’ हे चौथ्या शतकातले म्हणजे सोळाशे वर्षांपूर्वी या विषयावर लिहिलेले पुस्तक उपलब्ध आहे. पाकक्रियांबद्दल लिहिलेले हे बहुधा सर्वात जुने पुस्तक असावे! पिझ्झा आणि पास्ता हे रोमन जेवणातले प्रमुख अन्नपदार्थ. पास्ता हा पदार्थ गव्हाचा आटा व पाणी एकत्र करून निरनिराळ्या आकारांमध्ये तयार केला जातो. बाराव्या शतकात नॉर्मन राजाने रोमन राज्यात लोकांना गव्हाचा आटा व पाण्याच्या मिश्रणाने लांब धाग्यांसारखा एक खाद्यपदार्थ बनविताना पाहिले. तो पदार्थ त्याला आवडला व त्याचे नाव त्याने अत्रिया ठेवले. त्याचे पुढे ‘त्री’ आणि पुढे ‘स्पागेती’ झाले. सध्या पास्त्याच्या अनेक पदार्थापकी स्पागेती हा सर्वाधिक पसंतीचा प्रकार झालाय. पास्त्याच्या लोकप्रिय प्रकारांपकी बुकातिनी अल अॅमट्रिसिनिया, स्पागेती अल काबरेनारा, स्पागेती कॅसिओ इ पेप, कॅरसिओफी वगरे प्रकार अधिक लोकप्रिय झालेत. पिझ्झा म्हणजे पातळ गोल पाव. पिझ्झा बिझांका, प्रित्ती, काबरेनारा, क्विंटो क्वाटरे हे पिझ्झाचे लोकप्रिय प्रकार. क्विंटो क्वाटरे म्हणजे चौथा भाग. रोमच्या कत्तलखान्यातील कर्मचाऱ्यांना वेतनाऐवजी कधी कधी प्राण्यांचे उरलेले जिभेचे, आतडय़ांचे तुकडे मिळत. हे तुकडे त्या प्राण्यांच्या वजनाच्या एकचतुर्थाश असत. हे कर्मचारी त्या अवयवांचे तुकडे आणि ताजा भाजीपाला वापरून एक नवीनच पिझ्झासदृश कुरकुरीत पदार्थ बनवीत. हा पदार्थ पुढे लोकप्रिय होऊन त्याचे नाव क्विंटो क्वाटरे झाले. रोमन पिझ्झाबरोबर ताज्या भाज्या, बकरीच्या दुधापासून बनवलेले चीज, ऑलिव्ह आइल यांचे सॉस आवडीने खाल्ले जाते.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com